युगमुद्रा: ग्लोबल युगाची ज्वालाग्राही कविता

28

✒️लेखक:-संदीप गायकवाड(९६३७३५७४०)

उत्थानगुफांच्या काव्यप्रवासापासून सुरू झालेला कवी यशवंत मनोहरांचा काव्यांक प्रवास थांबला नाही तर अधिक प्रखरतेने प्रस्फोटीत होत आहे.नव्या शब्दाच्या आविष्कारातून मराठी कवितेला नवी उभारी देण्याचे क्रांतीकारी कार्य ते करत आहेत.कवीची शब्दभूक दिवसेन दिवस वाढत असून बदलत्या ग्लोबल जाणीवांचा संदर्भ घेऊन रणांगणावर स्वः युगमुद्रा कोरत मानव्याचे राजगृह बांधत आहेत.ही त्याची जिद्द अतिशय वाखण्याजोगी आहे.महात्मा जोतीराव फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीकारी कार्याच्या मूल्यगर्भातून विषमतेचे सारे बँरेकट्स उध्दवस्त करून सूर्यकुलाचे नवे नाते सांगत सूर्यमुखी होण्याचे आव्हान युगमुद्रा हा कवितासंग्रह करत आहे.
मनोहराच्या कवितेतील अग्नीपथ इतका तेजस्वी आहे की अलोकतांत्रिक व्यवस्थेच्या साऱ्या मुळांना गदगदा हालवून जमीनदोस्त करण्याचे काम या कवितेतून दिसून येते.

जीवनाच्या नव्या परिपेक्ष्यातून आंबेडकरी क्रांतीची मशाल प्रखर उज्ज्वलीत करणारी ही कविता लोकशाहीचा मुल्यवर्धन आविष्कार आहे.मनोहरांची शब्द शैली इतर कविपेक्षा वेगळी असून चमकदार , चटकदार , रजंकवादी,लैगिक व श्रृगांरिक शब्दाचा वापर न करता प्रस्थापित कुव्यवस्थेबरोबर विद्रोह , नकार व महायुध्द् अश्या लढणाऱ्या शब्दज्वालाचा उपयोग करून जग परिवर्तन करण्याचा त्याचा प्रयत्न अतिशय चिंतनीय व क्रांतिकारक आहे.साहित्य मानवी जीवनाला नवा आयाम देणारा तेजःपुंज आहे.अंधकारमय मानवाच्या जीवनात ज्ञानाची सूर्यपौणिमा पेरणारी विजयोत्सव आहे.वंचिताच्या जीवनात नव्या प्रगतीचे पंख देणारे आत्मबल आहे.साहित्या विषयी गॉकी म्हणतो की,”शब्द आणि कल्पनाच्या साधनावर उभारलेल्या या कलेचे खरे वैशिष्ट्य मानवी चुकांचे ज्ञान करून देणे हेच आहे असे म्हणता येत नाही.मानवाला त्याच्या बाह्य जीवनाच्या परिस्थितीतून वरच्या पातळीवर नेण्याचा प्रयत्न करावे.

त्याला कमीपणा आणणाऱ्या वास्तव जगाच्या बंधनातून मुक्त करणे आणि तू गुलाम नाहीस.तू वास्तव जगाचा धनी आहेस.तू जीवनाचा स्वतंत्र्य निर्माता आहेस.असा साक्षात्कार मानवाला करून देणे हे वाड:मयाचे खरे वैशिष्ट्य आहे.त्या अर्थाने वाड:मय सदैव क्रांतिकारक असते.”ही भावना मनोहरांच्या काव्यात ओतपोत भरली आहे.गुलामगिरी करणाऱ्या साऱ्या व्यवस्थेवर कवी तुटून पडतो आणि वाचकाला नव्या क्रांतीचे ऊर्जाबळ देतो.युगमुद्रा या कवितासंग्रहातील कविता न्यायाच्या दिशेने निघाली असून अन्याय करणाऱ्या मुजोर व्यवस्थेवर शब्द प्रहार करतो.समीक्षक अक्रम पठाण यशवंत मनोहरांच्या कवितेविषयी म्हणतो की,”माणसाची कितीही जरी वाताहात झाली तरी माणूस शरणागती पत्करणार नाही.माणूस आपल्या वाताहतीमधून उठतो , नव्या वाटा निर्माण करतो .अशा अजिंक्य माणसाचे चरित्र निर्माण करणे हेच कवी यशवंत मनोहरांच्या कवितेचे मर्मस्थान आहे.

“मनोहरांची कविता लालित्यपुर्ण नसून वेदनावर फुंकर घालून उच्च जीवनाची वैैज्ञानिक मांडणी करणारी सेद्रिंय इहवादी कविता आहे. मनुष्याच्या आंतरीक व बाहेरील मर्मभेदाची उत्कटता शब्दाच्या आविष्कारातून प्रस्तुत करते.डॉ.निर्मलकुमार फडकूले मनोहरांच्या कवितेविषयी म्हणतात की,”वादळी विचारांची आक्रमक आवेश असलेली मनोहरांची कविता विषमता आणि शोषण या पारंपारिक अन्यायावर जिवाच्या आकांताने तुटून पडते.”ही सत्यशीलता या कवितासंग्रहात पाहायला मिळते.तर डॉ.आनंद तेलतुंबडे आपल्या समीक्षेत म्हणतात की,”आपल्या अटळ आंबेडकरी निष्ठा अबाधित राखीत त्यांनी पुरोगामी चळवळीशी दाखवलेली बांधिलकी शाषित -शोषितांच्या बाजूने घेतलेली खंबीर भूमिका आणि सत्ता -संपत्तीच्या आमिषाला न जुमानता आपल्या विद्रोहाशी राखलेले इमान या गोष्टी तरूण पिढीला नेहमी स्फुरणदायी ठरतील यात शंका नाही.”ही स्वाभिमानता कवीच्या कवितेतून निर्देशीत होत आहे.

मनोहराच्या कवितेतील मर्मबंध निखळ आनंद देणारे नसून परिवर्तनवादी विचारांचे पंख लावून तुरूंग फोडणाऱ्या गरूडासारखे आहेत.आकाशातील सारे क्षेत्र व्यापून नव्या क्रांतीजाणीवाचा विद्युततेज आहेत.मनोहरांच्या कवितेविषयी लक्ष्मण माने म्हणतात की,”शब्दांचा डौल आणि शब्दांचे वैभव कोणताही आक्रास्ताळेपणा न करता इंद्रियगोचर शिव्याशाप न देता व्यवस्थेच्या कानफाटीखाली कसे मारता येते हे यशवंत मनोहरांनी केशवसुतांच्या दर्जाची कविता लिहून दाखवून दिले आहे.” ही ताकत या कवितेत नक्कीच आहे.

युगमुद्रा हा कवितासंग्रह कवीचा दहावा कवितासंग्रह असून तो सायन प्रकाशन पुणे यांनी दिनांक- १४ नोव्हेंबर २०१६ ला प्रकाशित केला आहे.हा कवितासंग्रह अरूणाला समर्पित केला अाहे.या कवितासंग्रहात एकूण १५२ पाने असून ब्याएेंशी कवितेच्या माध्यमातून आपल्या अनुभवविश्वातून ग्लोबल मानवाची कविता चितारलेली आहे.कवितेचे एक -एक शिर्षक म्हणजे एक-एक कवितासंग्रह असल़्याचा भास होतो . कवितेच्या डोहात जसा जसा वाचक जातो तश तशी या डोहाची खोलीची गंभीरता वाढत जाते.कविच्या अंर्तगर्भातील सृजनोत्सवाची अद्भुत उत्कटता शब्दाच्या माध्यमातून व्यक्त होत असतांना मानवी मनाच्या स्पंदनाचा आलेख स्पष्ट करते.
भारत हा सर्वात मोठ्या लोकशाहीचा देश .ज्या लोकशाहीने जगाला नवा माणूस निर्माण करणारी नवसंजीवनी दिली.स्वातंत्र,समता , न्याय व बंधुभावाचा मूल्यजागर दिला.मनुव्यवस्था नेस्तनाभूत करून. इहवादी जीवनशैलीचा समानसूर्य दिला.सकल मानवाला विकास करण्याची समान संधी दिली.

पण आज ही लोकशाही राजकारणाच्या हातातील खेळणे झाले असून त्यांनी लोकशाहीला लॉकपमध्ये बंद करून हुकूमशाही तंत्राने राज्यकारभार चालवत आहेत.ही लोकशाहीची बंदिस्तता कवीला बेचैन करते,अस्वस्थ करते.ही बंदिस्तता लोकशाहीच्या महासूर्याला विषम पयोदाच्या आड कशी लपंडाव खेळते यांचे ज्वलंत चित्रण कवीने “कसायाच्या तावडीत सापडलेले लोकशाहीचे जितराब “या कवितेतून व्यक्त केले आहे.ते म्हणतात की,

जातिधर्मविहीन माणसांच्या निर्मितीशाळा
जन्माला येतात लोकशाहीच्याच पोटी
आणि क्रांतीची तहान लागलेल्या जिवांसाठी
उजेडाचा समुद्र होते लोकशाही.
……………………
फिरतात वर्तमानाचे वासे
आणि दरडी कोसळाव्यात
तसे कोसळतात लोकशाहीचे खांब.
……………..…
दंगलीत शत्रूंची लुटली जातात घरे आणि दुकाने
तशी लुटली जाते अब्रू लोकशाहीची.
……….……….
माणसांएेवजी उगवतात बंदुकांची झाडे
आणि कसायाच्या तावडीत सापडलेल्या
जितराबसारखी होते
लोकशाहीची गत..
…………………
लोकशाही म्हणजे सौंदर्याची नीती
आणि नीतीचे सौंदर्य.
हे सौंदर्य असते विज्ञाननिष्ठेचे आणि समतानिष्ठेचे.
लोकशाही म्हणजे शोषणाच्या वनव्यातून
बाहेर पडणारी वाट.
………………..
फँसिझमचा छळतुरुंग तोडणारा हातोडा
लोकशाही म्हणजे वातीला फुटणारा उजेड.
…………………..
त्यांना लोकशाही मारावीच लागते
लोकशाहीला मारण्यालात ते मानतात त्यांचा
पवित्र धर्म.
पृ क्र ११९

लोकशाही जीवनाची उत्कृष्ट अशी ही कविता भारतीय लोकशाहीचे जे अंधपतन होत आहे यावर आसूड ओढते .सारा देश लोकशाहीच्या सूर्योदयात नाहत असतांना फँसिस्टवृत्तीने लोकशाहीवर कब्जा केला आहे.जातीवाद,धर्मवाद,भाषावाद,दहशतवाद या प्रकरणांनी तीला उध्दवस्त करण्याचे कटकारस्थान होत आहे.ज्या लोकशाहीने सर्व भारतीयांना समानता हे मूल्य दिलं ती लोकशाही कसायाच्या तावडीत सापडली आहे. राजकारणी अंधःभक्ताच्या गाफिलाने माणसाकडूनच तीला समाप्त करण्यात येत आहे.घ्रुणेच्या सिध्दांताचे पुनरुज्जीवन तयार करणाऱ्या वृत्ती वाढत असल्याने कवी अस्वस्थ झाला आहे.

जेव्हा पासून धार्मिक विचारांचे पक्ष शासनात येतात तेव्हा ते आपली विचारधारा भारतीय समाजमनावर लादत असतात.
धर्माची नशा पाजून लोकशाहीचे वस्त्रहरण केले तरी आम्ही लोकशाहीचा उत्सव साजरा करतो.ज्या लोकशाहीत दाभोळकर,पानसरे,कलबुर्गी,पेरुमल मुरुगणनं या लोकशाहीवादी विचारवंताची हत्या होते किंवा स्वतःचा मृत्यु जाहीर करावा लागतो.त्या लोकशाहीत सामान्य जनतेला न्याय मिळेल काय?हा प्रश्न मला पडला आहे.कवीने या साऱ्या प्रश्नांवर आपल्या शब्द विश्वातून वाचा फोडली आहे.ते ‘बंधो’ या कवितेत म्हणतात की,

बंधो!हवामानखात्याचा अंदाज असा की
क्षितिज सक्तीच्या रजेवर पाठवले गेल्याने
पुढे अनिश्चित काळापर्यंत
देशात सूर्य उगवणार नाही.
………………..
बंधो! कवितेत स्वप्न रचनारा माणूस हवा
माणसासाठी लढणारे युध्द हवे
आपल्या कवितेने अंधार झेलावा माथ्यावर
आणि माणसांच्या मस्तकांत सूर्य बांधावे.
…………………..
माणसामध्येच अंतराळ फुगड्या घालते चांदण्याच्या
सूर्य भेटावेत परस्परांना
तशी माणसे भेटतात माणसांना
अशावेळीच शब्दात उगवतो कवितेचा दिवस
त्या दिवसाची वाट पाहत
मी उभा क्रांतीच्या दारात..
पृ क्र २३
आज देशाला क्रांतीशिवाय तरणोपाय नाही.माणसाचे माणूस पण नाकारणाऱ्या विचाराचा निषेध करून चालणार नाही तर नव्या क्रांतीकारी विचाराची मशाल प्रज्वलीत करुन अंधारयुग पेरणाऱ्या श्वापदावर ज्ञानअग्नीवर्षाव करून मानवतेला वाचवूया.मी स्वप्नाची कविता लिहली असून मी निराशेच्या हातात लागलो नाही ही सत्यता कविने ओळखली आहे.आज भयग्रस्ततेने जागा घेतली आहे.लोकशाही अर्थव्यवस्था व समाजवाद खांडववनाप्रमाणे जळतो आहे.मोंहनजोदारो -हरप्पाच्या नव्या आवृत्या हैरान झाल्या आहेत.देशात खैरलांजी,खर्डा ,सोनई,जवखेडा ,शिर्डी अशा ठिकाणी मुजोर व्यवस्थेने अमानवीय कौर्य केले आहे.स्त्रीयांच्या अब्रुच्या चिंध्या होत असून वर्तमानाच्या उरावर राष्ट्रीय कार्यक्रमात र्ंजनाचे भव्यदिव्य सोहळे पाहल्या जात आहेत.माणसाच्या देशातून माणूस हद्दपार झाला आहे.लोकशाहीच्या संरक्षणार्थ कुणी पुढे यायला तयार नाही.अशा भयकंप वातावरणात कवी अन्यायकारी व्यवस्थेवर शब्दाचे अचूक अग्नीबॉम्ब टाकून आपली संविधाननिष्ठा पार पाडत आहे.हे अग्नीतेज डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दविद्यापिठातून आत्मसाद केले आहे.ते ‘अग्नीपथ’ या कवितेत म्हणतात की,

माणसाचे मुखवटे धारण केलेले
अर्थस्वामी चौकाचौकात पेटवतात रोज
वंचितांचा स्वाभिमान.
………………………
भारतीय संविधानाची उद्देशिका म्हणता येईल
असा भारत हवा आहे त्यांना.
पृ क्र २६

आज देश अग्नीज्वालेच्या तोंडावर उभा आहे.सनातनी वृत्तीने आपले पंख साऱ्या भारतावर पसरवले आहे.काही मोजकेच विचारवंत, मीडिया कार्यकर्ते व सामान्य लोक यांच्या जोरावर ही लोकशाही उभी आहे.मतदानाच्या पेटीतून जिंकणारा राजा आज इलेक्ट्रानिक मशिनच्या हेराफेरीतून जिंकतो आहे.खरी माणसे कमी व खोट्या माणसाची गर्दी सारीकडे उफाळून आली आहे.कवी हा खऱ्या माणसाच्या जोरावर ग्लोबल युगात युगमुद्रा कोरत आहे.राजमुद्रेच्या भव्यतेची मानवीय मनातील युगमुद्रा नव्या उजेडाची पेरणी करत आहे.ते “युगमुद्रा “या कवितेत म्हणतात की,

जग होत आहे ग्लोबल व्हिलेज
आणि जगाला सर्व खेडी जळत आहे
ग्लोबलबाहेरच
ग्लोबलला अज्ञात आहेत खेडी
निष्ठूरतेच्या खांद्यावरून चाललेली खेड्यांची मढी
या भयंकराच्या पुरात वाहणारांचा आकांताने
ऐकू येऊ नये म्हणून
ग्लोबलने कानावर हात ठेवलेले.
पृ.क्र.२९
जागतिकिकरणाच्या युगातील खेड्यांची भयावहकता कशी असते यांचे चित्र ही कविता रेखाटते .दुनियाच झाली आहे खेळाचे मैदान एकमेंकांना मारण्यासाठी ऑलिम्पिक आता सुरू झाले आहे.माणसे मारणे हा खेळ साऱ्या जगात चालू आहे.त्यामुळे माणसानं आता सावध व्हावे असा संदेश कवी देत आहे.दिशाहीन झालेले मानवी मनं
सनातनी विचारानं मरून गेलं आहे.सत्याचा उजेड लॉकपमध्ये बंद झाला असून माणसे पुतळ्यासारखे झाले आहेत .माणसे सूर्य होण्याआदीच मावळलेले आहेत.लोकशाहीचा युगात हुकूमशाहीच्या हिंस्र जंगलात जात आहेत.हे भावचित्र “आंधळ युग”या कवितेत रेखाटले आहे.

माणसे मुंडकी लोंबकळणाऱ्या तोडलेल्या पुतळ्यांसारखी.
…………………
आपल्या संवेदशीलतेची राख कोणी केली
कळत नाही युगाला.
………………
विझलेल्या मशाली घेऊन चाललेले युग
हिंस्र प्रश्नांच्या जंगलात वाट चुकलेले.
पृ.क्र.३१

देशामध्ये धर्माच्या नावाने,जातीच्या नावाने मांडलेले थैमान भारतीय एकात्मतेला नष्ठ करत असून बंधुभावाचा मूल्यजागर समाप्त होत आहे.धर्मांधाचं अमाप पीकं तयार झालं आहे.बिनडोक्याची माणसे निर्माण करणारी ही वृत्ती राष्ट्रद्रोह करण्याची वाट पाहत आहेत.माणसाच्या काळजातला आटून चाललेला माणूस कंगाल झालेल्यांना कळत नाही.आपले काय हरविले हे समजत नाही.माणूस माणसाचे माणूसपण नाकारीत असून हिरव्या भगव्या रंगाचे विचित्र बुध्दीभ्रम निर्माण होत आहे.माणसाचे आज वाळवंट होत आहे. कवी “विस्तारणारे वाळवंट” या कवितेत म्हणतात की.

पृथ्वीलाच नाही क्षणभर विश्रांतीसाठी सवड
वाळवंट होणाऱ्या माणसांमध्ये विस्तारणारे वाळवंट.
………………….
जंगलाने खाल्लेल्या माणसाला कळत नाही जंगलात त्याचे काय झाले !
पृ.क्र.३३

वाळवंटमय प्रदेशातील व्यवस्थेसमान देशात वातावरण झालं आहे.दिवस उगवण्याच्या ठिकाणी डायनासोर उगवत आहेत.सत्यशोधणाची संसद रक्तशोषण करणाऱ्या शोषकांना संरक्षण देत आहे.तळीपाळाना,दंगल घडविणाऱ्यांना भारताच्या सिंहासनावर बसवत आहेत.आपण आपल्या काळोखाचे नियोजन करत आहोत.त्यातून स्वतःच्या गुलामगिरीच्या बेड्यात जखडत आहोत.यावर भाष्य करताना कवी म्हणतो की,

सत्तापिपासूंचे पाशवी ऑलिम्पिक
आणि तृष्णेची गारपीट सुरू आहे संसदेत.
काळोखाचे नियोजन
संविधानातील उजेडाला मूठमाती देण्यात दंग.
पृ.क्र.३४

अशी मुजोर व्यवस्था निर्माण केल्याने सामाजिक व आर्थिक समानतेचे सारे उद्देश काळोखाच्या डोहात गळप झाले आहेत. उजेडाच्या वाटा बंद झाल्याने आपण अंधारयुगात चाचपडत आहोत.माणसाच्या मनात रंगाचे महायुध्द् निर्माण करून आपला डाव जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.”अंधारयुग “या कवितेत ते म्हणतात की,

सत्तेची लत माणसांचे सांडवित आली रक्त
आता रंगाचे युध्द निकराला आले आहे मनामनात.
………………….
माणूस तोडू लागला आहे जगण्याशी संबंध.
दुनियेला धरले जात आहे ज्वाळांवर.
प्रत्येकच जण कँप्टन रक्ताच्या खेळाचा.
माणसे गारद करण्याचा कट.
…………………….
युगाच्या मुद्रेवरील
भवितव्याची भयभीत अक्षरे अस्पष्ट होत चाललेली.
तोंड लपविण्यासाठी
युगाला प्रेतांच्या डोळ्यांमधील
पूर्ण गोपनीय अंधार हवा आहे.
पृ.क्र.३६

मनातील खदखद स्पष्ट करणारी ही कविता सावध राहण्याचा इशारा देते.बुध्द आणि देवदत्त या मधील प्रसंगाची आठवण देवदत्तगिरी या कवितेतून करून दिली आहे.कवितेतून मानवकल्याणाचा अविरत झरा वाहत राहून बुध्दिवादी माणसे तयार व्हावी.जर आपल्या कवितेतून विषमतेचे अपमानास्पद शब्द दिले तर ती कविता देवदत्तगिरी ठरू शकते म्हणून कवीने जपून लिहावे.आज मणसाचे माणूसपण समाप्त करण्याच्या हिटलर वृत्तीचे जहरी रक्त ओसंडून वाहात आहे.अंथाग झगमगाटातील काळोख सत्य माणसे दिसू देत नाही.फसव्या जगाची झापडबंध व्यवस्था जगात निर्माण झाली आहे.मानवी बॉम्ब भयावहक वातावरणात फिरतांना दिसतात ते” बदल “या कवितेत म्हणतात की,

माणसाच्या कद्रू आयुष्यात
काळजासाठी शिल्लक राहिली नाही जागा
माणसे म्हणजे लोकल मानवी बॉम्ब भयानक
बसत आहेत ग्लोबल विमानात.
पृ.क्र.४४

शब्द माणसाच्या प्रगटीकरणाचे सशक्त माध्यम आहे.शब्द हे फक्त बोलण्यासाठीच वापरले जातात असे नाही तर ते शस्त्र म्हणूनही वापरता येते . शब्द माणसाच्या अंधारयुगात सूर्याच्या ज्ञानतेजाची युगमुद्रा कोरीत असते.कवी मनोहरांच्या कवितेने मूल्यपरिवर्तनाचा ध्यास घेतला आहे.मानवी मनातील मरगळतेला
नष्ठ करून नव्या जगाचा मनोधर्येशील भावबंद मांडला आहे.ते “शब्दशस्त्रे” या कवितेत म्हणतात की,

दंगली पेटवणारे हेतू पोहताहेत दारूच्या तलावात
माणसे जाळणाऱ्या हातांमध्ये विनाशाची व्याकरणे
रक्ताच्या थारोळ्यांकाठी उभे आहेत मृत्यूचे जाहीरनामे
परस्परांशी माणसांचे वागणे तेल संपलेल्या दिव्यांप्रमाणे.
……………………….
युगा , आम्ही बोलू शब्दांच्या शस्त्रांनी;तोंडे शिवून बसणार नाही
आम्ही धुवा उडवू निरर्थकाचा; कवीला निरर्थक ठरू देणार नाही
उद्याचा सूर्य उगवेल आमच्याच मुठींमधून
आम्ही तोडू हिमनग ,आमचे टायटँनिक तुटू देणार नाही.
पृ.क्र.४६

उत्कृष्ट धाटणीची ही कविता देशातील घडणाऱ्या दंगलीचे डिटेक्टर करते.भेदाभेदाची भाषा करणाऱ्या विकृतीवर जबरदस्त प्रहार करते.कवी उजेडाची पुस्तके देऊन मन प्रकाशमान करणार आहे.परिसरातील घडणाऱ्या घटनांनी कवी अस्वस्थ झाला आहे.ते “कवितेची पुढील कडवी”या कवितेत म्हणतात की,

आपल्या श्वासांनी युध्द सुरू केले आहे
संकटांच्या मगरूर महासत्तेशी,
आपण स्वीकारले आहे आव्हान क्रौर्याच्या विषाणूचे
आपला करार आमनेसामने क्रांतीशी.
पृ.क्र.४७

मनोहरांच्या कवितेतील प्रबोधनाची भाषा ही वाचकाला नव्या उंचीवर घेऊन जाणारी आहे.शब्दांचे सामर्थ्य मोठ्या शिताफतीने,चपखलपणाने मांडले आहे ही अत्यंत जमेची बाजू आहे.ते “आपल्या कवितेत”मांडताना म्हणतात की,

आपल्या धमन्यांमधून पेरावी नक्षत्रांची गाणी
साऱ्याच जखमांची शाळा भरावी आपल्या कवितेत.
पृ क्र ४९

जे शोषित,पिडीत,वंचित,दुःखीत समाजाच्या जीवनाचे प्रतिबिंबि आपल्या कवितेत आले पाहिजे.मुजोर व्यवस्थेला प्रश्नांचे धबधबे घेऊन आव्हान दिले गेले पाहिजे.भारत ग्लोबल होत असतांना भगव्या,हिरव्या स्थानिक तलवारी प्रेतांच्या ढिगांवर बेमाफ नाचतात.ही भारतातील विचित्र ग्लोबल सामग्री भ्रष्टाचाराच्या जाळ्यात अडकणारी राजकिय ग्लोबलता भारताचा लिलाव लावत असून अस्तनीतील मनुवाद भारतीय प्रजासत्ताकतेला गिळकृत करीत आहे.म्हणून कवी “भारतीय ग्लोबल” या कवितेत म्हणतो,

वंचित कालही वस्तू होते;आजचाही बर्फ त्यांनाच जाळतो
आजही सोन्याचे पहाड त्यांच्याच उरावर चाललेले
भारतातील ग्लोबलचा हा अस्तनीतील मनुवाद.
पृ क्र ५३

कोरोना विषाणूच्या महामारीने सारे जग हतबल झाले असून भारतीय राजकारणीच्या अडेलटप्पू धोरणाने रस्ते उपाशी मरत आहेत.अंधारे रस्ते एकेकटे रडत आहेत.कामगार व श्रमिक लॉकडाऊनने पूर्ण उध्दवस्त झाला असून त्यांच्या जगण्याची दिशा बदलून गेली आहे.भारतीय रस्ते दडून बसले ते मैदानात येत नव्हते पण या महामारीने रस्त्याला नवा आकृतीबंध दिला .सारी व्यवस्था ठप्प करून निर्माणुष वाहणारे रस्ते माणसाच्या गर्दीने फुलून गेले.आपले संसार डोक्यावर घेऊन पादाक्रांत करणारे श्रमिकजनाची भावना” रस्ते” या कवितेत दिसून येते,

रस्त्यांमध्ये मावत नाही गर्दी जिवंत माणसांच्या प्रेतांची
सारीच स्मशाने एकमेकांच्या
ख्यालीखुशालीने मजेत आहेत.
पृ क्र ५७

ही कविता भविष्याचा अचूक वेध घेणारी ठरली आहे.कवीचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन अत्यंत मूलगामी ,वास्तवादी आहे.मग्रुर व्यवस्थेला इशारा देतांना ते म्हणतात की,

आम्ही खरे भारताचे लोक
त्याच्या उजेडावर आमचे औरस नाव खोदले आहे.
तुम्हाला विकू देणार नाही आम्ही हा देश
तो आमच्याच घामाचे तारांगण आहे.
पृ क्र ६१

ही उत्तुंग झेप घेणारी कविता आम्ही या देशाचे मुलनिवासी आहोत हे अधोरेखित करत आहे.साऱ्या भारतात खाऊजा या धोरणाने देशाला विकण्याचा घाट घातला आहे. ब्राम्हणवादी व
भांडवलदारी व्यवस्थेने भारताला कंगाल केले आहे.समरसतेच्या नावाखाली समतेला विकृत करणाऱ्या मानसिकतेला हद्दपार करण्यासाठी कवी शब्दांचे अचूक शस्त्र वापरत आहेत ही त्यांच्यातील मूल्यनिरपेक्ष क्रांती आहे.
युगमुद्रा हा कवितासंग्रह शब्दाने मोहरून आलेला महाशब्दवृक्ष आहे.जगण्यातील दोन बिंदू माणसाला अतिशय महत्वाचे आहेत.एक जन्म व दुसरा मृत्यु . जन्म हा माणसाला सुखदायक क्षण तर मृत्यु हा माणसाचा दुःखदायक क्षण.पण कविने मृत्यु या प्रतिमावरून अत्यंत प्रगल्भ कविता रचल्या असून मृत्युचे विविध भागात मूल्यमंथन केले आहे.ते “मृत्यु” या कवितेत म्हणतात की,

बंधो! आपला जन्म मृत्यूच्या विरोधात विद्रोह
आपली भविष्यकाळाची कल्पना मृत्यूविरोधी नियोजन
आपल्याला येणारी जगण्याची पालवी निरंतर मृत्यूविरोधी आंदोलन
आपली उमलनं म्हणजे आपला अजिंक्य नकार मृत्यूला.
पृ क्र ७१

अतिशय आशयपुर्ण कविता नव्या प्रतिभाचे विवेचन करत असून मराठी साहित्यातील मृत्यू या जाणीवांची सर्वोत्तम कविता आहे.माणसानी मृत्यूला घाबरू नये कारण तो आपल्या सोबत सातत्याने असतो .माणसानी
मृत्यूला त्याचे काम करू द्यावे .मरण्याआधीच बांधू नये स्मशान .कोणाच्या श्वासांना माणसानी लोकांना उदय द्यावे,अस्त देऊ नये.ही भूमिका कवीची आहे.ते “आसन्नमरण जीवन” या कवितेत म्हणतात की,

माणसानी हिटलर होऊ नये,मनू होऊ नये
हीरोशीमा -नागासाकिवर बॉम्ब होऊ नये
वंशच्या वंश बेचिराक करू नये
माणसांनी माणसांसाठी जीवन व्हावे,मृत्यू होऊ नये.
पृ क्र ७३

उदबोधनाची ही अप्रतिम कविता असून,मानवीय मनातील मृत्यूच्या भावविश्वासाला उलघडून दाखविते.मानवातील भयाला नष्ठ करून लढण्याची ज्वाला प्रज्वलीत करते.कवीला मृत्यू हरवू शकत नाही कारण तू मला सातत्याने भीत असतो .माझे जगणे हेच क्रांतीविद्यापीठाचा अंगार आहे.ते “मृत्यूस” या कवितेत म्हणतात की,

तुझ्या विश्वविद्यालयाने शिकवलेली ही मार्मिके
मला उजेडमार्गावरून ढळू देत नाहीत.
दीपस्तंभा!मी कृतज्ञ आहे
तू शिकवलेल्या बेरजांचा ,वजाबाक्यांचा,भागाकारांचा ,गुणाकारांचा आणि
मला उगवत ठेवले
त्या श्वासांचा.
पृ क्र ८८

ही गणितशास्त्रीय कविता कवीचे मर्मबंध प्रकट करते त्यातून त्याची वैज्ञानिक दृष्टीकोन किती उच्च दर्जाचा आहे हे समजून येते.कवीचा प्रवास खडतर असून ते खरखुरे नास्तिक कवी आहेत.ते माणसावर जमलेली धुळमाती दूर करण्यासाठी लिहितात.माझ्या मनाला लागलेली शब्दाची तहान अजूनही पूर्ण झाली नाही.
म्हणून माझ्या जीवनातील भरती
थांबत नाही अजून,आणि मृत्यूलाही मी सुचत नाही अजून…

युगमुद्रा या कवितासंग्रहातील कवितांची शब्दछटा आखिव रेखिव असून वाचकाला ऊर्जायान देणारी आहे.जगण्यातील विविध पात्राची भूमिका पत्र या कवितेत साकार करतात तर शतक कवितेतून लोकसंख्येच्या भष्मासुराची मांडणी करतात.आता या कवितेत ते म्हणतात की , अक्षरांच्या शेतामध्ये ;माणसाचे पीक घ्यावे.
कष्टकऱ्याच्या गळ्याला ;गाणे क्रांतीचे फुटावे.
पृ क्र १११

आपण क्रांतीचे गीत गाणारे विद्रोही कवी असून देशातील असमानतेला समाप्त करून समानता लवकर प्रस्थापित व्हावी .बुध्दिजीवी ,शास्त्रज्ञ,राजकारण्याच्या बंडलपणावर प्रहार न करता खोट्या कर्णधाराच्या सुरात सूर मिळवित आहेत.हे कवीला बोचत आहे.पण देश महत्त्वाचा आहे ,देशाशिवाय कुणीही श्रेष्ठ नाही.ते “देश” या कवितेत म्हणतात की,

आज जिवंत जगण्याचा दुष्काळ पडलेला
अॉक्सिजनचे साठे आउटडेटेड झालेले
लोकशाहीचा घडा पालथा करून ओतले जातेय पाणी
नेतृत्वशून्य नेतृत्व आणि संसदेला झालेले गँगरीन
बहुतेक घरे ओस आणि इस्पितळे ओव्हरफ्लो
खाली टाकलेल्या लोकतंत्रासाठी
कोणत्याही इस्पितळात जागा नाही
देश रडतोच आहे
धाय मोकलून गळाधर.
हे कवी !माफ कर मला
स्वतःसाठीच रडत बसणे
मला आता मंजूर नाही.
पृ क्र ११९

या कवितेचा घाट अत्यंत विचारशील असून सम्यक क्रांतीची ही कविता लॉकडाऊनच्या परिस्थितीचे मूलस्वरूप चित्र रेखाटते.कवीचे भविष्यमंथन दुरदृष्टीने ओतपोत भरले आहे.ते “जीवन व कविता”यात म्हणतात की,

ही कविता नव्हे.
हे आहे जीवनच जीवनाचने तुडवलेले
आणि कवितेला सोबत घेऊन
युध्दाकडे निघालेले.
पृ क्र १४४

कवी यशवंत मनोहर हे आंबेडकरवादी कवितेतील धगधगती ज्वाला असून परिवर्तनाची नवी ऊर्जा पेरणारे महाकवी आहेत.शब्दांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवरील माणसाच्या अत्याचाराचा वेध घेऊन शब्दांना आकार देतात . शब्द हे त्यांची अणुऊर्जा आहे.कुणालाही न दुःखवता आंबेडकरी शब्दसुत्राणे समाजपरिवर्तन करत आहेत.विद्रोह व नकार हे त्याचे दोन महान शब्दशस्त्र असून आंबेडकरवादी क्रांतीचा उजेड साऱ्या विश्वात पेरत आहेत.युगमुद्रा ह्या कवितासंग्रहातील निमित्ताची ठिणगी,अश्रूंचा पाऊस,दहशत,बियाणे,पाऊस नग्न,या कविता वाचकाला नवी दृष्टी देतात.या कवितासंग्रहात जगण्याच्या विविध भावमुद्रेचे चित्रण मांडले आहे.भारतीय लोकशाहीतील अवसरवादाला मूठमाती देऊन लोकशाही मानव्याचे विहार निर्माण करणारी ही कविता आहे.ग्लोबल जगानी मांडलेल्या विषम अव्यवस्थेविरूध्द अखंड संग्राम लढणारी ही कविता ग्लोबल युगाची ज्वालाग्राही कविता आहे.
करीता कवीला नव्या क्रांतीकारी काव्य प्रवासाला सुयश चिंतितो,मंगलकामना देतो!