लोकनेते बाबुरावजी मडावी यांचे पुण्यस्मरण

    48

    ✒️रोशन मदनकर(उप संपादक)

    गडचिरोली(दि.18जून):- जिल्ह्याचे शिल्पकार दिवंगत लोकनेते बाबुरावजी मडावी यांना झाडीबोली साहित्य मंडळ जिल्हा शाखेच्या वतीने एका छोटेखानी कार्यक्रमात आदरांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी झाडीबोली साहित्य मंडाळाचे जिल्हाध्यक्ष डाॕ.चंद्रकांत लेनगुरे , कवी संजिव बोरकर , धम्ममित्र भोजराज कान्हेकर , श्रीगुरूदेव सेवा मंडळाचे उपासक सुखदेव वेठे तसेच ज्येष्ठ कवयित्री कुसूमताई अलाम उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते. प्रास्तविक भोजराज कान्हेकर यांनी केले तर डाॕ. चंद्रकांत लेनगुरे आणि सुखदेव वेठे यांनी बाबुरावजी मडावी यांच्या अनेक आठवणी सांगत त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.

    कुसूमताई अलाम यांनी बाबुरावजी मडावी यांच्याकार्यसंबंधाने रचलेल्या काव्याचे वाचन केले आणि म्हणाल्या , निस्वार्थपणे आदिवासी समाजासाठी झटणारा महान नेता बाबूरावजी मडावी होते.त्यांच्या निष्काम कार्यपध्दतीमुळे देशातील आदिवासी बंधू त्यांना ओळखत होते. माजी मंत्री आणि समाजसेवक म्हणून बाबुरावजींनी तळागाळातल्या लोकांसाठी, आदिवासी जनतेच्या उत्थानासाठी जीवन समर्पित केले.त्यांच्या प्रेरणेने आजही अनेक जनसेवक तो वसा समर्थपणे पुढे चालवत असल्याचे मत बंडोपंत बोढेकर यांनी व्यक्त केले. आभार प्रदर्शन संजिव बोरकर यांनी केले.