तलवडा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बोंब मारो आंदोलन

28

🔹स्वाभिमानीच्या पूजा मोरे शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर; पिक विम्याच्या” बीड पॅटर्न” विरोधात आंदोलन

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)

गेवराई(दि.20जून):- खरीप हंगाम २०२०-२१ मध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. प्रशासनाने केलेले नुकसानीचे पंचनामे ग्राह्य धरून त्यानुसार सरसकट शेतकऱ्यांना विम्याचा लाभ द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष व पंचायत समिती सदस्य पूजा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी तलवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ‘बोंब मारो’ आंदोलन करण्यात आले.जिल्ह्यात मागील वर्षी खरीप हंगामातील ७ लाख ४९ हजार ५०७ हेक्टर क्षेत्रावर पेरा करण्यात आला होता. यापैकी ६ लाख २५ हजार ६३५ हेक्‍टर क्षेत्राचा विमा १७ लाख ९५ हजार ५५२ शेतकऱ्यांनी उतरवला होता. नैसर्गिक आपत्तीने होणारे नुकसानभरपाईपोटी कंपन्यांकडून लाभ दिला जातो.

खरीप हंगामातील पिके काढणीला आली असता जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. शासनाकडून त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई मिळावी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले. त्यांतर शासनाने पंचनाम्याचे आदेश दिले. मात्र विमा कंपनीच्या धोरणामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे आंदोलकांच्या वतीने तहसीलदार सचिन खाडे, विमा जिल्हा प्रतिनिधी बाबासाहेब इनकर, तालुका कृषी अधिकारी बी. टी. सोनवणे यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात पूजा मोरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन बंगाळे, विदर्भ अध्यक्ष प्रशांत डीक्कर, रोशन देशमुख, करण धूमक, किशोर इंगोले, सुंदर तिवारी, प्रा. श्याम कुंड, परमेश्वर मिंड, गणेश मोरे, राहुल मराठे, आसाराम मराठे, शहेंशहा सौदागर, सखाराम आखरे सह असंख्य शेतकरी सहभागी झाले होते.
प्रशासनाचे पंचनामे कृषी विभागाने ग्राह्य धरावे
कृषी आणि महसूल विभागाच्या संयुक्त समितीने नुकसानभरपाईसाठी पंचनामे केले. यामध्ये २ लाख ५५ हजार ७१० हेक्‍टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल देण्यात आला. त्यानुसार ३ लाख ३२ हजार ७०३ शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली.
परंतु पीक विमा कंपनीकडून नुकसान झालेले हे क्षेत्र ग्राह्य धरण्यात आलेले नाही. त्यांच्या अहवालानुसार फक्त १९ हजार ३४४ शेतकरी सभासदांना नुकसानभरपाई मिळणार असून, त्यापोटी १२ कोटी १९ लाख रुपयांची बोळवण केली जाणार आहे. त्यामुळे अडचणीत आलेला शेतकरी हवालदिल झाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शनिवारी ‘बोंब मारो’ आंदोलन करण्यात आले.