लसीकरणाचे गावनिहाय नियोजन करा – जिल्हाधिकारी गुल्हाने

27

🔹काँटॅक्ट ट्रेसिंग व टेस्टिंग वाढविण्याचे निर्देश

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.31मे):-कोविड प्रतिबंधात्मक लस ही पूर्णपणे सुरक्षित आहे. याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. शासकीय यंत्रणेसोबतच सामाजिक संघटना, प्रतिष्ठित नागरिक यांच्यामार्फत लसीकरणाचा संदेश गेला पाहिजे. तसेच जिल्ह्यात जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभागाने गावनिहाय नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोविडबाबत आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, पोलिस उपअधिक्षक शेखर देशमुख, उपजिल्हाधिकारी (रोहयो) पल्लवी घाटगे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश टेकाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत आदी उपस्थित होते.

लसीकरणाबाबत पसरविण्यात येणा-या अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन करून जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने म्हणाले, कोव्हीड लसीकरणाला कमी प्रतिसाद मिळणा-या भागात जास्त लक्ष केंद्रीत करून नागरिकांना लसीकरणाचे महत्व्‍ पटवून द्या. ज्या गावात एकही पॉझेटिव्ह रुग्ण आढळून आला नाही, अशा गावातसुध्दा लसीकरण करणे गरजेचे आहे. चंद्रपूर महानगर पालिकेसह जिल्‍ह्यातील इतर शहरी भागात संबंधित पालिकेने वॉर्डनिहाय नियोजन करून लसीकरणावर भर द्यावा, अशा सुचना त्यांनी केल्या.

सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी दर 10 पेक्षा जास्त आहे. काँटॅक्ट ट्रेसिंग आणि टेस्टिंग वाढविली तरच पॉझेटिव्हीटी दर कमी होईल. शिवाय मृत्युदरही कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांच्या तपासण्या करा. जिल्ह्यातील प्रत्येक उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय येथे ऑक्सीजनयुक्त 30-40 बेड तर प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात किमान पाच ते सात बेडचे नियोजन करावे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुस-या लाटेच्या अनुभवातून तिसरी लाट थोपविण्यासाठी प्रत्येक तालुक्यात काय उपलब्ध आहे, आणखी कशाची आवश्यकता आहे आदींचा आढावा घेऊन जिल्हास्तरीय आराखडा तयार करावा. जेणेकरून प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविता येतील, असे निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले.

बैठकीला जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम, पालिका प्रशासन अधिकारी अजितकुमार डोके यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.