इराण चीन कराराचा भारताला आर्थिक फटका बसणार

34

भारत आणि चीन हे जगातील दोन महत्वाचे देश आहेत. जगातील एक तृतीयांश लोकसंख्या या दोन देशात आहे. भारत आणि चीन या दोन अण्वस्त्रधारी देशांच्या संबंधांकडे जगाचे लक्ष आहे. भारत आणि चीनचे संबंध कायम कटुतेचे राहिले आहे. मागील वर्षी चीनने भारतात घुसखोरी करून भारताला आव्हान दिले पण भारतीय सैनिकांनी जशास तसे उत्तर देऊन चीनला भारतातून हाकलून दिले . आजचा भारत हा १९६२ चा भारत नाही याची जाणीव चीनला झाल्याने चीनने आता आपले धोरण बदलले आहे.

भारताच्या मित्र देशांना स्वतःकडे वळवणे व भारताविरुद्ध फितवणे आणि भारताचे नुकसान करणे हा चीनचा नवा डाव आहे त्याची सुरवात त्यांनी नेपाळ पासून केली आहे आता त्याला भारताचा मित्र देश इराण बळी पडला आहे. अमेरिकेने इराणवर निर्बंध लादल्याने इराणने चीन सोबत आगामी २५ वर्षासाठी महाकारार केला आहे. हा करार करण्याआधी चीनने भारताला फरजाद बी गॅस प्रकल्पातून वगळावे अशी अट इराणला घातल्याने इराणने या प्रकल्पातून भारताला वगळले आहे. इराणने या प्रकल्पातून भारताला वागळल्याने भारताला मोठा आर्थिक फटका बसणार आहे. या गॅस फिल्डचा शोध भारताच्या ऑइल अँड नॅचरल गॅस कंपनी( ओ एन जी सी ) या विदेश लिमिटेड कंपनीने केला होता.

भारत आणि इराण यांच्यात झालेल्या कराराप्रमाणे ओ एन जी सी कंपनी हा प्रकल्प विकसित करणार होती आणि त्या बदल्यात इराण भारताला मोठी रक्कम देणार होता पण आता चीनने यात खोडा घातला असल्याने इराणने हा प्रकल्प मोडीत काढला असून यापुढे हा प्रकल्प इराणची राष्ट्रीय ऑइल कंपनी पेट्रोपर्स करणार आहे. याबाबतचा करार इराणचे पेट्रोलियम मंत्री इझेन झंगेनह यांनी पेट्रोपर्स कंपनीशी केला असून हा करार १. ७८ अब्ज डॉलरचा आहे. इराणने यावर्षी चिनसोबत २५ वर्षासाठी ४०० अब्ज डॉलरचा महाकरार केला आहे. अमेरिकेच्या निर्बंधाचा सामना करावा लागत असल्याने आर्थिक कोंडीत सापडलेल्या इराणला चीनने आपल्याकडे वळवण्यासाठीच हा करार केला आहे.

या करारामुळे भारताचा मित्र असलेल्या आणखी एका देशाला चीनने स्वतःकडे वळवले आहे. आशिया खंडावर एकतर्फी वर्चस्व गाजवत जागतिक महासत्ता होण्याचे चीनची महत्वाकांक्षा आहे. चीनची ही महत्वाकांक्षा भारतामुळे पूर्ण होऊ शकत नाही याची चीनला खात्री आहे म्हणूनच भारताशी मित्रता असलेल्या देशांना मोठी कर्जे देऊन, त्या देशांशी अब्जावधी डॉलरचे करार करून, त्या देशांमध्ये अब्जावधी डॉलरची गुंतवणूक करून त्यांना आपल्या बाजूने वळवणे व भारताविरुद्ध फितावणे ही चीनची रणनिती आहे. याआधी त्यांनी हा प्रयोग नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार या देशात केला आहे. आता तोच प्रयोग ते इराण सोबत करत आहे त्यात ते यशस्वीही होत आहे  चीनला शह देण्यासाठी भारताने आपल्या परराष्ट्र धोरणात बदल करून नवे परराष्ट्र धोरण आखायला हवे.

✒️लेखक:-श्याम बसप्पा ठाणेदार(दौंड,जिल्हा पुणे)मो:-९९२२५४६२९५