नो इंडिया, नो हिंदुस्थान! ओन्ली “भारत”

30

मा.सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार १५ जून २०२१ पासून सगळीकडे दैनंदिन व्यवहारात आपल्या प्रिय आणि महान देशाचा उल्लेख “भारत” या नावानेच करण्यात येणार असल्याचे ऐकून अतिशय आनंद झालेला आहे.जगातील एक आदर्शवत अशा भारतीय संविधानातही विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अतिशय स्पष्टपणे या देशाचा उल्लेख “भारत” असाच केलेला आहे. स्वातंत्र्य पूर्व काळात म्हणजे इंग्रज या देशात आल्यापासून आपल्या देशाची ओळख त्यांनी “India” या नावाने देखील ठेवली होती. इतर सर्व देशांबरोबर संबंध प्रस्थापित केल्यानंतर हे नाव सगळीकडे रुढ झालेले असल्याने कारभार/कामकाजात गफलत होऊ नये म्हणून बाबासाहेबांनी “India” म्हणजेच “भारत”असा उल्लेख केला होता.परंतु काही जातीयवादी शक्ती आणि संघटनांनी धार्मिक कट्टरता रुजविण्यासाठी जाणीवपूर्वक आपल्या देशाचा उल्लेख “हिंदुस्थान”असा करतात हे पूर्णतः चुकीचे आणि संविधान विरोधी आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकर हे प्रखर बुद्धिमत्ता असलेले तर होतेच शिवाय दूरदृष्टीचे होते.त्यांनी या देशाचा इतिहास, विविध जाती धर्म,पंथ आणि समुहाचा धार्मिक आणि सांस्कृतिक रुढी परंपरांचा सखोल अभ्यास करून स्वातंत्र्य सर्वसमानता आणि बंधुत्वाची सांगड घालून सर्वांना समान न्याय प्रदान करण्याच्या हेतूनेच भारतीय संविधानाची निर्मिती केली आहे.त्यांनी सर्वांगाने विचार करुनच आपल्या देशाचा उल्लेख ज्याअर्थी त्यावेळी रुढ असलेलं इंग्रजी नाव “India” म्हणजेच “भारत” असा केला आहे. त्याअर्थी त्यांना जर आवश्यकता वाटली असती आणि त्या शब्दाला गौरवास्पद अर्थ असता तर पुढे “हिंदुस्थान”अशाही नावाची सोय त्यांनी करून ठेवली असती.परंतु त्यांनी तसे केले नाही हे विशेष आहे.तसं पाहिलं तर “प्राचीन काळापासून केवळ रामायण महाभारतच नव्हे तर अगदी भगवद्गगीतेमधील सुरुवातीच्या ओळीतच “यदा यदा हि धर्मस्य…ग्लानीर्भवती भारत” असाच उल्लेख आढळतो ‘ग्लानीर्भवती हिंदुस्थान’ असा नव्हे. “हिंदू” या शब्दाचा उल्लेख अगदी पवित्र मानलेल्या पोथी-पुराणात कुठेही आढळत नाही.

या देशावर मुघलांनी आक्रमण केल्यानंतर इथल्या लोकांना तुच्छ लेखण्यासाठी “हिंदू” या फारसी शब्दाचा पहिल्यांदा उपयोग केल्याचे जाणकार आणि इतिहास संशोधक सांगतात. आणि म्हणूनच स्वाभिमानी असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी “हिंदुस्थान”या शब्दापासून अ्ंतर राखलं असणार यात शंकाच नाही.या निमित्ताने मुसलमान बांधवांना ही एक विनंती करावीशी वाटते की,त्यांनी आपल्या दैनंदिन व्यवहारात जिथे देशाच्या नावाचा संबंध येईल तिथे”भारत” हाच शब्द वापरला पाहिजे.कारण यातून अन्य कुठलाही हेतू असला तरी ‘हिंदुस्थान’ या शब्दाचा उपयोग केला तर अप्रत्यक्षपणे हा देश हिंदूंचा आहे आणि आम्ही उपरे आहोत हे कबूल केल्यासारखे होणार आहे.वास्तविक या शब्दाचा आग्रह धरणारे आर्य वंशाचे म्हणजे या देशात घुसखोरी केलेले लोक आहेत.सरकारनेही “इंडिया” या शब्दाप्रमाणे “हिंदुस्थान” या शब्दाच्या वापरालाही कायद्याने बंदी घातली पाहिजे.इतकेच !

✒️लेखक:-विठ्ठलराव वठारे(अध्यक्ष भारतीय जन लेखक संघ)
joshaba1001@gmail.com