सांगली जिल्ह्यातील नेते आमदार निलेश लंकेंचा आदर्श घेतील काय ?

✒️दत्तकुमार खंडागळे(संपादक वज्रधारी)मो:-9561551006

राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी शरद पवार यांच्या नावाने ११०० बेडचे कोविड सेंटर चालू केले आहे. त्यात शंभर बेड ऑक्सीजनचे आहेत. आमदार निलेश लंके यांनी या अकराशे रूग्णांचे पालकत्व स्विकारले आहे. ज्या घरातले प्रमुख कोरोनाने संपले आहेत त्या कुटूंबातल्या लहान मुलांचेही पालकत्व आमदार निलेश लंके यांनी स्विकारले आहे. ते स्वत: कोविड सेंटरमध्ये राहतात, रूग्णांची सेवा करतात. ” माझे काही व्हायचे ते होऊ दे, मी असुरक्षित झालो तरी होवू दे पण लोक जगले पाहिजेत !” ही भूमिका घेवून आमदार निलेश लंके लोकांची सेवा करतायत. लंकेंचे कोविड सेंटर शेकडो गोर-गरिब रूग्णांचे आधारवड झाले आहे. लंके जणू या गोर-गरीबांचा देव झाले आहेत. कोरोनाच्या या भयंकर काळात त्यांनी लोकांना मोठा दिलासा दिला आहे. त्यांच्या या कार्याला हात जोडून सलाम करावा लागेल. त्यांच्याकडे ना कारखाना आहे, ना सुतगिरण पण लोकांच्या पाठबळावर स्वत:चा जीव धोक्यात घालून आमदार निलेश लंके अहोरात्र लोकांच्या सेवेत आहेत. आमदार निलेश लंकेचा आदर्श सांगली जिल्ह्यातील नेते मंडळी घेतील का ? हा खरा सवाल आहे.

सांगली जिल्ह्यात गेल्या काही दिवसात कोरोनाचा कहर सुरू आहे. लोकांचे पराकोटीचे हाल सुरू आहेत. गावा-गावात कोरोनाचे रूग्ण सापडतायत. गत मार्चपासून आत्तापर्यंत जिल्ह्यात सुमारे ९७ हजाराच्यावर लोक कोरोनाने बाधीत झालेले आहेत. सध्या १७ हजारापेक्षा जास्त बाधीत रूग्ण आहेत. आजवर २८०० पेक्षा जास्त लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे तर सध्या २५०० पेक्षा जास्त लोकांची प्रकृती चिंताजनक आहे. ही जिल्ह्याच्या नोडल अधिका-यांनी दिलेली आकडेवारी आहे. वस्तूस्थिती यापेक्षा वेगळी असू शकते. जिल्ह्यात अनेक रूग्णांचा ऑक्सीजनअभावी जीव गेला आहे. कित्येक लोक हॉस्पिटलच्या वाटेत आणि दारात तडफडून मेले आहेत. कित्येक घरातली कर्ती माणसं मेली आहेत. अनेकांची घरं उघडी पडली आहेत. कोरोनाने जिल्ह्याचे फार मोठे नुकसान केले आहे. आजही ऑक्सीजन आणि व्हेंटीलेटर बेडसाठी लोक पेशंट गाडीत घालून दारोदार भटकतायत. कुणी बेड देता का बेड ? अशी साद घालत वेगवेगळ्या हॉस्पिटलचे दरवाजे ठोठावतायत पण तरीही त्यांना बेड मिळत नाहीत. आभाळ फाटल्यासारखी स्थिती आहे. या काळात अनेक रूग्णांना ऑक्सीजनसाठी तडफडून मरताना पाहिलय. हे सगळं चित्र पाहून अनेकवेळा रडू आले, अक्षरश: हूंदके देवून रडलो, जीव कासावीस झाला पण करायचं काय ?

या विपरीत काळात सांगली जिल्ह्यातले नेते मैदानात उतरून जनतेसाठी राबताना दिसले नाहीत. लोकांची सोय करताना दिसले नाहीत. मतांसाठी दारा-दारावर जाणारे, लोकांना दारू पाजणारे, ढाब्यावर नेवून मटन चारणारे, पैसे देवून गुलाम करणारे नेते आपल्या हस्तीदंती मनो-यातून बाहेर पडलेले दिसले नाहीत. लोकांना त्यांच्याच स्थितीवर सोडले आहे. हॉस्पिटलला ऑक्सीजन नव्हता. डॉक्टर मंडळी उपचार करायचे सोडून ऑक्सीजनसाठी भटकत होती. लोक मरत आहेत. या काळात जनतेचे कैवारी कुठे आहेत ? जिल्ह्यात दोन मंत्री, दहा आमदार आणि एक खासदार महाशय आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, मिरजेचे सुरेश खाडे, जतचे विक्रम सावंत, शिराळ्याचे मानसिंगराव नाईक, खानापुरचे अनिल बाबर, तासगावच्या सुमनताई पाटील, कॉंग्रेसचे विधान परिषदेचे सदस्य मोहनराव कदम, राष्ट्रवादीचे अरूण लाड, भाजपाचे गोपिचंद पडळकर, सदाशिव खोत या शिवाय तेवढेच माजी आमदार आहेत. असे असतानाही अख्खा जिल्हा राम भरोसे असल्यासारखी स्थिती आहे. जिल्ह्यात कमालीची ऑक्सीजनची कमतरता होती आणि आजही आहे. याच काळात कृषीमंत्री विश्वजीत कदम सांगत होते की, “जिल्ह्यात ऑक्सीजनचा अजिबात तुटवडा नाही !” त्यांचे हे विधान फारच धाडसाचे होते. ते लोकांना फसवत होते की स्वत:लाच ? हे मात्र समजले नाही.

काही अपवाद वगळता इथले बहूतेक नेते कारखानदार आहेत. बहूतेकांच्या बुडाखाली कारखाने, सुतगिरण्या आहेत. एका एकाकडे दोन दोन कारखाने आहेत. कुणाकडे सुतगिरण्या, शिक्षणसंस्था आहेत तर कुणाकडे आणखी काही. सगळी नेतेमंडळी गलेलठ्ठ आणि गब्बर आहे. जिल्ह्यातील जनता तडफडत असताना, ऑक्सीजनसाठी टाचा घासत असताना, बेडसाठी भटकत असताना यातल्या एकाही बहाद्दरला कोविड सेंटर उभे करायची इच्छा झाली नाही. आमदार निलेश लंके यांच्यासारखे हॉस्पिटल उभा करून गोरगरीबांना आधार द्यायची दानत यातल्या कुणीच दाखवली नाही. सगळे चिडीचुप आप-आपल्या घरात बसलेले आहेत. कुणीच आप-आपली बिळं सोडली नाहीत. फार तर फोन करून आपल्या मागे-पुढे करणारांना, पै-पाहूण्यांना आणि मित्र मंडळींनाच सरकारी किंवा खासगी हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करून दिले असतील. यापेक्षा फार मोठे काम यातल्या कुणी केलेले ऐकीवात नाही. काहीजण ऑक्सीजन प्लांट उभारणार होते त्याचे काय झाले ? हे ही त्यांनाच ठाऊक. सत्ताधारी काय अन विरोधक काय सगळे सारखेच आहेत.

लोकांना या मंडळींनी अक्षरश: वा-यावर सोडलेले दिसते आहे. पालकमंत्र्यांच्या बैठकामधून काय निष्पन्न झाले ? हे ही त्यांनाच ठाऊक. खासदार संजय पाटील गतवर्षी घरातच जोर-बैठका मारताना दिसत होते. यावेळी त्या ही दिसल्या नाहीत. त्यांच्या जोर-बैठका पाहून किमान रूग्णांची करमणूक तरी झाली असती. पण यावेळी त्या ही पाहता आल्या नाहीत. पालकमंत्री जयंत पाटील व कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम या दोघांनी मनात आणले असते तर अख्या जिल्ह्याला पुरेल इतके एक एक हॉस्पिटल हे दोघेच उभे करू शकले असते. पण करायची दानत हवी ना. या दोघांचीच मोठी ताकद आहे आणि बाकीचे सर्व आजी-माजी आमदार दारिद्र्य रेषेत आहेत असाही भाग नाही. स्वत:च्या विकासात मग्न झालेल्या नेत्यांना लोकांच काय पडलय ? झ-यात बसून उध्दव ठाकरेंच्यावर जिभेचे आसूड मारणारे भाजपाचे आमदार गोपिचंद पडळकर यांनी तरी एखादे कोविड सेंटर उभा करून सत्ताधा-यांना आपली तळमळ दाखवून द्यायची होती. त्यांनीही तोंडाची हवा सोडण्यापलिकडे काही केल्याचे दिसले नाही. त्यांची तळमळ सत्ताधा-यांच्यावर टिका करण्याइतपतच आहे का ? असा प्रश्न या निमित्ताने पडल्याशिवाय रहात नाही. म्हसवडला भाजपाचे आमदार व पडळकरांचे मित्र जयकुमार गोरे यांनी मोफत कोविड सेंटर उभारले आहे. तर विधानसभेला पडलेले राष्ट्रवादीचे उमेदवार प्रभाकर देशमुख यांनी गोंदवल्यात मोफत कोवीड सेंटर उभारले आहे. सांगलीच्या नेत्यांनी जनतेला गृहीत धरले आहे. लोकं विकत मिळतात त्यांचे काय ? निवडणूका आल्या की दारू, मटन आणि पैसे फेकले की लोक मागे पळत येतील हा या सर्वांनाच विश्वास असावा.

लोकं मेली काय आणि जगली काय ? आपली दुकानदारी चालली म्हणजे बस्स झाले अशीच या सर्वांची मानसिकता दिसते आहे. या सगळ्यांचेच राजकारण कार्पोरेट झाले आहे. ही सगळी सामान्यांची पोर आहेत पण आज त्यांच्याकडे पाहिले की हे सामान्यांचे नेते आहेत असे अजिबात वाटत नाही. त्यांना सामान्य जनतेचे काही पडले आहे असे अजिबातच वाटत नाही. हजारो लोकांची खासगी कोवीड सेंटरमध्ये जावून उपचार घ्यायची औकादच नाही त्यांचे काय ? ज्यांची सर्दी-खोकल्याची लायकी त्यांना कोरोना झाला तर दिड लाख, दोन लाख बिल होते आहे. सर्दी-खोकल्याची लायकी असणारे गोर-गरिब इतके बिल कसे भरणार ? आर्थिक कुवत नसल्यानेही यावेळी अनेकांचा जीव गेला आहे. पण लोकांचे काय, ते मेले तर मरू देत आमचे दुकान मात्र जीवंत राहिले पाहिजे अशीच सांगलीच्या नेत्यांची मानसिकता दिसते आहे. आमदार निलेश लंकेसारखा प्रतिनीधी प्रत्येक मतदारसंघाला भेटावा हिच अपेक्षा.

महाराष्ट्र, लेख, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED