इस्राईलमध्ये सत्तांतर : पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू पायउतार

26

मध्यपूर्वेतील महत्वाचा आणि भारताचा मित्र देश असलेल्या इस्राईलमध्ये सत्तांतर झाले असून पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचे सरकार गडगडले आहे. इस्राईलचे आजवरचे सर्वात शक्तिशाली व सर्वाधिक बारा वर्ष पंतप्रधान राहिलेले नेतान्याहू यांची काराकिर्द नवे पंतप्रधान नप्ताली बेनेट यांनी संपवली. नेत्यानाहू हरले असले तरी केवळ एक मताने हरले आहेत आणि नवे सरकार हे आघाडीचे सरकार आहे या सरकारात एकूण आठ पक्ष आहेत त्यामुळे नेत्यानाहू या आठ पक्षातील कोणत्याही एका पक्षाला आपल्या बाजूने वळवून पुन्हा सत्ता काबीज करू शकतात. नवे पंतप्रधान नप्ताली बेनेट यांच्याकडे ६० सदस्य आहेत तर बेंजामिन नेत्यानाहू यांच्याकडे ५९ सदस्य आहे.

बहुमतासाठी ६१ सदस्यांची गरज आहे पण एक अरब मुस्लिम पक्षाचा सदस्य आहे तो सरकार पक्षाच्या आघाडीत समाविष्ट आहे. पण मतदानाच्या दिवशी तो गैरहजर राहिला. त्यामुळे १ मताने नप्ताली बेनेट हे विजयी झाले. नप्ताली बेनेट हे पंतप्रधान बनले तरी ते आपला कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाही कारण आघाडीत झालेल्या करारानुसार नप्ताली बेनेट हे २०२३ पर्यंतच पंतप्रधान राहतील त्यांनतर येर लॅपिड हे पंतप्रधान होतील. नेत्यानाहू याला सत्तेसाठी सौदा म्हणत आहेत त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे प्रकरण सुरू आहे त्यामुळे हे सरकार जास्त दिवस टिकणार नसून आपण पुन्हा पंतप्रधान होऊ असा विश्वास नेत्यानाहू यांनी व्यक्त केला आहे. नेत्यानाहू पदच्युत झाले आणि इस्राईलमध्ये आघाडी सरकार आल्याने तिथे राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. नवीन सरकार अस्तित्वात आले तरी ते किती दिवस टिकेल याची शाश्वती कोणीही देऊ शकत नाही. नेत्यानाहू हे जरी पंतप्रधान पदावर नसले तरी त्यांची पंतप्रधानपदाची कारकीर्द मात्र कमालीची यशस्वी ठरली आहे.

त्यांनी त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात इस्राईलला लौकिक मिळवून दिला. इस्राईलचे सर्वाधिक यशस्वी व ताकदवान पंतप्रधान म्हणून त्यांची इतिहासात नोंद होईल. नुकत्याच पॅलेस्टाईनकडून झालेल्या हल्ल्यात त्यांनी ज्या पध्दतीने प्रतिउत्तर दिले. त्यातून इस्राईलची प्रतिमा उजळून निघाली.आम्ही कोणालाही घाबरत नाही असा संदेश त्यांनी जगभर दिला. त्यांनी ज्या पद्धतीने हवेतल्या हवेत क्षेपणास्त्र हल्ले परतवून लावले त्या तंत्रज्ञानाचेही कौतुक झाले. नेत्यानाहू यांनी आपल्या कारकिर्दीत भारताशी सलोख्याचे संबंध ठेवले. भारत आणि इस्राईल यांच्यात अनेक महत्वाचे करार झाले. नेत्यानाहू आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मैत्री तर जगजाहीर आहे. या मैत्रीतूनच भारत आणि इस्राईल यांचे संबंध आणखी दृढ झाले. चीन आणि पाकिस्तान बरोबर भारताचे वाद झाले तेंव्हा नेत्यानाहू यांनी भारताची उघडपणे बाजू घेतली. भारताचे सच्चे मित्र अशी त्यांची प्रतिमा होती.

खरेतर नेत्यानाहू यांचे सरकारही अस्थिरच होते तरीही त्यांनी बारा वर्ष सरकार चालवले. तेथील राजकीय परिस्थितीच अशी आहे तिथे कोणालाही बहुमत मिळत नाही तरीही नेत्यानाहू यांनी बारा वर्ष सरकार चालवून आपल्यातील मुत्सद्दीपणा जगाला दिला आता नवे पंतप्रधान नप्ताली बेनेट हा मुत्सद्दीपणा दाखवून आपले सरकार किती काळ टिकवतील हे पाहणे रंजक ठरेल.

✒️लेखक:-श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा पुणे)९९२२५४६२९५