आर्वी उप जिल्हा रुग्णालयात 100 बेडचे आय सी यु सुरू करणार -पालकमंत्री सुनील केदार

29

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

आर्वी(दि.15मे):- कोरोनाचा संसर्ग आता गावागावात होत असून तिसरी लाटेच्या तयारीसाठी आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात 100 बेडचे आय सी यु सुरू करण्याचा प्रयत्न राहील. तसेच या वर्षभरात सर्व ग्रामीण रुग्णालये अत्याधुनिक करण्यात येतील असे पशुसंवर्धन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी सांगितले. यामुळे आर्वी येथील रुग्णांना अमरावती किंवा वर्धा येथे जाण्यासाठी होणारा त्रास कमी होईल आणि रुग्णांना तातडीने उपचार मिळतील.

दुसऱ्या लाटेत अचानक ऑक्सिजनची मागणी वाढली आहे त्यामुळे सर्व कोविड रुग्णालये आणि ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याआठी मंजुरी दिली असून महिन्या भरात ते सुरू होतील या दृष्टीने तातडीने काम करावे अशा सूचना त्यांनी दिल्यात. यावेळी आर्वी साठी सुसज्ज रुग्णवाहिकेची मागणी करण्यात आली. ती उपलब्ध करून देण्याचे श्री केदार यांनी यावेळी सांगितले.

पालकमंत्री सुनील केदार यांनी आर्वी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन तेथील व्यवस्थेची व उपचाराची माहिती घेतली.

पालकमंत्र्यानी यावेळी रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचारी यांना जेवणाची व्यवस्था करून देण्यात येईल असेही सांगितले. रुग्णालयात लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधत त्यांनी त्यांच्या आरोग्याची चौकशी केली. टप्प्याटप्प्याने लस सर्वांसाठी उपलब्ध होईल, त्यामुळे लस घेण्यासाठी गर्दी करू नये, असे आवाहन केले.
यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोहन सुटे उपस्थित होते.