नवी मुंबईतील पत्रकारांसाठीचे विशेष लसीकरण शिबीर संपन्न

25

🔹प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाने केली होती मागणी

🔸राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा पत्रकारांसाठीचा प्रथम उपक्रम

✒️नवी मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नवी मुंबई(दि.31मे):-नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पत्रकारांना कोरोना संसर्गापासून सुरक्षित करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या आणि राज्यात पहिल्यांदाच स्थानिक स्वराज्य संस्थेकडून पुढाकार घेतलेले फक्त पत्रकारांसाठीचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण विशेष शिबीर संपन्न झाले. याप्रसंगी, खासदार राजन विचारे यांनी आयोजित शिबिराला भेट दिली. तसेच, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, विठ्ठल मोरे, उपजिल्हाप्रमुख दिलीप घोडेकर, संतोष घोसाळकर, रोहिदास पाटील, शहरप्रमुख विजय माने व इतर मान्यवरांनी खासदारांसोबत आपली उपस्थिती दर्शवली.
कोरोना कालावधीत वृत्तांकनाची आपली जबाबदारी उपलब्ध संसाधनांच्या साहाय्याने पार पडणाऱ्या पत्रकारांना कोरोनाच्या संसर्गापासून सुरक्षित करणे गरजेचे असल्याची बाब महत्वाची होती.

त्यामुळे, पत्रकारांसाठी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिराचे आयोजन करावे अशी मागणी प्रेस संपादक व पत्रकार संघ नवी मुंबई तर्फे एप्रिल महिन्यातच लेखी निवेदनाच्या माध्यमातून महापालिका आयुक्त अभिजित बांगर, अतिरिक्त आयुक्त जनसंपर्क सुजाता ढोले व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. धनवंती घाडगे यांच्याकडे करण्यात आली होती.संघटनेतर्फे मागणी केल्यावरही नवी मुंबई महानगरप्रमुख सुदिप घोलप व सचिव अनिलकुमार उबाळे यांच्याकडून प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. ज्याची दखल घेत, महापालिकेने शनिवार 29 मे रोजी अपोलो हॉस्पिटलमध्ये फक्त पत्रकारांसाठी विशेष लसीकरण शिबिराचे आयोजन केले.

ज्यामध्ये, 18 ते 45 वयोगटातील सुमारे 40 हुन अधिक पत्रकारांनी आपला सहभाग नोंदवत कोव्हीशिल्ड लसीचा पहिला डोस घेतला आहे. याप्रसंगी, लसीकरण झालेल्या पत्रकारांना खासदार राजन विचारे यांच्याहस्ते लसीकरण प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.तर, याचप्रमाणे 84 दिवसानंतरही लसीचा दुसरा डोसही नवी मुंबई महापालिकेतर्फे देण्यात येणार असून तसे नियोजन करण्यात आले आहे. अशी माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. धनवंती घाडगे यांनी दिली.