मुंबईने करुन दाखवले

27

देशात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. दररोज साडेतीन लाखांहून अधिक लोक कोरोनाबाधित होत आहेत. कोरोनाने मृत्यू पावणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. दररोज चार हजारांहून अधिक लोक कोरोनाने मरत आहेत. देशातील सर्वच प्रमुख शहरात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. देशात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना राज्यात मात्र कोरोनाचे रुग्ण कमी होत आहेत ही दिलासादायक बाब आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत तर कोरोनाचे रुग्ण झपाट्याने कमी होत आहे. कोरोनाची रुग्ण संख्या कमी करण्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेला यश आले आहे. कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या व देशात सर्वाधिक रुग्ण असलेल्या मुंबई शहराने रुग्णसंख्येला आळा घालून देशात आदर्श निर्माण केला आहे. देशातील इतर मोठ्या शहरांना जे जमले नाही ते मुंबईने करुन दाखवले आहे.

लसीकरण, आरोग्य सुविधा, ऑक्सिजन पुरवठा, कोरोना चाचण्या या सर्व पातळ्यांवर मुंबईने सर्वोच्च न्यायालय, नीती आयोग यांची शाबासकी मिळवून लसीकरण मोहिमेतही आघाडी मिळवली आहे. मुंबई महानगरपालिकेने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जे प्रयत्न केले आहेत त्या प्रयत्नांचे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर कौतुक केले आहे. देशात लसीचा तुटवडा असल्याने थेट विदेशातून लस खरेदी करून आयात करण्याचा विचार मुंबई महानगर पालिका करत आहे ही देखील सुखावणारी बाब आहे. लसीचा पुरवठा झाल्यावर तीन आठवड्यात सर्वांचे लसीकरण करण्याचा रोडमॅप मुंबई महानगर पालिकेने तयार केला आहे. लसींचा वेळेवर आणि पुरेसा पुरवठा झाला आणि मुंबई महानगर पालिकेने आखलेल्या रोडमॅप प्रमाणे लसीकरण पूर्ण झाले तर तो मुंबईचा कोरोनावरील मोठा विजय ठरेल.

तसे झाले तर एक दक्ष महानगर पालिका म्हणून इतिहासात मुंबई महानगर पालिकेची नोंद होईल. कोरोना रोखण्यासाठी मुंबई महानगर पालिकेने केलेले हे प्रयत्न इतर महानगर पालिकेसाठीही पथदर्शी आहे. मागील वर्षी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी धारावी शहराने जे केले तेच यावेळी मुंबईने केले आहे. धारावी प्रमाणेच मुंबई पॅटर्न देशभर राबवण्याची वेळ आली आहे.

✒️लेखक:-श्याम ठाणेदार(दौंड,जिल्हा पुणे)मो:-९९२२५४६२९५