पत्रकार म्हणजे विटा अर्बनचे कर्मचारी आहेत का ?

24

✒️लेखक:-दत्तकुमार खंडागळे(संपादक वज्रधारी)मो:-9561551006

काल वज्रधारी न्युजवरती विटा नगरपालिकेने सुरू केलेल्या कोविड हॉस्पिटलची बातमी लावली होती. विट्याच्या तहसिलदारांनी या हॉस्पिटलवर जास्तीचे बिल आकारणी केल्याबद्दल नोटीस काढली होती. जास्तीचे उकळलेले तब्बल ११ लाख ८४ हजार रूपये लोकांना परत करण्याचे आदेश तहसिलदारांनी दिलेले आहेत. सदरची माहिती विट्याचे तहसिलदार ऋषिकेत शेळके यांनी दिलेली होती. त्याचीच बातमी वज्रधारी न्युजने केली असता विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटलांचे पित्त खवळले. त्यांनी रात्री अकरा वाजताच फोन करत, “हे बरोबर नाही, बातमी चुकीची लावली आहे. माझा काय संबंध ? मी कॉप्ट नगरसेवक आहे. माझा फोटो लावायचा काय संबंध ? मग बाकीच्या सगळ्याच नगरसेवकांचेही फोटो लावा.

तहसलिदाराचा दणका द्यायचा काय संबंध ? त्याने कारवाई करायचा काय संबंध ? बातमी डिलीट करा, माझा फोटो डिलीट करा, आत्ताच येवून माझी बाईट घ्या, माझा खुलासा द्या. नाहीतर मी कायदेशीर कारवाई करेन !” यावर मी त्यांना म्हणालो की, “बातमी डिलीट करू शकत नाही, फोटोही डिलीट करू शकत नाही, तहसिलदारांनी जी माहिती दिलीय त्याचीच मी बातमी केली आहे. तुमचा खुलासा द्यायला मी तयार आहे पण आत्ताच्या आत्ता शक्य नाही, सकाळी खुलासा द्या तो लावूया. तुम्हाला कायदेशीर कारवाई करायची असेल तर करा माझी हरकत नाही असे सांगितल्यावर “ठिकाय राहू द्या खुलासा द्यायचा, तुम्ही तुमच्या पध्दतीने चला माझ्या पध्दतीने मी बघतो !” असा सौम्य धमकीवजा इशाराही त्यांनी दिला.

वैभव पाटील ज्या पध्दतीने बोलत होते ते पाहता पत्रकार म्हणजे विटा अर्बनचे, विराज दुध संघांचे किंवा आदर्श शिक्षण संस्थेतले कर्मचारी आहेत असा त्यांचा समज आहे की काय ? रात्रीच्या अकरा वाजताच माझा खुलासा घ्यायला या, माझी बाईट घ्यायला आत्ताच या आणि आत्ताच तो लावा, नायतर मी कायदेशीर कारवाई करेन, हा काय प्रकार आहे ? ही भाषा वैभव पाटील यांच्यासारख्या जबाबदार माणसाला शोभत नाही. विटा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी काम केलेल्या व भविष्यात तालुक्याचे राजकारण करण्याची इच्छा बाळगणा-या माणसाने असे बोलणे योग्य नाही. आम्ही कोणती बातमी लावावी ? कोणती लावू नये, ती डिलीट करावी, नाही करावी ? हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला ? आत्ताच्या आत्ताच या आणि माझी बातमी लावा, ते ही रात्रीच्या अकरा वाजता असे कसे सांगू शकता ? आजपर्यंत तुमच्या चांगल्या कामाचेही आम्ही वेळोवेळी कौतुक केले आहे. तुमच्या वाढदिवसाला विशेष लेख लिहून तुमचे काम मांडले आहे त्याचे काय ?

चांगले काम असेल तेव्हा चांगले व चुक असेल तेव्हा चुक ही भूमिका आमची नेहमीच असते. तालुक्यातील सगळ्याच नेते मंडळीच्या चांगल्या कामाचे आम्ही कौतुक करतो तसेच निर्भयपणे चुकीला चुकही म्हणतो. कालच्या बातमीत व्यक्तीगत वैभव पाटलांच्यावर कसलेही भाष्य केलेले नाही. त्यांनी पंधरा टक्के सवलत घोषित केली होती पण प्रत्यक्षात ती दिली गेली नाही. रूग्णालयाने लोकांच्याकडून जास्तीचे पैसे उकळण्यात आलेत असेच त्या बातमीत म्हंटले आहे. प्रशासनाने त्यांना रूग्णांच्याकडून घेतलेले अतिरिक्त पैसे परत करण्याचे आदेश दिले होते. सुमारे ११ लाख ८४ हजार रूपये परत करण्याचा आदेश दिल्याची माहिती तहसिलदारांनीच दिली आहे. तीच माहिती बातमीत लावण्यात आली आहे. सदर बातमीत ना नगरपालिकेबाबत काय भाष्य आहे ना वैभव पाटलांच्याबाबत. मग तरीही त्यांनी इतके बिथरण्याचे कारण काय ? यात त्यांची कुठली नाहक बदनामी झाली ?

जीवनधारा कोविड हॉस्पिटलवर कारवाई केली आणि रूग्णांच्याकडून जास्त घेतेलेले पैसे परत द्यायला लावले हेच बातमीत म्हंटले आहे. विट्यात जीवनधारा हॉस्पिटलसह एकूण पाच खासगी हॉस्पिटल आहेत. असे असताना त्यातील फक्त जीवनधारावरतीच प्रशासनाने का कारवाई केली ? इतर हॉस्पिटलवरती कारवाई केली असती अन आम्ही फक्त जीवनधाराचीच बातमी केली असती तर आम्ही चुकीचे होतो. जीवनधारा हॉस्पिटलवर वज्रधारी न्युजने कारवाई केलेली नाही तर ती प्रशासनाने केली आहे. तुम्ही आमच्यावरच का कारवाई केली ? असा जाब त्यांनी तहसिलदारांना किंवा जिल्हाधिका-यांना विचारावा. वैभव पाटलांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत रूग्णांच्याकडून जास्तीची घेतलेली रक्कम दहा लाखापेक्षा जास्त असल्याचे व ती रूग्णांना चेकने परत केली असल्याचे कबूल केले आहे.

तुम्ही जास्तीचे पैसे घेतलेच नाहीत, लोकांना सवलत दिली आहे तर चेकने कुठले पैसे परत केले ? रूग्णांना दहा लाख परत का दिले ? रूग्णांना पंधरा टक्के सवलत देताय तर दहा लाख रूपये (त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे) रूग्णांना परत द्यायची वेळ हॉस्पिटलवर का आली ? या गोष्टीचे त्यांनी स्वत:च चिंतन करावे. त्यांचा अंतरात्माच त्यांना सत्य सांगेल. बाकी आमच्यावर केस घालणार असाल, खटला दाखल करणार असाल किंवा आणखी कुठले प्रयोग करणार असाल तर खुषाल करा. सत्यासाठी तुरूंगात जायला, मरायला आम्ही केव्हाच तयार आहोत. पत्रकारांनी फक्त कौतुक करावे, चुका मांडू नयेत ही भूमिका असेल तर ते बरोबर नाही. इथे त्यांची बदनामी करण्याचा काय संबंध येतो ? तुमचा कसलाही खुलासा मांडायला आम्ही कधीही तयार आहोत. खुलासा म्हणून आम्हाला शिव्या दिल्या तरी त्या मांडायला तयार आहोत. तुमचे म्हणणे मांडायला नकार दिला तर जाब विचारा ना. त्यांना बदनाम करायला त्यांच्याशी आमचे व्यक्तीगत वैरही नाही ? ज्यांच्याशी वैर असेल त्यांचीही आम्ही बदनामी करणार नाही. कारण तशी आमची प्रवृत्ती नाही. माझा फोटो का लावला ? हा त्यांचा सवाल आहे.

आजच्या पत्रकार परिषदेतही त्यांनी आमचा हॉस्पिटलशी फारसा संबध नाही असेच सांगितले आहे. तुमचा संबंध नाही तर पंधरा टक्के सवलत घोषित करायला तेथील डॉक्टरांनी पुढे येण्याऐवजी तुम्हीच पुढे कसे आलात ? हॉस्पिटल चालू केल्याचे सगळे गुडवील घ्यायलाही तुम्हीच पुढे आहात. मी कॉप्ट नगरसेवक आहे माझा काय संबंध ? असे म्हणता मग गुडवील घ्यायला व आम्ही केलय म्हणून सांगायला कसे काय पुढे येता ? तुम्ही पुढे होवून सगळ्या घोषणा करताय तर तुमचा फोटो लावला तर त्यात वावगे काय ? त्याचा इतका राग का यावा ? सदर बातमीत जीवनधारा हॉस्पिटल सोडून वैभव पाटलांच्यावर व नगरपालिकेवर कसलेही भाष्य किंवा आरोप नसताना त्यांचा तिळपापड का झाला आहे ? हा प्रश्न या निमित्ताने पडतो आहे.