जिगाव प्रकल्पाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर “भीमसागर प्रकल्प” नाव द्यावे

31

जिगाव प्रकल्पाला महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देणे म्हणजे त्यांच्या कार्याचा गौरव आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य केले आहे मात्र त्यांची ओळख भारतीय संविधानाचे निर्माते,शिल्पकार, दलितांचे कैवारी, दलितांचा नेता आणि फक्त बौद्ध समाजाचा उद्धार करता अशीच सांगण्यात येते किंवा दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येतो. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे खूप विचारवंत आणि सर्वसमावेशक सर्वगुण संपन्न असे व्यक्तिमत्त्व होते ते उत्तम लेखक,पत्रकार,कायदेपंडित,संसदपटू,अर्थतज्ञ,समाजतज्ञ,धर्मतज्ञ,शिक्षणतज्ञ,कामगारांचा नेता,आरक्षणाचे जनक जातीयवादाचे कट्टर विरोधक, महिला उद्धारक, शेतकऱ्यांचे नेते अशा विविध क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

जिगाव प्रकल्पाला महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देणे हा काही भावनिक मुद्दा नाही त्यांनी सिंचन क्षेत्रात केलेले कार्य अमूल्य असून ते जनसामान्यापर्यंत पोचले पाहिजे हा त्यामागील उद्देश आहे. स्वतंत्र भारताच्या मंत्रिमंडळात ते १३ महत्त्वपूर्ण खात्यांचे मंत्री होते. त्यापैकी पाटबंधारेमंत्री हे खाते सुद्धा त्यांच्याकडे होते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पाटबंधारे मंत्री असताना विविध प्रकल्प हे त्यांच्या संकल्पनेतून निर्माण झाले आहे. त्यामधील सर्वांच्या परिचित असलेले भाकरा नांगल हा एक प्रकल्प आहे. त्याचबरोबर नदीजोड प्रकल्प हे त्यांची संकल्पना सध्याच्या परिस्थितीशी तंतोतंत लागू होते. शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी तसेच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आधी शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळाले पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. भारत हा कृषीप्रधान देश आहे म्हणून जोपर्यंत भारतातला प्रत्येक शेतकरी वर्ग सुखी होणार नाही तोपर्यंत भारताचा विकास होणार नाही ही त्यांची भूमिका होती.

सिंचन क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य करून देखील आज पर्यंत देशातील कोणत्याही प्रकल्पाला त्यांचे नाव देण्यात आले नाही. म्हणून त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून व त्यांचे कार्य देशातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी जिगाव प्रकल्पाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर “भीमसागर प्रकल्प” नाव द्यावे ही मागणी योग्य आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे अर्थतज्ञ होते त्यांच्या संकल्पनेतून भारतात आज रिझर्व बँक ऑफ इंडिया स्थापन झाली आहे.असे असून देखील कोणत्याच बँकेला त्यांचे नाव देण्यात आले नाही किंवा त्यांच्या नावाने कोणतीच बँक स्थापन करण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी केलेले कार्य आजपर्यंत जनते समोर आले नाही किंवा त्यांच्या कार्याचा कुठेच उल्लेख करण्यात येत नाही ही शोकांतिका आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शेती विषयी महत्त्वपूर्ण कार्य केले शेतकऱ्यांच्या समस्या सोडवून उपाययोजना करण्यासाठी पाणी,वीज आणि शेतीचा सूक्ष्म विचार त्यांनी केला. देशात शेती शेतकरी आणि शेतीशी संबंधित समूहाचा विचार छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांनीच केला वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षातच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील शेती आणि शेतकरी यांचे संशोधन करून “लहान शेतकऱ्यांच्या समस्या आणि उपाय” हा शोधनिबंध लिहिला. शेतीसाठी जमीन व पाणी हे मुख्य घटक आहेत पाण्याशिवाय शेतीचा विकास अशक्य आहे. शेतकऱ्यांना शाश्वत पाणी मिळणे गरजेचे आहे. पाण्याशिवाय उत्पादकता वाढेल आणि शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावणे शक्य नाही हे त्यांनी ब्रिटिश सरकारच्या निदर्शनास आणून दिले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चिंतन करण्याचा विचार मांडणाऱ्या आणि त्यासाठी चळवळी उभ्या करून या देशातील शेती,शेतकऱ्यांचे प्रश्न डॉ.बाबासाहेबांना संपवायचे होते यासाठी त्यांनी २५ हजार शेतकऱ्यांचा पहिला मोर्चा काढला एवढेच नाही तर त्यांच्या नेतृत्वात सात वर्ष दीर्घकाळ शेतकऱ्यांचा संप झाला. जाती विसरून सर्वांनी एकत्र आल्यास देश तुमच्या हातात येईल असे ते सांगत होते. शेतकऱ्यांचा हिताचे निर्णय त्यांनी घेतले यासारखे अधिक व्यापक कार्य महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केले आहे.

अनेक वर्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पाण्यासाठी संघर्ष केला समाजातील दुर्लक्षित घटकाला हक्काचे पाणी मिळावे यासाठी त्यांनी जनआंदोलन केले. म्हणून या सर्व कार्याचा विचार करून जिगाव प्रकल्पाला महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर “भीमसागर प्रकल्प” नाव द्यावे ही मागणी योग्य आहे. यासाठी प्रत्येक लोकप्रतिनिधींनी,सामाजिक कार्यकर्त्यांनी,पत्रकारांनी,साहित्यिकांनी आणि राजकीय पुढाऱ्यांनी एकत्र येऊन या प्रकल्पाला महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यासाठी पुढाकार घ्यावा असे सर्वांना जाहीर आवाहन करीत आहे.

प्रकल्पग्रस्त
✒️संतोष रामकृष्ण तायडे मो.9372944579,नांदुरा जिल्हा बुलढाणा.