आनंदभान अभंगसंग्रहावर आभासी पध्दतीने राष्ट्रीय परिचर्चा

22

🔹आनंदभान मधील अभंग आत्मभान जागवत जीवनाला मंगलमय करणारे – प्रा. सुरेखा कटारिया

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.31मे):-राष्ट्रसंत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक तथा साहित्यिक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांच्या आनंदभान या नवनिर्मित अभंगसंग्रहावर राष्ट्रीय परिचर्चेचे आयोजन आभासी पध्दतीने करण्यात आले . नक्षत्राचं देणं काव्यमंच पुणे आणि राष्ट्रसंत विचार साहित्य केंद्रीय परिषदेच्या संयुक्त सहकार्याने आयोजित ह्या परिचर्चेत उदघाटक म्हणून मुंबई येथील ज्येष्ठ पत्रकार तथा कवी जयवंत बामणे लाभले होते.तर अध्यक्षस्थानी गडचिरोली येथील समाजसेवी तथा सुप्रसिद्ध कवयित्री श्रीमती कुसूमताई अलाम होत्या. भाष्यकार म्हणून पुणे येथिल कवयित्री तथा शिक्षणतज्ञ सौ. सुरेखा कटारिया , पुणे येथिल नक्षत्राचं देणं काव्यमंच चे राष्ट्रीय अध्यक्ष वादळकार कवी प्रा. राजेंद्र सोनवणे उपस्थित होते.

ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी प्रास्तविकातून अभंगसंग्रह निर्मितीमागील प्रेरणा आणि आलेले जीवनानुभव यावर प्रकाश टाकला. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार तथा कवी जयवंत बामणे म्हणाले , सुजाण समाजमन निर्मितीसाठी उत्तमप्रकारचे साहित्य निर्माण झाले पाहिजे. ग्रामजीवनाशी घट्ट नाळ असलेल्या बंडोपंताच्या आनंदभान अभंगसंग्रहात भक्तीमार्गातून समाजसुधारणेचा मार्ग दिसून येतो. संत साहित्याचे महात्म्य आणि महत्त्व प्रस्तुत कवींनी ओळखले असून त्यांंनी कर्मातून मोक्षाचा सहजमार्ग कसा जपायचा यावर सुरेख चिंतन मांडलेले दिसून येते.

वादळकार कवी प्रा. सोनवणे म्हणाले , “जगात कवीला मोठी परंपरा लाभलेली आहे आणि कवींनीच जगातले सुंदरपण हेरून सर्वसामान्य जणांना जगण्याचे मर्म शब्दांच्या माध्यमातून समजावून सांगीतले आहे. बंडोपंत बोढेकर यांनी आनंदभान मधून झाडीपट्टीच्या नैसर्गिक वनसौंदर्यासोबतच तेथील ग्रामवैभवाचा जणू साक्षात्कार घडवून आणला आहे. या संग्रहात आलेले “तत्वज्ञान” संत तुकाराम महाराजांच्या महान अभंगाशी जवळीक साधणारे आहेभाष्यकार म्हणून सुप्रसिद्ध कवयित्री प्रा. सौ. सुरेखा कटारिया म्हणाल्या, “आनंदभानच्या अभंगवाणीत राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांच्या विचारांचे संस्कार जाणवतात. निरामय आनंदासोबतच मानवी जीवनाला मंगलमय करणाऱ्या आणि आत्मभान जागवणाऱ्या ह्या अभंगरचना आहेत .”

कार्यक्रमाच्या अध्यक्ष श्रीमती कुसूमताई अलाम म्हणाल्या, आनंदभान मधील अभंग हे सामाजिक जाणिवेतून तयार झालेले वैचारिक लेखन आहे.येथील महान आदिसंस्कृतीवरही प्रकाश टाकल्या गेलेला आहे . एकूणच सामान्य जणांच्या उत्थानासाठी सकारात्मक दृष्टीने रचलेले हे अभंग आपल्या महान संताचा विचार रूजविणारे आहे. हे अभंग वाचताना आपल्या निसर्ग समृद्ध झाडीपट्टीची सहज सहल घडावी असा झाडीचा ” खाजा ” त्यात आलेला आहे.”

सूत्रसंचालन ॲड. राजेंद्र जेनेकर यांनी केले तर विलास उगे यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्रा. श्रावण बानासुरे , प्रा.विलास पारखी , भाऊराव बोबडे, सुरेश देसाई, प्रदीप बोटपल्ले , मो.शकील जाफरी, रामदास हिंगे,शंकर दरेकर , देवराव कोंडेकर , ॲड. सारिका जेनेकर , सुभाष पावडे, शुभम बोबडे , विठ्ठल कोठारे, दादाजी झाडे , सुनिल बावणे, सौ.मंजूषा कऊटकर, नामदेव गेडकर आदी रसिक कवीमंडळी उपस्थित होते..