मराठा आरक्षणासाठी 50 टक्क्यांची मर्यादेची अट शिथिल करण्यासाठी संविधानात संशोधन विधेयक मंजूर करण्यासाठी सर्व पक्षीयांनी एकत्र प्रयत्न करावेत

25

🔹शरद पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे मराठा आरक्षणासाठी मतैक्य

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.९जून):-मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा वाढता कामा नये ही अट शिथिल करण्यासाठी संविधानात दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी संसदेत सर्व पक्षीयांनी एकत्र प्रयत्न करण्याची गरज आहे यावर आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले आणि राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष ज्येष्ठ नेते खा.शरद पवार यांच्यात मतैक्य झाले. आज सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी ना रामदास आठवले यांनी मराठा आरक्षण आणि पदोन्नतीमधील मागासवर्गीयांचे आरक्षण या विषयावर भेट घेऊन चर्चा केली. त्यावेळी शरद पावर यांनी मराठा अरक्षणासाठी सर्व पक्षीयांनी
एक्त्र प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे या साठी रिपब्लिकन पक्षाने नेहमी पाठिंबा दिला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी 50 टक्के आरक्षण मर्यादेची अट रद्द करण्यास सर्व पक्षीयांनी प्रयत्न करावेत ; आपणही केंद्रात प्रयत्न करणार असल्याचे ना.रामदास आठवले यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार पदोन्नतीमधील आरक्षणाचा निर्णय राज्य सरकार घेऊ शकते त्यानुसार महाविकास आघाडी सरकारने याबाबत निर्णय घ्यावा याबाबत ना रामदास आठवले यांनी खा.शरद पवार यांच्याशी चर्चा केली. त्यावर शरद पवार यांनी सांगितले की राज्य सरकार कायदेशीर बाबी तपासून मंत्रीमंडळाशी चर्चा करून याबाबत लवकर अनुकूल निर्णय घेण्याचा आपला प्रयत्न राहील. शरद पवार यांच्याशी झालेल्या भेटीत ना. रामदास आठवले यांच्या समवेत रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर उपस्थित होते.