महाविद्यालयातील ग्रंथापाल पदांच्या भरतीसाठी २८ जून पासून संचालक कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन.

54

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.20जून):- गेल्या दहा वर्षापासून राज्यातील अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयातील पदभरती प्रक्रिया ही वेगवेगळ्या कारणाने रेंगाळली आहे. त्यात ग्रंथापाल पदाचाही ही समावेश आहे. २७ जून पर्यंत जर शासनाने ग्रंथपाल पदांची भरती प्रक्रिया सुरु करण्यासाठी शासन निर्णय काढला नाही तर २८ जून पासून पुणे येथील उच्च शिक्षण संचालक कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघ च्या वतीने संचालकांना निवेदन देऊन देण्यात आले.

अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयातील ग्रंथपाल पदांची भरती सुरु करणे व ४ मे २०२० रोजी पदभरती वर निर्बंध लादण्या अगोदर ज्या महाविद्यालयांना शासन नियमानुसार भरतीची परवानगी मिळाली आहे अशा महाविद्यालयांना तेथील पदाच्या मुलाखतीसाठी तातडीने परवानगी द्यावी. या दोन मुख्य मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन केले जाणार आहे.ग्रंथालय हे महाविद्यालयाचा आत्मा समजला जातो.

महाविद्यालयात गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा शासनाचा उद्देश पूर्ण करण्यात ग्रंथपाल महत्वाची भूमिका बजावत असतो. मात्र महाविद्यालयातील एवढे महत्वाचे पद गेल्या अनेक वर्षापासून चुकीच्या धोरणामुळे रिक्त राहिले आहे. मार्च २०२१ महिन्यात अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयातील पदभरती वरील निर्बंधात शिथिलता आणत महाविद्यालयातील प्राचार्य पदाची भरती प्रक्रिया सुरु केली. महाविद्यालयातील प्राचार्य पद हे एकाकी पद असून शैक्षणिक कामकाजाच्या दृष्टीने तसेच नॅक मुल्यांकन करण्याकरिता नियमित प्राचार्य कार्यरत असणे आवश्यक आहे. हा निष्कर्ष लावत महाविद्यालयात प्राचार्य पदाच्या भरतीस परवानगी देण्यात आली.

मात्र महाविद्यालयातील ग्रंथपाल पद हे प्राचार्य पदाप्रमाणे एकाकी पद असून तितकेच महत्वाचे पद आहे. तरीही शासनाने ग्रंथपाल पदाच्या भरतीवर लावलेले निर्बंध उठवले नाही.
शुक्रवारी दि. ११ याबाबत महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघ चे सदस्य डॉ. मदन झाडे, वैशाली पानसरे, आनंद नाईक, चित्रांगिनी टाक, शांतीलाल अहिरे, अमोल केरकळ यांनी उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांना २८ जून पासून बेमुदत धरणे आंदोलन संदर्भात निवेदन दिले.

– –
” ग्रंथपाल पद हे महाविद्यालयातील प्राचार्या प्रमाणे अत्यंत महत्वाचे पद आहे. ग्रंथपाल पद एकाकी असूनही भरती बाबत सतत दुर्लक्षित राहिले आहे. गेल्या दहा वर्षापासून भरती प्रक्रिया बंद असल्याने पात्रता धारकांच्या आयुष्यात नैराश्य आले आहे. तरी शासनाने कसलाही वेळ न घालवता प्राचार्या प्रमाणे ग्रंथपाल पदांची भरती प्रक्रिया सुरु करावी व राज्यातील पात्रता धारकांना न्याय द्यावा”
– डॉ. रविंद्र भताने, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघ.