बदमाशांच्या गर्दीतला निखळ माणूस म्हणजे राहूल गांधी

29

✒️दत्तकुमार खंडागळे(संपादक वज्रधारी)मो:-9561551006

राजकारणाच्या प्रांतात सभ्य व सज्जन माणूस सापडणे म्हणजे दुर्लभ. राजकारणाचा प्रांत हा बदमाशांचाच अड्डा असा अलिखित नियम झाला आहे. राजकारणात राहून जो बदमाशी करत नाही, गुंडगिरी करत नाही, हरामखोरी करत नाही, लांड्या-लबाड्या करत नाही, या बोटावरची थुंकी त्या बोटावर करत नाही तो माणूस मुर्ख आणि वेडा असतो. टवाळखोरांच्याच भाषेत बोलायचे तर तो पप्पू असतो. जो बदमाशी करतो, लबाड्या करतो, लोकांना घोडे लावतो तो ताकदवर नेता असतो. अशा भंपक आणि भामट्या टग्या लोकांची सध्याच्या समाजात भलतीच क्रेझ आहे. पण अशा बदमाशांच्या गर्दीत राहूल गांधी नावाचा एक भला, निखळ माणूस ताट उभा आहे. थट्टा, टिंगल-टवाळीचे असंख्य दगड झेलत तो ठाम उभा आहे. पराकोटीच्या तिरस्काराचे विष पचवत कुणाचाही तिरस्कार न करता तो सर्वांना सामोरं जातो आहे.

स्वत:ची तत्वे न सोडता, स्वत:ची पातळी न सोडता ठामपणे नालायकीचा विरोध संयमाने करत तो एकाकी टिच्चून लढतो आहे. हिच या माणसाची खरी ओळख आहे. राजकारणातल्या बदमाशांच्या टोळ्या त्यांची मस्करी करतात, कुत्सितपणे टवाळी करतात. गल्लीतले टूकार नेतेही त्यांची पप्पू म्हणून हेटाळणी करतात पण हा फकड्या या सगळ्यांच्याकडे लक्ष न देता धिरोदत्तपणे उभा आहे. स्वत:च्या चेह-यावरचे हास्य कधीच मावळू देत नाही. त्याच्यावर कितीही खालच्या दर्जाची टिका झाली, आईवर, बहिणीवर, आज्जीवर अश्लिल बोलले गेले तरी तो टिका करणारांच्या आई-बहिणीवर चिखलफेक करत नाही. कधीच जशास तसे उत्तर देत नाही. बोलताना, टिका करताना भाषेची मर्यादा सोडत नाही. राजकारण करताना स्वत:ची सभ्यता सोडत नाही. हेच त्यांचे वेगळेपण आहे. खरेतर राहूल गांधी माणूस म्हणून ज्या उंचीचे आहेत त्या उंचीचा समाज नाही.

इथल्या लोकांना त्यांचीच ठासणारे, दादागिरी करणारे, देवा-धर्माच्या नावाने गुलाम करणारे, दंगली भडकावणारे, लोकांच्या डोक्यात विष पेरून वेड्यात काढणारे, त्यांना उल्लू बनवणारे हवे असतात. राहूल गांधी असली बदमाशी करत नाहीत म्हणून ते पप्पू आहेत.

कॉंग्रेसच्या सत्ता काळात आपली सगळी बोटं सत्तेच्या तुपात बुडवून चाटणारे, पंजा आज्जा, बाप आणि स्वत:ही त्या सत्तेचा लाभ उठवलेले कॉंग्रेसमधले अनेक लाभार्थी आज भुर्र उडून गेले आहेत. ज्यांच्या नालायकीने पक्ष अडचणीत आला, ज्यांनी कॉंग्रेसच्या काळातली सत्ता बापाची जहांगिरी असल्यासारखी भोगली असे अनेकजण कॉंग्रेसच्या पडत्या काळात दुस-या फांदीवर जावून विसावले. अनेकजण पडत्या फळाची आद्ना मानून भाजपात डेरेदाखल झाले. कॉंग्रेसची पुरती वाताहत झाल्यावर राहूल गाधींच्या हातात पक्षाची धुरा आली. सगळे सैन्य गर्भगळीत झालेले असताना, इतर सरदारांनी शत्रूपक्षाशी मांडवली केलेली असताना राहूल गांधी एकटे भाजपाला अंगावर घेतायत. भाजपाचा मुळ विचार असणा-या संघाशी एकटेच टक्कर देतायत. या लढाईत त्यांना पक्षातले कुणी साथ देताना दिसत नाही तरीही हा माणूस भक्कमपणे लढतो आहे. खरेतर हाच माणूस निधड्या छातीचा आहे.

भले त्याची छाती छप्पन इंचाची नसेल पण त्याची हिम्मत इंचाच्या आणि फुटाच्या फुटपट्टीत बसणारी नाही. अशी हिम्मत फार कमी लोकांच्याकडे असते. ते दांभिक नाहीत, ढोंगी नाहीत, लबाड नाहीत, पाताळयंत्री नाहीत, कपटी-कारस्थानी नाहीत. लोकांना सामोरं जातायत, पत्रकारांना सामोरं जातायत, सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तर द्यायला समोर येतायत. सात वर्षात एकदाही पत्रकारांना सामोरं न जाणारे, मिडीयाच्या पोटातून जन्माला आलेले बेगडी छप्पन इंचवाले कुठे आणि हा निखळ माणूस कुठे ? पण यातला फरक भारताची किती वाट लागल्यावर लोकांना कळणार कोणास ठाऊक ?

राहूल गांधींना इतका मोठा वारसा असताना कुठलाच थाटमाट नाही, बडेजाव नाही. त्यांचे वागणे अत्यंत साधे, विनयशील व नम्र आहे. खादीची साधी कपडे घालून लोकांच्यात मिसळणारा, कुठेही बसणारा, कुणाच्याही घरी जाणारा हा माणूस येणा-या काळात प्रतिस्पर्ध्यांना खडे चारल्याशिवाय राहणार नाही हे नक्की. कोरोनाच्या बाबतीत त्यांनी जे जे सांगितले तेच सरकारला करावे लागले. पहिली त्यांची टिंगल केली आणि पुन्हा त्यांचेच ऐकावे लागले. अशा अनेक प्रसंगात नेमकं पप्पू कोण आहे ? ते देशासमोर आले आहे. राहूल गांधींच्याकडे पाहिल्यावर तेच सहिष्णू भारताचा खराखुरा आणि आश्वासक चेहरा वाटतात. राहूल गांधी सरळमार्गी आहेत. त्यांना राजकारणातल्या इतर बदमाशांसारखे राजकारण जमत नाही. हा त्यांचा सदगुण अनेकांना दुर्गून वाटतो. जेव्हा सदगुणांचाच लोक तिरस्कार करतात तेव्हा त्याची त्यांना फळेही भोगावी लागतात. राहूल गांधींसारखा सरळमार्गी माणूस, गांधी नावातलं सयंमाचे, सहिष्णूतेचे आणि प्रेमाचे तत्व जपणारा माणूस हिच ख-या भारताची ओळख आहे. कालच त्यांचा वाढदिवस झाला. त्यांना उदंड आयुष्य लाभावे याच त्यांना शुभेच्छा.