निळ्या आंक्रदनाच्या ज्वालामुखीची कविता-अग्नीचा आदीबंध

24

✒️लेखक:-प्रा. संदिप गायकवाड(९६३७३५७४००)

यशवंत मनोहर यांचा ‘अग्नीचा आदीबंध’ हा सातवा कवितासंग्रह असून संविधानात्मक माणूस निर्मितीचा वर्कशाप आहे.समाजातील भावगर्भ चिंतनाचे सर्वोत्तम अंजिठा अग्नीचा आदिबंध या कवितासंग्रहात उमटलेला आहे.म्हणून मनोहरांची कविता नोबल ट्रूथ ठरली आहे.वर्तमान कोरोनाच्या महामारीचा जो अग्नीतांडव आपल्याला पाहायला मिळतो ती सत्यवाणी २००८ लाच कळून चुकली होती.ते “आता माणसानी” या कवितेत म्हणतात,

‘. ‘पृथ्वीवरल्या श्वासांचा
वंश वठाया लागला
विषाणूंनी चांदण्याचा
सारा गड सर केला.
……………….

. ….आता माणसांनी पुढे
स्वतःशीच भांडायचे
स्वतःलाच जिंकायचे
स्वतःलाच जपायचे. ही कविता लॉकडाऊनच्या काळातील “स्टे होम,सेव्ह लाईफ अँड सेव्ह नेशन”ची जाणीव करून देणारी कवीची भूमिका भविष्याचा अचूक वेध घेणारी आहे.कवीच्या कवितेतून अखंड क्रांतीची अणुऊर्जा तेवत असून अमाणूषतेवर अग्नीबॉम्ब सोडणारी आहे.”मला किनारेच नव्हते” या कवितेत म्हणतात,

तुमच्या हातातील उल्का मोजायला
मला फुरसतच नाही
मी सूर्यातले आणि माझ्यातले
अंतर मिटवून टाकण्यात यशस्वी झालो आहे
उजेड हेच आता माझ्या जगण्याचे नाव झाले आहे.
या कवितासंग्रहातील कविता सामाजिक आशयाने ओतपोत भरल़्या असून अभिव्यक्तीचा उत्कट आविष्कार आहे.मानवीय भीन्न अवस्थांचे मर्मबंध प्रकट करणा-या आहेत.मराठी ही आपली मायबोली असून ती सर्वांना समानसुत्रात गुफंणारी सूवर्णलंकार आहे.कविचे काळीज मराठीचे आहे ते”माझे काळीज मराठी” या कवितेत म्हणतात,

काळोखाशी वैर माझे
माझा उजेड मराठी
माझ्या मनात विजांचे
युध्द मांडते मराठी.
ही कविता मराठीचे महत्व विशद करते.

शब्द हे जगातील सर्वोतकृष्ट कलाकार आहेत.शब्दाच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर व म.जोतीराव फुले यांनी समाजक्रांती घडवून आणली.ज्ञानाची मशाल प्रज्वलीत करून अंधकारमय अज्ञाला समाप्त केले.नवे विज्ञानवादी तत्वप्रणालीचा उपयोग करून भारताला नवे संजिवन दिले.कवी “माझ्या शब्दांनो”या कवितेत म्हणतात,

माझ्या शब्दांनो,तुम्हाला काळीज असू द्या मातृत्वाचे

गरीब माणसांच्या भोवती संरक्षणाची भींत व्हा तुम्ही
तुम्ही धगधगत्या क्रांतीचा नकाशा दाखवा सर्वांना
माझ्या पेटत्या काळजातील अग्नीचा आदिबंध व्हा तुम्ही…..
पेटणा-या शब्दातून नवा समृध्द भारत निर्माण व्हावा ही ईच्छा कवीची आहे.मनोहराच्या कवितेत विद्रोह,नकार,वेदना यांचे अनुबंध जोडले असून , संविधानात्मक विचारांचे बिजारोपण झाले आहे.गुलाम व्यवस्थे विरूद्ध मानवमुक्तीचे महायुध्द् लढणार हा कवी स्वप्नाच्या स्वप्ना या कवितेत सूर्यकुलाशी नाते जोडतो .माणसाच्या सौंदर्याचे विमुक्त मन मांडतो ते म्हणतात,

हे स्वप्नाच्या स्वप्ना
…………….
तू जोडलास माझ्या भावनांचा मोहर सूर्यकुलाशी.
……………..
तू करून दिलास मला नकारांचा परिचय
निर्माण केलेले माझ्यात हिंस्र संकटांशी भांडण्याते बळ.
दिलेस विद्रोहाचे अग्निध्वज खांद्यावर.
………….
मला शिकविलीस सौंदर्याची माणुसकी आणि फुलारलास माझ्या वाणीत.कवी हा स्वजाणीव केंद्रातून विश्वकल्यानाचा ध्यास धरतो.माणसाने मानवाच्या उत्थांनासाठी काम करावे .

भेदाभेदाच्या सा-या भिंती गळून पडाव्या पण काही कवी सौंदर्याचे लालित्य लावून भ्रमाच्या जाळ्यात वातकाला अडकवितात त्यामुळे वास्तवाचा उजेड दिसत नाही म्हणून “हे कवी”या कवितेत म्हणतात,हे कवी !तू माझ्या काळजाला तप्त वाळूवरून का चालवतोस ?ज्वालांच्या टोकांशी बांधतोस आणि ज्वाला वातचक्रात कां सोडतोस?तुझ्यामुळे लोकांना माझ्या एका काखेत चंद्र आणि दुस-या काखेत सूर्य दिसतो लोंकाना माझ्या एका खांद्यावर ढग आणि दुस-या खांद्यावर सागर दिसतो.

ही कवितेच्या मोहरांने मोहरून आली असून कवीच्या हातात ज्वालाचे झेंडे असून आयुष्याच्या गरीब कागदावर सुंदर लेणे कोरत आहेत.कविता ही क्रांतिची ठिणगी असावी विषमतेच्या/असैवधानिक प्रतिक्रांतीच्या षडयंत्रावर आसूड ओढणारी असावी. कवीला आर्ई-बापाकडून जीवनाचे तत्वज्ञान मिळाले असून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्ञानकिरणांनी कवीला महासूर्याची ओळख झाली आहे.”हे माझ्या बापा “या कवितेत म्हणतात,

बापा! ज्वालामुखीच्या वावरातज मला प्रेरणारा शेतकरी तू
तू माझा बाप,तू माझ्यासाठी पेटलेल्या रणांगणासारखा.

बापानेच कवीच्या रक्तात क्रांती पेरली आहे.बापास या कवितेत म्हणतात,

तुझा पाहिला बुध्द् शेतामध्ये तू
तीर्थाकडे सर्व फिरवून पाठ
अंधार मेला तुला घाबरूनी
अशी होती दीक्षाभूमीची पहाट.

धम्मचक्र प्रर्वतनाच्या क्रांतीने आम्हाला बुध्द् मिळाला.आज अयोध्येच्या उत्खननातून बुध्द् उगवतो आहे.इतिहासकालीन चित्राची सत्यता अधोरेखित होत आहे.कवीला बापा बरोबर आईने वात्सल्याची संवेदना दिली असून लढण्याचे नवे ऊर्जास्वल मिळाले आहे .ते “आई “या कवितेत म्हणतात की,

आईने मला अन्नाऐवजी निखारेच चारले
जिद्द ठिणग्या पेरल्या श्वासात
तिच्यामुळे मी जळत नाही वणव्यात
तिच्यामुळे मी वाट चुकत नाही अरण्यात.

आईच्या गर्भजाणीवेतून कवी प्रस्थापित व्यवस्थेवर शब्दाच्या नवनिर्मितीतून समाज परिर्वतन करत आहेत.
आज सारे जग कोरोना विषाणूच्या महामारीने ग्रस्त असून नवीन उलथापालथ घडून येत आहेत.जगाला सुक्ष्मजीवाने बंदिस्त करून टाकले आहे.या उलथापालथीतून माणसाने कोणता धडा घ्यावा हे माणसावर अवलंबून आहे हा संदर्भ कवीच्या उलथापालथीचा धडा या कवितेत रेखांखित झालेला आहे.ते म्हणतात,

मी बदलले फुलांचे रंग;मी क्षितिजांची ठिकाणे बदलली
मी जमिनीला दिले निळे रक्त ;
तिने मला निळी कविता दिली.
…………………….
वादळलेला सूर्य मी,मला विझून शांत नाही होता आले
भयंकरत्व पाहिले दुनियेने आणि मन उलथापालथीचाच धडा झाले.

ही कविता मूल्यसापेक्ष जीवनाचा आरशा प्रकट करणारी आहे.
अग्नीचा आदिबंधातील प्रत्येक कविता आशयपुर्ण असून ,नव्या संविधानात्मक माणूस निर्मितीचा प्रयोग आहे.संपृक्त रसायनाच्या रासायनिक क्रियेतून नवे सेंद्रिय रेणूतत्व तयार करणारी कार्याशाळा आहे.कवीचे अंतरंग व बाह्यंग समान असून “मी भारतीय”या कवितेतून स्वतःच्या मनोभावनेला वाट मोकळी करून देतांना लिहितात,

धरतीवरील सकल प्राणीमात्रांचे कल्याण
ही आहे माझी भारतीयता .
तेच आहे माझे असीम भारतीयत्व
मी नाही हिदुस्थानी
वा कोणताही स्थानी
मी आदी-अंती आहे माणुसकीस्थानी.

ही कविता उत्कष्ट माणूसकिते नाते अधोरेखित करते.
या कवितासंग्रहातील बंधो,खैरलांजी ,तर मी काय करू?या कवितेची उंची ज्ञानपीठ पुरस्कारापेक्षा तोडीची असून गीताजंली काव्यांकाच्या कितीतरी पुढची आहे.ही कविता विश्वबंधुतेचा आदिबंध असून नव्या विश्वाचे बुध्दमय ऊर्जायान आहे.ते “बंधो” यात म्हणतात,

बंधो,!पानांऐवजी बोधिवृक्षाला भाले येऊ शकतात
पण आम्ही हे होऊ देणार नाही
आम्ही बोधिवृक्षाला
करुणेची कार्यशाळा मानतो.
करुणेचे डोकेही संतापू शकते.
आम्ही हे टाळू ,करुणेला आम्ही माणूसकिचे विद्यापीठ मानतो
आणि प्रज्ञेला आम्ही मैत्रीचा अभ्यासक्रम मानतो.
…………..

बंधो!पण मी एवढेच करीन
माझ्या हातातील वणव्यांनी
विषमतेच्या सा-याच चौक्यांना आग लावीन
…………
बंधो! आपल्या छातीतील ढगांचे
आक्रंदन
आपणच नीट ऐकायला हवे.

अतिशय भारदस्त कविता मानवीय मनापासून इतिहासातील दाखले देत बुध्दाचा करुण भावार्थ उच्चकोटीतून प्रतिबिंबित झाला आहे.
भारतीय समाजाला हादरवून सोडणारी खैरलांजीची अमानविय कौर्यतेने माणूसकिचे सारे संदर्भ गळून पडले.परिर्वतनिय घराला अपरिर्वतनिय श्वापदे नेस्तनाभूत करतात याप्रसंगाने कवी विस्फोटक बनलेले दिसतात .खैरलांजी या कवितेतून आपल्या ज्वालाग्राही शब्दाना प्रकट करतात,

खैरलांजीत शिरलो तेव्हा
निळ्या श्वासांच्या आक्रंदनाशिवाय
मला काही ऐकू आले नाही
त्यावेळी खूप उत्कटपणे वाटले
आपल्या मनातील ज्वालामुखी
खैरलांजीवर उधळून द्यावा.
………………………
आमच्या डोक्यात उजेडाचा ग्रंथ
आणि नजरेत क्रांतीचा नकाशा आहे
रक्तविहीन बदलाचे आंदोलन आम्ही.
युध्दच नको म्हणणा-या आम्हाला
महायुध्द्च व्हायला भाग पाडू नका….

ज्वालामुखीचा विस्फोट करुन तीला ध्वस्त करावे असे वाटते पण कवी न्यायाने लढणार आहे.ते सुरूंग पेरण्याची भाषा करतात तरी त्यातून कोणतीही हिंसा होणार नाही याची काळजी घेतात.आता तुम्ही आमचा अंत पाहू नका इशारा देतात.
“तर मी काय करू “या कवितेतून माणसाच्या नवनिर्मितीची कार्यशाळा तयार करताना माणूस जर बदलत नसेल तर मी काय करू असा उपरोधात्मक प्रश्न स्वतःलाच करतात,

क्रांती म्हणजे नवनिर्मितीचा अभ्यासक्रम
तुमचे नवनिर्मितीशीच वैर असेल
तर मी काय करू.?

कवी हा अग्नीच्या प्रकाशपर्वाने नाहाऊन निघालेला आहे.बुध्द तत्वज्ञान,आंबेडकरी विचारशीलता , जोतीरावाचे अखंडत्व यांनी सहसंयुजबंध झाले आहेत.नव्या मूल्यगर्भाची तक्षशिला /नांलदा त्यांनी निर्माण केली असून महाड क्रांतीची धगधगती ज्वाला आपल्या मनात पेरली असे वाटते.

अग्नीचा आदिबंध मधील अनेक कविता मूल्यमंथनात्मक असून नवा देश जोडणा-या आहेत.परिवर्तनाचे श्वास,साक्ष, तू करुणेचा चांदबंद,एक दिवस या कवितेतून नवा आयाम पाहायला मिळतो. कवी हे आंबेडकरवादी कवितेच्या प्रांतातील शब्दांग्नी असून ऊर्जावान बारूदाचे नवे क्षेपणास्त्र घेऊन विषमतेच्या /समरसतेच्या असत्याला उध्दवस्त करत निघाले आहेत.ख-या निळ्या भीमसैनिकाची कविता , नव्या ज्वालामुखीच्या टोकावर उभी आहे म्हणून ही कविता निळ्या आंक्रदनाच्य ज्वालामुखीची कविता असून. सत्यासाठी संसद शोधणारी ,शीलवंत न्यायालयाच्या शोधात , भारतीय संविधानाला डोक्यात घेऊन युगप्रवर्तनासाठी विद्रोहाचा चारित्र्य शोधणारी आहे.नव्या युगाची युगंधर पेरणी करणारी कविता आंबेडकर चळवळीतील अगतिशीलतेला गतिमान करणारी असून विश्वशांतीचा ध्यास देणारी बुध्दमय भारताची क्रांती कविता आहे.
कवीच्या पुढील काव्यांक आविष्कारासाठी मंगलकामना चिंतितो.
🙏 धन्यवाद🙏