अमृत योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे

47

🔺जलवाहीन्या फुटल्याने हजारो लिटर पाण्याचा अपव्यय

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.६जून):-शहरातील अमृत योजनेंतर्गत पाणी पाईप लाईनचे कामं करण्यात आले. परंतु ही पाईप लाईन जागोजागी फुटुन असल्याचे आढळून येत आहे.शहरातील के जी एन सभागृहाजवळच्या परिसरात हजारो लिटर पाणी वाहुन जात असल्याचे निदर्शनास येत आहे. गेल्या तीन महिन्यापासून स्थानिक नेहरू वार्ड येथील यादगार व्यायाम शाळे समोरील नळाची पाईप लाईन दोन ठिकाणी क्षतिग्रस्त झाली असल्यामुळे नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत आहे.तर गोकुलधाम परिसरातील मातृसेवा संघाजवळ सुद्धा अशीच जलवाहिनी फुटली आहे.

असे प्रकार नुकतेच समोर आले असतांना पुन्हा हा केजीएन सभागृहाजवळील पाण्याचा अपव्यय होत असल्याचा प्रकार उघड़कीस आला असून संबंधित कंत्राटदार तसेच अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसुन येत आहे.शहरात एकीकडे पाण्याची टंचाई दिसून येत आहे, जनतेला पाणीटंचाईच्या झळा पोचत असून अनेक सेवाभावी संस्था,पक्ष टैंकरद्वारे पाण्याचे वाटप करीत आहे.सदर पाणी वाया जावू नये याकरिता ही समस्या लवकरात लवकर निकाली काढ़ण्याचे आवाहन नागरीकांनी संबंधित जलपूर्ती विभागास केले आहे.