विश्वात आद्य शून्य संशोधक : आर्यभट्ट !

28

[आर्यभट्ट जयंती विशेष]

जगात पहिल्यांदाच शून्य संशोधक आर्यभट हे भारताचे एक महान खगोलशास्त्रज्ञ, गणितज्ञ व भारतीय खगोलशास्त्राचे प्रणेते होते. त्यांनी वयाच्या अवघ्या २३व्या वर्षीच आर्यभट्टीय हा ग्रंथ लिहिला. त्यांचे बालपण व उर्वरित आयुष्यकाळ पाटलीपुत्र याच नगरीत गेले. खगोलशास्त्रज्ञ म्हणून त्यांचे कर्तृत्व असामान्य आहे. आर्यभट्टांचा जन्म दि.१२ जून ४७६ रोजी तेव्हाच्या अश्मक प्रदेशात म्हणजेच महाराष्ट्रात झाला. पुढील शिक्षणासाठी ते कुसुमपुरा येथे गेले. कुसुमपुरा म्हणजे आजचे बिहार राज्यातील पटना शहर होय. आज उपलब्ध असलेल्या भारतीय खगोल शास्त्रीयग्रंथांत पहिल्या आर्यभट्टांच्या आर्यभटीय किंवा आर्यसिद्धान्त या ग्रंथाहून दुसरा प्राचीन ग्रंथ नाही. आर्यभटीय हे नाव आर्यभट्टांनीच दिले आहे. त्यांचे शिष्य वराह मिहीर, लल्ल वगैरे त्यास आर्यसिद्धांत म्हणून संबोधायचे. त्या ग्रंथात दशगीतिका व आर्याष्टशत असे दोन भाग आहेत. हे दोन भाग निरनिराळे ग्रंथ असल्याचे काही तज्ज्ञांचे मत आहे.

परंतु हे दोन्ही भाग एकमेकांवर अवलंबून असल्यामुळे दोन्ही मिळून एकच सिद्धान्त मानणे संयुक्तिक आहे. त्याचे चार पाद असून त्यात अवघे एकशे एकवीस श्लोक आहेत. दशगीतिका भागात तेरा श्लोक असून त्यातील तीन प्रार्थनापर आहेत. उर्वरित दहा श्लोकांत ग्रह भगणासंबंधीचे विवेचन आहे. भगण म्हणजे ग्रहांची नक्षत्रमंडळातून एक पूर्ण प्रदक्षिणा होय. या ग्रंथाचे चार पाद असे- १) गीतिकापाद, २) गणितपाद, ३) काल क्रियापाद व ४) गोलपाद. गीतिकापादात अक्षरांच्या आधारे संक्षेपात संख्या लिहिण्याची स्वनिर्मित पद्धती अवलंबलेली आहे. खगोलशास्त्र किंवा गणित श्लोकबद्ध लिहावयाचे असेल, तर ही गोष्ट आवश्यक असते.

गणितपादात अंकगणित, बीजगणित, रेखागणित यांचे सूत्ररूप नियम अवघ्या तेहतीस श्लोकात समाविष्ट केलेले आहेत. संख्यालेखन, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्ग, घन, वर्गमूळ, घनमूळ, त्रिकोण, चौकोन, वर्तुळ यांचे विवेचन त्यात आहे. त्रिभुज, वृत्त व अन्य क्षेत्रांचे क्षेत्रफळ, घनफळ, भुजा, त्रिज्या साधन व त्या संबंधीचा विचार यांसह गणितश्रेणी, वर्गश्रेणी, त्रैराशिक पद्धती, बीजगणित पद्धती, विविध कुट्टके असे अनेक विषय आहेत. काल क्रियापादात कालगणना, युगे, कालविभाजन, ग्रहांची मध्यम व स्पष्ट गती वगैरेंचा समावेश आहे. महान गणितज्ञ आर्यभट्टांनी ‘आर्यभटीय’ ग्रंथाची रचना वयाच्या अवघ्या २३व्या वर्षी केली. यावरून त्यांच्या कुशल बुद्धिमत्तेची व प्रतिभेची कल्पना येऊ शकेल. आर्यभटीय ग्रंथ संक्षिप्त असला तरी त्याची रचनापद्धती अत्यंत सुसंबद्ध व शास्त्रीय असून त्याची भाषा अत्यंत सुस्पष्ट व अचूक आहे. त्यांचे सिद्धांत प्रत्यक्षात अनुभवास येतात काय? या प्रश्नाचे उत्तर होय, असेच द्यावे लागते. दृक्प्रत्ययावरून देखील त्यांची योग्यता फार मोठी आहे, हे पटते.

आर्यभटीय ग्रंथ व त्या पूर्वीचे खगोलशास्त्रीय ग्रंथ यांच्या भाषेत फरक आहे. आर्यभट्टांनी आपल्या या ग्रंथात संख्या दर्शनासाठी पूर्वीप्रमाणे भू=१, राम=३ अशा शब्दांचा वापर केलेला नाही, तर अक्षरांचा वापर केलेला आहे. त्यांनी एका सूत्रात सर्व संख्या क्रमशः स्थानपरत्वे दसपट होतात, असे सांगितले आहे. त्याशिवाय त्यांनी विशिष्ट अक्षरांना ठरावीक किंमत व स्वरांना ठरावीक स्थाने देऊन सर्व संख्या अक्षरलिपीत लिहिण्याची सोय केलेली आहे. “वर्गाक्षराणी वर्गेऽ वर्गेऽ वर्गाक्षराणी कातङ मौयः। खद्विनवके स्वरा नववर्गेऽ वर्गे नवान्त्यवर्गे वा॥” एकं, शतं, दशसहस्त्र, दशकोटी, खर्व, महापद्म, जलाधी, मध्य ही वर्गस्थाने समजावीत व त्या ठिकाणी क, ख, ग पासून प, फ, ब, भ, म पर्यंत अक्षरे म्हणजे क, च, ट, त, प वर्गातील अक्षरेच घालावीत. त्यांच्या किंमती क=१, ख=२ ते म=२५ अशा समजाव्यात. दशसहस्त्र, लक्ष, कोटी, अब्ज, निखर्व, शंकू, अंत्य, परार्ध ही अ वर्गस्थाने समजावीत. यात य पासून ह पर्यंतची अक्षरे घालून त्यांच्या किंमती ३० ते १००पर्यंत समजाव्यात. त्यांची ही अक्षरांक परिभाषा वैशिष्ट्यपूर्ण आहे. आजच्या दशमानपद्धतीचा आढळ त्यामध्ये दिसून येतो.

आज जगमान्य झालेली अंकपद्धती ही दशमानपद्धती म्हणून ओळखली जाते. ह्या पद्धतीमध्ये स्थानापरत्वे अंकाची किंमत बदलते. उजवीकडून डावीकडे जी स्थाने असतात त्यांची किंमत दसपटीने वाढत जाते.त्यांनी याच ग्रंथात सूर्यमालेविषयी कल्पना मांडलेली आहे- ‘विश्वाच्या मध्यभागी पृथ्वी एखाद्या चेंडूसारखी लोंबत आहे. ती तारामंडळाच्या वर्तुळ केंद्राजवळ आहे. पृथ्वीभोवती ग्रहांच्या कक्षा आहेत. कदंब पुष्पात ज्याप्रमाणे मध्ये गोल असून त्यात सर्व बाजूंनी पुष्पतंतू चिकटलेले असतात, त्याप्रमाणे पृथ्वीगोलास सर्व बाजूंनी प्राणी चिकटलेले आहेत.’ त्यांना पृथ्वीच्या दैनंदिन गतीची कल्पना होती. पृथ्वी स्थिर नसून ती परिवलन करते ही कल्पना पाश्चात्त्यांना उशिरा आली. आर्यभट्टांनी गोलपाद अध्यायात या कल्पनेचे स्पष्टीकरण एका सुंदर उदाहरणाद्वारे केले आहे- “अनुलोमगतीनौंस्थः पश्चत्यचलं विलोमगं यद्वत्। अचलानि भानी तद्वत्समपश्चिमगानि लङ्कायाम॥” (नदीच्या प्रवाहाच्या दिशेने जाणाऱ्या नावेवरील माणसास ज्याप्रमाणे काठावरील डोंगर, टेकडी किंवा स्थिर वस्तू प्रवाहाच्या उलट दिशेने मागे जात आहेत असे वाटते.

त्याचप्रमाणे लंकेतील-विषुववृत्तावरील मनुष्यास नक्षत्रे स्थिर असूनही पूर्वेकडून पश्चिमेकडे सारख्याच गतीने जात आहेत असे वाटते.) श्रीपतीने आर्यभटाच्या पृथ्वी फिरते या कल्पनेचे खंडन केले आहे. त्याने पृथ्वी स्थिरच आहे असे आवर्जून सांगितले. आर्यभट्टांवर टीका करणारे जसे निघाले, तसे त्याचे समर्थकही होते. पृथूदक स्वामीने त्यांच्या कल्पनेचा पुरस्कार केला- “भपञ्जरः स्थिरो भूरेवावृत्यावृत्य प्रतिदेवसिकौ। उदयास्तमयौ संपादयति नक्षत्रग्रहणाम॥” (भगोलाच्या पिंजऱ्यात मध्यभागी राहून स्वतःभोवती प्रदक्षिणा करून फिरता फिरता पृथ्वीच नक्षत्र व ग्रहांचे उदयास्तरूपी दैनिक चमत्कार घडवून आणते.) आर्यभट्टांनी पृथ्वीचा आकार गोल असल्याचे विवेचन केले आहे- “वृत्तभञ्जरमध्ये कक्ष्या परिवेष्टित: खगमध्यगतः। मृञ्जलशिखिवायुमयो भूगोलः सर्वतो वृत्तः॥” (वर्तुळाकार अशा नक्षत्रांच्या पिंजऱ्यात म्हणजेच नक्षत्रांनी बनलेल्या खगोलाच्या मध्यभागी ग्रहांच्या कक्षांनी परिवेष्टित अशी पृथ्वी आकाशमध्यावर आहे. तसेच माती, पाणी, तेज व वायू यांनी बनलेला हा भूगोल, पृथ्वीरूपी गोल सर्व बाजूंनी गोल आहे.) त्यांनी सूर्यसन्मुख असलेला पृथ्वीच्या नक्षत्रांचा भाग प्रकाशमान असून सूर्यविन्मुख भाग अंधारात असतो, असे स्पष्ट प्रतिपादन केले होते.

चंद्रग्रहणाची कारणे राहू व केतू नामक दैत्य नसून पृथ्वीची छाया व चंद्र हेच आहेत, ही गोष्ट त्यांना ज्ञात होती. त्यांना दृक्-भेदाचीही कल्पना होती. भूपृष्ठावरून खगोलाचे होणारे दर्शन हे भूमध्यापासून होणाऱ्या दर्शनाशी तुलना केल्यास भिन्न होते. या दोन दिशांत होणारा कोन दृक्‌भेद कोन म्हणून ओळखतात. ही प्राचीन सिद्धान्तकारांस अज्ञात असलेली गोष्ट आर्यभट्टांनी प्रथम सांगितली. त्यांचे हजार वर्षापूर्वी प्रतिपादित काही सिद्धांत आज आपणास चुकीचे वाटतीलही, परंतु त्याची योग्यता फार मोठी होती, हे मान्य करावेच लागेल. तत्पूर्वी अस्तित्वात असलेले खगोलशास्त्रीय सिद्धांत टाकाऊ झाले होते. त्या सिद्धान्तानुसार केलेले गणित व प्रत्यक्ष निरीक्षण यांत मेळ बसत नव्हता. त्यांनी गणित व खगोलशास्त्रांत मेळ घालण्याचा प्रयत्न केला. भारतीय गणित व खगोलशास्त्रांचा आद्य प्रणेता, असे वर्णन आर्यभट्टांचे करावे लागेल. त्यांचा मृत्यू इ.स.५५० साली झाला असावा, असा तर्कवितर्क लावला जातो.

!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे भारतीय महान शास्त्रज्ञ आर्यभट्ट व त्यांच्या संशोधनास विनम्र अभिवादन !!

✒️संकलन व शब्दांकन:-श्री निकोडे कृष्णकुमार गुरुजी(संत साहित्य अभ्यासक)मु. पो. ता. जि. गडचिरोली.व्हा.नं. ७४१४९८३३३९.