जागतिकिकरण व आंबेडकरवादी कविता

92

प्रस्तावना:आजचे युग हे विज्ञानाचे युग आहे.नव्या परिवर्तनाची स्थितंतरे घडून येत आहेत.कोरोना विषाणू महामारीने साऱ्या जगाला भयग्रस्त केले आहे.जागतिकीकरणातील माणूस स्वतःचे अस्तित्व टीकविण्यासाठी धडपडत आहे.या महामारीने फक्त आरोग्य यंत्रणेलाच आव्हान दिले नाही तर साऱ्या मानवीय यंत्रणेला प्रभावित केले आहे.या ग्लोबल युगाला जागतिकीकरणातील व्यवस्थेने खुजे केले आहे.औपनिवेशक व अर्थव्यवस्थेच्या बदलत्या सिध्दांताने मानवीय सभ्य समाजाला नव्या चंगळशाही विषमतामय जगापूढे झुकायला लावलं आहे.१९५० पासून अर्थकारण,समाजकारण,संस्कृतीकरण,धर्मकारण,राजकारण,
शैक्षणिककारण ,साहित्यकारण सातत्याने बदलत आहे.जगात अनेक देशात जागतिकीकरण , खाजगीकरण,व उदारीकरण याला उत आला आहे.

जागतिकीकरणाशिवाय मनुष्य जगू शकत नाही अशी फसवी भूमिका उच्चवर्णीय समाज घेत आहे.ज्या जागतिकिकरणात माणसाचे माणूसपण नागवले असेल तर ते जागतिकीकरण कोणत्या फायद्याचे आहे.भांडवली अर्थकारणाच्या व्यवस्थेने जगाला गुलाम करण्याची नवी व्यवस्था विकसित होत आहे.जाहिरातबाजाच्या फसव्या मादक अदाने सामान्य माणूस घायळ होत आहे.सामान्य लोकांना नव्या जागतिकीकरणाने सारे दरवाजे बंद केले आहेत.सैवधानिक हक्क नाकारले आहेत.

भारत हा अविकसित देश असून १३० करोड लोकसंख्या असलेल्या देशात जागतिकीकरणाने आपले पंख पसरवले आहे.वर्तमान सरकारने जागतिकीकरणासाठी गालिचा अंथरूण ठेवला आहे.खाजगीकरणाच्या माध्यमातून सरकारी सेवा क्षेत्र कवडीमोलभावाने विकल्या जात आहेत.गरीब लोकांच्या रक्तशोषणावर नवे मुक्त साम्राज्य उभे केले जात आहे.जागतिकीकरणाचे गंभीर परिणाम व प्रभाव मानवीय जीवनावर पडला आहे.तसेच मराठी साहित्यावर पडलेला आहे.बदलत्या जगाचा वेध घेऊन आंबेडकरवादी कविता नव्या गंभीर चिंतनाचे प्रतिबिंबि आपल्या कलाकृतीतून व्यक्त करत आहेत . आंबेडकरवादी कवितेचा आयाम जागतिक क्षितीजावर प्रकाशमान होत आहे.आंबेडकरवादी कविता देशातील घडणाऱ्या घटनाचा विचार न करता जागतिक अन्योन्य प्रक्रियेचा आवाज आपल्या कवितेतून मांडत आहे.ही आंबेडकरवादी कवितेची मोठी क्रांती आहे.

जागतिकीकरण म्हणजे काय…?

जागतिकीकरण हे एक मुक्त प्रक्रिया असून अर्थकारणाच्या नफ्यासाठी मुबलक साधनसंपत्तीच्या व जास्तश्रम कमी मोबदल्यात करणाऱ्या देशात जाऊन स्वतःचे साम्राज्य तयार करणे हाेय.बायस्लिस व स्मिथ यांनी जागतिकीकरणाच्या व्याख्येत म्हटले आहे की,”जगाच्या विविध भौगोलिक क्षेत्रात राहणाऱ्या लोकांमध्ये वाढते सामाजिक,आर्थिक,औद्योगिक,व्यापारी व सांस्कृतिक संबंध दर्शवणारी व्यापक प्रक्रिया म्हणजे जागतिकीकरण होय.”तर हेराड टाथेल आणि रॉबर्ट आपल्या व्याख्येत म्हणतात की,”जागतिकीकरण हे आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेचे एका काल्पनिक विश्व अर्थव्यवस्थेकडे होणारे संक्रमण दर्शवणारी संकल्पना आहे.”जागतिकीकरण ही संकल्पना फक्त अर्थव्यवस्थेशी संबंधित जरी असली तरी एकंदर सर्वच माणसाच्या जीवनात चांगले व वाईट परिणाम करणारी गोष्ट आहे.या जगात पहिले जागतिकीकरण हे तथागत गौतम बुध्द् यांनी केले.ज्यामध्ये जगातील सर्व माणसे समान असून सर्वाना मानवतेचे अधिकार मिळावे.माणसाने माणसाशी बंधूभाव व प्रेमाने वागावे.ही क्रांतीकारी विचारसरणी तथागत गौतम बुध्दांची होती.

जागतिकीकरणाच्या संक्रमण काळात अनेक समस्या निर्माण झाल्या असून आदिवासी,वंचित,शोषित,कामगार,शेतकरी,स्त्री,यांचे नव्याने शोषण होत आहे.मुठभर लोकांच्या फायद्यासाठी सारा देश गुलाम केल्या जात आहे.रोजगाराच्या साऱ्या वाटा बंद झाल्या आहेत. जगाचे झपाट्याने सैनिकीकरण होत आहे. रोजीरोटीचा प्रश्न आ वाचून
पूढे उभा आहे.अशा जळणाऱ्या व विषमतामय वातावरणात आंबेडकरवादी कवी नव्या बारूदाचे वज्रघण घेऊन जागतिकीकरणाच्या मध्यभागावर पाय रोवून समाजाला नवी चेतना देत आहे.अमानविय अव्यवस्थेविरूध्द कवितेतून एल्गार पुकारत आहे.कामगार ,शेतकरी,विद्यार्थी ,स्त्री,बेरोजगार,गरीब,कर्मचारी ,यांना लढण्याची महाऊर्जा देत आहे.आंबेडकरवादी कविता जागतिकीकरणाच्या रणसंग्रामात प्रस्थापित समाजासोबत व भांडवलदारी व्यवस्थेसोबत निर्णायक महायुध्द् लढत आहे.नव्या व्यवस्था परिवर्तनाची नवी उभारी देत आहे .

आंबेडकरवादी कविता म्हणजे काय ?

आंबेडकरवादी मराठी कविता ही क्रांतीदर्शी व युगबदलात्मक परिमार्ज्य करणारी कविता आहे.जगातील सर्व शोषणावर प्रहार करणारी अग्नीज्वाला आहे.जगातील सर्व विषमतेला नष्ट करणाऱ्या युगंधराची महाऊर्जावान कविता आहे.ही कविता समाजधिष्टित , शोषणमुक्त व बंधुत्वनिष्ठ संविधानात्मक मूल्यांची पेरणी करणारी अणुगर्भी कविता आहे.
आंबेडकरी कविता म्हणजे,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीदर्शी प्रेरणेतून आणि क्रांतीकारी यातून निर्माण होणारी भावजाणीव आहे.आंबेडकरवादी कवितेचा पोत हा सेद्रिंयत्वाचा असून नव्या जागतिकीकरणात आंबेडकरवादी कवीने आपली अस्मीता व आदर्श न गमावता महानगरीय वास्तवाशी भिडणाऱ्या ज्वलंत प्रश्नांनाचे चिंतन रेखाटायला हवे.

आंबेडकरवादी कवितेतील विश्वजाणीवा:-

जागतिकीकरणाच्या बदलत्या सामाजिक सहजीवनाचा परिणाम आंबेडकरवादी कवितेवर झाला असून त्यांचे प्रतिबिंबि आंबेडकरी कवितेत उमटलेले आहे.आंबेडकरवादी कवी आपल्या काव्यातून नव्या प्रतिभेचे व प्रतिमांचे सिंचन करत पूढे चालला आहे.प्रस्थापित मराठी कविता मागे पडली असून जीवनवादी परिवर्तनशील कवितेचा आशय आंबेडकरवादी कवितेत पाहायला मिळतो ही अत्यंत क्रांतीदर्शी गोष्ट आहे.आंबेडकरवादी पहिली पिढी ही अत्यंत ज्वालाग्राही व विद्रोहात्मक चेतनेने पेटून उठली होती .नकाराचे नवे मानसशास्त्रीय बदल त्यांनी घडवून आणले होते.सामाजिक , आर्थिक , राजकीय व धम्मचक्र प्रर्वतन यांच्या प्रभाव आंबेडकरवादी कवितेवर पडलेला दिसून येतो.या कवितेने कलावादी व कल्पनायुक्त विचाराला नकार देऊन जीवनवादी , सत्यनिष्ठता याचा धागा पकडून आंबेडकरवादी कवितेच्या जाणिवेतून व नेणिवेतून विश्वकल्यानाचा नवा आविष्कार दिसून येत आहे.दलित साहित्याच्या माध्यमातून अनेक कवीने उध्दवस्त झालेल्या समाजाचे सत्यचित्रण आपल्या कवितेतून केले आहे.पहिल्या पिढीचे साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे, वामनदादा कर्डक ,नामदेव ढसाळ,वामण निंबाळकर ,दया पवार , यशवंत मनोहर,केशव मेश्राम ,अर्जुन डांगळे ,हिरा बनसोडे,भीमराव देठे ,ज.वी.पवार,बाबूराव बागूल, प्रल्हाद चेंदवणकर , उत्तम कांबळे इत्यादी तसेच दुसऱ्या पिढीचे प्रकाश जाधव,भाऊ पंचभाई,ज्योती लांजेवार,प्रमोद वाळके ,लोकनाथ यशवंत,अरूण काळे,भुजंग मेश्राम,प्रज्ञा लोखंडे.त तिसऱ्या पिढीमध्ये मंगेश बन्सोड,केतन पिंपळापूरे,सागर जाधव,आनंद गायकवाड,विद्याधर बनसोड,दीपक रंगारी,दीपककुमार खोब्रागडे,भुषण रामटेके,प्रसेनजीत गायकवाड,महेद्र गायकवाड,संदीप गायकवाड,संजय गोडघाटे, राहून वानखेडे,इत्यादी. या अनेक आंबेडकरवादी कवींनी मराठी साहित्यातील मरगळलेल्या वाटेला नवी परिवर्तनशील क्रांतीजाणिवा दिल्या आहेत.संपूर्ण परिवर्तन हा या कविचा ध्यास आहे.विषमतामूलक समाजव्यवस्था ,राज्यव्यवस्था ,शिक्षणव्यवस्था , अर्थव्यवस्था यांचामध्ये संविधानीक व्यवस्थेतून बदल करण्याचे ज्वलंत चित्रण रेखाटले आढळून येत आहेत.जागतिकिकरणाच्या भांडवलदारी व्यवस्थेला कसे आव्हान द्यायचे यांचे भावगर्भी मनोविश्लेषणात्मक मांडणी आंबेडकरवादी कवीने केली आहे.यशवंत मनोहर हे आपल्या युगांतर या कवितासंग्रहातील “जागतिकीकरण आणि माझ्या जगाची कविता “यामध्ये लिहितात की,

जागतिकीकरणात
गुलाम मने गुलामच असतात आणि
इतरांना गुलाम करणारे मनेही गुलामच असतात
या सर्वांनाच मुक्त करणारे विश्वकल्याणी मन
पथ्वीच्या पाठीवर प्रथम रूजू झालेले बुध्द् या नावात
जगाला करूणेची आणि बौध्दिक निकषाच्या बाहूत घेणारे
हे पहिले जागतिकीकरण
……………….
तुझ्याच तेजाच्या समाजवादी किल्लीने आम्हांला
आमच्या विजयाचे महाद्वार उघडायचे आहे…..

ही कविता तथागत गौतम बुध्द् यांच्या विचारांच्या जागतिकीकरणाच्या भूमिकेचे निःसंदेह पुरस्कार करते.पण आजचे जागतिकीकरण मानवाला माणसापासून तोडण्याचे कटकारस्थान करत आहे.शोषणाचा नवी यंत्रणा उभी करून माणूस नागवल्या जात आहे.मानवीय अधिकाराचे हनन होत आहे.लखलखत्या महाजालाचे छिनाल पब निर्माण करून अभावग्रस्त समाज तयार केला जात आहे.महेंद्र भवरे हे “महासत्तेचे पीडादान”या कवितेत लिहितात की,

डूकरे आणि माणसाची पिलावळ
उघडपघळ पघळणारी जगभर पसरवणारी
जागतिक उपासमारीत
मारामारीला हातभार लावणारी
ही घरवसवी बाईल भांडाभांडी लावणारी
भंडाफोड करतांना भांडेकुंडे आपटणारी…

ही कविता अत्यंत उग्र वेदनेचा कल्लोळ विशद करणारी आहे.कवी दीपककुमार खोब्रागडे “दहशतवादाचा सांड घुसला जागतिकीकरणात “या कवितेत लिहितात की,

आता तिसरे वर्ल्ड वॉर सुरू झाले आहे
विचारांचे -बॉम्बचे -खुनाचे-धमकीचे
हे ग्लोबल युग अपडाऊन होत आहे
आणि सनराईज लोकशाहीत
दहशतवादाचा सांड घुसला आहे आरपार..

ही कविता बदलत्या शब्दसज्ज आवेगाचा उत्कृष्ट आविष्कार आहे.आंबेडकरवादी कवितेची दाहकता प्रभावित करणारी आहे.जागतिक पातळीवर नवे विचारशिल्प कोरणारी आहे.आंबेडकरवादी कविता ही समाजपरिवर्तनाचा आरसा आहे.माणसाचे सुंदर विश्व निर्माण करणारी युगसापेक्ष कविता आहे. युवा कवी संदीप गायकवाड आपल्या “ग्लोबलायजेशन” या कवितेत लिहितात की,

ग्लोबलायजेशनच्या लखलखत्या हँलोजनमध्ये
मानवाचे अस्तित्व मँन झाले आहे.
…………..
फसव्या कारपोरेटच्या मायानगरीला
आंतरिक डायनामाईटने उडवायचं आहे….

या कवितेतून आंबेडकरवादी विचाराची नवी ऊर्जा प्रस्फोटीत झालेली दिसून येते.आंबेडकरवादी कवितेच्या जाणीवा सर्वंकष मानवाच्या हिताची नवी गाणी गाणारी आहे.

आंबेडकरवादी कवितेतील प्रेरणा व प्रयोजन:-
आंबेडकरवादी कवी हा तळागाळातून आला आहे.दुःख झेलणारा, झोपडपत्तीच्या बकाल अवस्थेचे चटके सहन करणारा,विषमतेचे दाहकतेची व्यवस्था अनुभवणारा ,दारिद्र ,वेदना ,भूक,शोषण , अन्याय ,अत्याचार ,अशा वातावरणात जीवनयापन करणाऱ्या स्वानुभवाच्या ज्वलंत प्रश्नांनाचे चिंतन घेऊन आलेला आहे.जे चित्रण प्रस्थापित मराठी कवितेत पाहायला मिळत नाही ते वास्तविकतेचे चित्रण आंबेडकरवादी कवितेत पाहायला मिळते . डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्ञानक्रांतीच्या कार्यऊर्जेने आंबेडकरवादी कवी ऊर्जान्वय झालेला आहे.तथागत गौतम बुध्द् , संत कबीर,राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले,क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, संत गाडगेबाबा यांच्या मानवतावादी विचार क्रांतीतून चातुर्वर्ण्यधिष्टित व्यवस्थेचे उच्चाटण करण्यासाठी तो सज्ज झाला आहे.

अंधकारमय वेदाच्या ग्रंथाला तो नकार देत आहे.सांस्कृतिक मूलतत्ववाद,जातीयवाद,प्रांतवाद,धार्मिकवाद,यांच्यावर तो घणाघाती प्रहार करतो आहे.निखाऱ्यावर चालून स्वःताचे नवे शब्दक्षेपणास्त्र घेऊन समाजाला नवी ऊर्जा देण्याचे काम तो करत आहे.आंबेडकरवादी कवीची खरी प्रेरणा ही तथागत गौतम बुध्द्,संत कबीर , राष्टपिता महात्मा जोतीराव फुले,क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,यांचीच आहे.
मानवमुक्ती,स्वातंत्र्य ,समता , बंधूभाव व न्याय यांचा पुरस्कार करणाऱ्या वैचारिक क्रांतीचा माणूस निर्माण व्हावा हे प्रयोजन आंबेडकरवादी कवीचे आहे.परंपरा ,पोथीनिष्ठता ,ढोंगी कल्पनेच्या पायावर उभ्या असलेल्या समाजव्यवस्थेला , राज्यव्यवस्थेला ,धर्मव्यवस्थेला सुरूंग लावण्याचे काम आंबेडकरवादी कवी करत आहे.आंबेडकरवादी कवी हा मानवाच्या हितासाठी बंडखोरवृत्तीने अमानुषतेच्या साऱ्या विकृत मेंदूची शस्त्रक्रिया करत आहे.लोकशाही ,समाजवाद,बुध्दीप्रामाण्य,संविधाननिष्ठता,मानवहित,धम्मत्व ,या विचाराचा गाभा आंबेडकरवादी कविचा अाहे.आंबेडकरांच्या कार्यकर्तुत्वाच्या तत्वज्ञानाच्या पाठशाळेतून हा कवी अभिव्यक्त होत आहे.या कवीचे प्रयोजन समतामूलक समाज निर्माण करण्याचे आहे.

आंबेडकरवादी कवितेतील सौंदर्य:-
आंबेडकरवादी कविता ही नव्या सौंदर्यशील्पानी नटलेली असून तीचे तत्वज्ञान हेच सौंदर्य आहे.मादक ,मोहक,रंजक,भडकपणा,रोमांश,निसर्ग ,देवत्व,या कोणत्याही विश्वात ही कविता रमत नाही तर मानवीय नात्याचे विविध पदर ही कविता रेखांखित करते.माणूसकिचे नवे सेंद्रिय जीवनद्रव्ये घेऊन नवे सौंदर्य ही कविता प्रयुक्त करते.जी कलाकृती मानवी जीवनाचा खरा आरसा दाखविते तीच कलाकृती सौंदर्यवादी असते.आंबेडकरी कवितेमध्ये आलेल्या वैचारिक विचारातून , आंबेडकरी ऊर्जास्वल,संविधानसृजन,शैलीबहार,नवकृतीचे आशयत्व,प्रतिमाचे क्रियान्वयन,घामाचे व कामाचे भावनत्व इत्यादीचे सौंदर्य भाव आंबेडकरवादी कवितेत प्रस्तुत झालेले आहेत.जागतिकिकरणात माणसात होणाऱ्या विविध बदलाच्या परामर्शचा वेध आंबेडकरवादी कवी घेत आहे.मरणप्राय होणाऱ्या समाजमनाला नवा मूल्यआविष्कार देण्याचे काम ही कविता करत आहे.यशवंत मनोहर सौंदर्य या विषयी म्हणतात की,”सौंदर्य हे महान जीवनमूल्य आहे.समता,बंधुता,सामाजिक न्याय,आणि इहवाद या गोष्टींचा सेंद्रिय मेळावा म्हणजे सौंदर्य .” ही व्याख्या आंबेडकरवादी कवितेचे प्राणत्व आहे.सौंदर्य हा साहित्याचा व प्रतिकृतीचा प्राण असतो.माणसाला विदृप करणाऱ्या अप्रतिष्ठेला सौंदर्यात स्थान नसते.आंबेडकरवादी कवितेत,बुध्दाची करूणा ,प्रेम,प्राणीमात्र,सर्वांच कल्याण यांचा अनुबंध दिसून येतो.भारतीयत्वाची नवी क्रियाशीलता यातून व्यक्त होत आहे.मानवतेचा धागा पकडून आंबेडकरवादी कवी सब्बे सत्ता सुखी होन्तु या सौंदर्य न्यायाने आपले काव्य रेखाटत आहे ही भूमिकाच नव्या भारताला दिशादर्शक ठरणारी आहे.

आंबेडकरवादी कवितेतील वेदना , विद्रोह व नकार:-
आंबेडकरवादी कवी हा नव्या समाज निर्मितीचा पुरस्कार करणारा आहे.प्रस्थापित समाजाच्या साऱ्या बनावट विचारसरणीला समाप्त करून मानवहितैषी समाज बनविण्यासाठी तो संघर्ष करत आहे.माणसाच्या जीवनाला नवे धुमारे फुटून आतून व बाहेरून तो फक्त माणूसच असावा अशी भूमिका त्याची आहे.समाजावर होणाऱ्या अन्यायविरूद्ध पेटून उठतो आहे.हजारोवर्षापासूनच्या गुलामव्यवस्थेला ठोकरुन तो आपले नवे विश्व तयार करत आहे.आपल्यावर व समाजावर होणाऱ्या अत्याचाराचे रेखांकन वेदना ,विद्रोह व नकार या प्रतिकातून मांडतो आहे. जागतिकीकरणाच्या व्यवस्थेत तो शब्दाला शस्त्रे मानून जग बदलविण्यासाठी धडपड करत आहे.सुनिल अवचार आपल्या “ग्लोबल वर्तमान “या कवितेत लिहितो की,

“त्या ग्लोबल वर्तमानात
भावना झाली आहे जाहिरात
आणि
मेंदूचे झाले आहे कॉम्प्युटर
तत्वज्ञान झाले आहे’use and Throw’
संस्कृती झाली आहे रखेल
ह्या ग्लोबल वर्तमानात.

आंबेडकरवादी कविचा आशयसुत्राचा धागा हा बंडखोर वृत्तीचा आहे.ही बंडखोरी जगाला नवीन दिशा देणारी आहे.कोरोना विषाणूच्या बदलत्या वैश्विकरणाचा आलेख कवी यशवंत मनोहर यांनी आपल्या ‘अग्नीपरीक्षेचे वेळापत्रक’या कवितासंग्रहात मांडताना लिहले आहे की,

धर्मांधता ,वर्गीयता ,जातीयता , आणि
वंशीयता या कोरोना व्हायरसपूर्व व्हायरसनी
कोट्यावधींना जगू दिले नाही
आणि मरूही दिले नाही इतिहासभर
एक जबाबदार वैश्विकता
आता उगवू पाहात आहे….

ही कविता वर्तमान काळातील बदलत्या वैश्विक परिघाचा आयाम प्रदर्शित करते.आंबेडकरवादी कविता महानगरीय व कलावादी कवितेसारखी पळपुटी नाही तर ती जागतिकीकरणातील मुजोर व्यवस्थेवर बारूद पेरणारी आहे.आमच्या सामान्य जनतेचा काही वाटा असेल काय..?महेंद्र गायकवाड आपल्या कवितेत लिहितात की,

वसुधैव कुटूंबकम चा जप करता करता
जाती धर्म पाळला
नँशकॉम दुनियेची कॉर्पोरेट संस्कृती
अन् जागतिकीकरण वर्ज्य झाले
यार,आपल्या नागोचे काय होईल…
अशी नव्या वळणाची कविता आंबेडकरवादी कवितेचा गाभा आहे.

आंबेडकरवादी कवितेतील संविधानमूल्ये:-
आंबेडकरवादी कवी भारतीय संविधानाला आपला प्राण मानतात.संविधानाने त्याचे व साऱ्या भारतीय माणसाचे जीवन बदलविले आहे.या देशाला एकखंड ,बलशाली बनवायचे असेल तर आपल्याती सारे भेद गाडून टाकले पाहिजे.आंबेडकरी कवीला संविधानात्मक अधिकारातून अभिव्यक्त होता येत आहे. भारतीय संविधान मानवाचं मन स्वतंत्र ठेवणारा मूल्यकोष आहे.हा मूल्यकोष मानवाच्या नव्या परिवर्तनाचा सूर्य आहे.इतर कवीच्या काव्यात संविधानात्मक प्रतिमासृष्टीचा अभाव दिसतो.पण आंबेडकरवादी कविच्या काव्यात तो निरंतर प्रवाहित होतांना दिसतो.संविधान लागू होऊनही भारतीय लोकांना तिचे फळे चाखता आली नाही.ही खंत व्यक्त करताना नामदेव ढसाळ लिहितात की,

ही लोकशाही नाही हे
ही विटंबना सतरा पिढ्यांनी युग
गिळून पोसलेली
हा प्रकाश नाही रे
हा पिंजरा पिळवणूकिचा..

ही क्रांतीजाणिव अतिशय उपरोधात्मक वापरली असली तरी त्यात तथ्य आहे.लोकशाहीने भारताला नवा अध्याय दिला आहे.मानवी जीवनाला दिशा दिली आहे.परिणाम कमी दिसत असला तरी माणसाला मूल्यसापेक्ष जीवनपध्दती जगण्यासाठी महाऊर्जा देत आहे हे आपण नाकारू शकत नाही.यशवंत मनोहर यांच्या कवितेत संविधानात्मक प्रतिमासृष्टीचा व संविधानमूल्याचा चपलख उपयोग केला आहे.भारत व जगाला नवे माणूसकिचे विद्यापीठ निर्माण करायचे असेल तर संविधानाशिवाय तरणोपाय नाही.ते “प्रबोधनाचे युध्द “या कवितेत लिहितात की,

संविधानातील सौंदर्याला आग लावणाऱ्याविरूध्द
आणि तुझ्या अब्रुचे धिंडवडे काढणाऱ्याविरूध्द
तू प्रबोधनाचे युध्द प्रखर कर मुलखा…..

तर दया पवार आपल्या “लोकशाही”या कवितेत लिहितात की,
लोकशाही..! मेंदूच्या बळाचा वापर
आणि शारीरिक बळाचे खच्चीकरण
लोकशाही..!अशक्तांना घातलेले
महाभयंकर टणक जाकिट
आणि सशक्तीच्या हातून
काढून घेतलेला आसूड..

आंबेडकरवादी कवितेची बांधिलकी:-
आंबेडकरवादी कवितेची बांधिलकी समस्त मानवाच्या कल्याणाकरीता आहे.या जगातील कोणताही माणूस नैसर्गिक हक्कापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेणे.विषमता व शोषण यांना मुळासकट उखळून फेकाण्याची ताकत आंबेडकरवादी कवितेत आहे. श्रृगांरिक ,रोमँटिक,चंद्रतारे,निसर्ग,
भावनावश,लैगिकता,कल्पनारंजन ,राजाराणी,धार्मिकता इत्यादी मायाजालातू वास्तववादी माणसाच्या गर्भजाणिवाचा वेध आंबेडकरवादी कवी घेत असतो.जागतिकिकरणाने जी चंगळवादी व्यवस्था निर्माण केली तीला नष्ट करून मानव्याचे सुंदर विहार निर्माण करण्याची भूमिका हा कवी घेत आहे.स्त्री,कामगार,शेतकरी,शोषित,वंचित,आदिवासी ,बेराेजगार,
मागासवर्गीय समाजाच्या व्यथा व वेदना आपल्या कवितेतून जगासमोर मांडत आहे.आंबेडकरवादी कवीची बांधिलकी तथागत बुध्द् ,महात्मा जोतीराव फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,संविधानात्मक मूल्ये यांच्यासोबत आहे.

आंबेडकरवादी कवितेसमोरील आव्हाने:-

वैश्विक साहित्याचा मानबिंदू माणूस हाच आहे.जे साहित्य मानवीजीवनाची नीतीतत्व प्रस्तुत करतात ते साहित्यच चिरकाल टिकणारे ठरते.माणसाने या पृथ्वीला नवे तत्वमूल्य दिले आहे.मेंदूच्या न्युँरान्समधून भव्यदिव्य परिवर्तन घडवून आणले आहे.पण हाच माणूस कळलाव्या आहे.माणसाला माणसापासून तोडणारा आहे.काही साहित्य मानवाचे अस्तित्वच मान्य करीत नाही.समानतेचे सारे नियम डावलून शोषण करत असतांना.आता यातनामय जीवन कंठित लावणाऱ्या मुजोर व्यवस्थेचे पोस्टमॉर्टम करण्यासाठी आणि नवीन माणूस बनविण्यासाठी आंबेडकरवादी कविता रणांगणावर निर्णायक महायुध्द् लढत आहे.
जगात बाबासाहेबाची सर्वश्रेष्ठता आणि क्रांतीमयता सिध्द झाली आहे.या महत्कार्यामूळेच आंबेडकरी तरूण क्रांतीची मशाल घेऊन अज्ञानरूपी व अन्यायकारी मूलतत्ववादीना बदलविण्यासाठी उजेडचा पाईक झाला आहे.तो वादळाचा वंशज असून त्याला आता थांबणे शक्य नाही.
कविता माणसाला क्रांतीसाठी सतत प्रेरीत करत असते.क्रांतीसाठी माणसाच्या मनाची खंबीर तयारी करणारी कविताच आंबेडकरवादी कविता ठरते .ती कोणत्याही चक्रव्युहात सापडत नाही.ती ऐशोआरामात रमत नाही.त्या अनुषंगाने आंबेडकरवादी कवितेची वैचारिकता महासूर्य होऊन प्रस्फोटीत झाली आहे.
आंबेडकरवादी कविता नव्या जोमाने लिहल्या जात असली तरी साठोत्तरी कवितेतील आक्रमकता व क्रांतीत्व आजच्या कविता फारसे दिसत नाही.असे मत काही समिक्षकांनी नोंदवले आहे. बदलत्या सामाजिक ,आर्थिक, राजकीय , शैक्षणिक व तंत्रज्ञानाचा प्रभाव आंबेडकरवादी कवितेवर पडलेला येतो.आंबेडकरवादी कवितेने आपले नवे क्षितिज तयार केले आहे.कविच्या वाटेला आलेला कालखंड यांचा परिणाम कवितेवर होत असला तरी जागतिकीकरणात आंबेडकरवादी कविता नव्या मन्वतराची अग्नीज्वाला तेवत ठेवत आहे.आंबेडकरवादी कवितेसमोर सामाजिक भेदाभेद,अन्याय,दारिद्र,अज्ञान,
बेरोजगारी,स्त्री अत्याचार,आर्थिक तंगी,आरक्षण , खाजगीकरण,उदारीकरण,व जागतिकीकरण अशा अनेक आव्हानाचा सामाना करावा लागत आहे.वर्तमान सरकारने आर्थिक नाकेबंदी करून आंबेडकरी व देशातील साऱ्याच विद्यार्थांचे मोठे नुकसान केले आगे.धर्मवादी जहरांच्या अफूमय अंधभक्ताची नवी आयटी सेल ,चेले,व्हॉटसँप विद्यापीठाचे बिनकामी मेंदू , टिव्हीवरील डिबेट्स,यामुळे भारतीय लोकात भ्रम निर्माण करून वास्तव दडपल्या जात आहे.धार्मिक दंगली,जातीय दंगली,विद्यापिठातील मुजोरगीरी,याचा सामना आंबेडकरवादी कविने केला पाहिजे.भारतीय संविधान वाचवण्यासाठी अहोरात्र डोळ्यात तेल घालून पहारा द्यावा लागेल.विविध समस्येच्या वायटूळाला देशावर येण्यापासून रोखाव लागेल.ही ताकत फक्त आणि फक्त आंबेडकरी तत्वज्ञानाच आहे.नव्या आव्हानाला समोर जाऊन नवा आत्मविश्वास जागृत करण्यासाठी आंबेडकरवादी कवीच पूढे येईल हे निर्विवाद सत्य आहे.

जागतिकीकरण व आंबेडकरवादी कविता:-
जागतिकीकरण,उदारीकरण व खाजगीकरणाच्या तडाख्यात अख्खे जग सापडले आहे.आहे रे वर्गाची मिरासदारी वाढून नाही रे वर्गाचे शोषण होत आहे.पृथ्वीवरील नैसर्गिक साधनसंपत्तीची अतोनात लुट चालली आहे.भांडवलदारानी नफा कमविण्याच्या नादात निसर्गाचे मोठे नुकसान केले आहे.माणसाचे जागतिकीकरण न होता वस्तूचे जागतिकीकरण झाले आहे.माणूस हा भेदाभेदाचा , वंशवादाचा,जातीवादाचा शिकारी बनत आहे.गरीब वर्गाला या खाऊजाने हवालदिल केलं आहे.बनावट कंपण्यांनी माणसाच्या अवयवचा बाजार मांडला आहे.माणुसकिच्या साऱ्या मर्यादा पार केल्या आहेत.
कोरोना विषाणूने साऱ्या माणसाचे जीवन उध्दवस्त झाले आहे.या महामारीने जग अस्वस्थ आहे.महासत्तेची नशा जगात जैविक महायुध्दाची तयारी करत आहेत.जागतिकिकरणाचा उन्मत सांड स्टॉक एक्सेंजमध्ये पाणी भरतो आहे.गरीब व मध्यमवर्गीय यांना गुलाम केले जात आहे.माणसाला माणसापासून तोडल्या जात आहे.भारतीय संविधानाचा ढाचा कमजोर केल्या जात आहे.
जागतिकीकरण ही एक मूलतः भांडवलधार्जिनी विचारांच्या मुशीतून उगवलेले कुरूप अपत्य आहे.हे जागतिकीकरण फक्त वरवर चांगले वाटत असले तरी त्याच्या आतमधले अँथ्रेक्स बहोत खतरणाक आहेत.या बदलत्या परिप्रेशात आंबेडकरवादी कवीने आपले शब्दक्षेपणास्त्र नव्याने पाजवले आहेत. जागतिकीकरणाचा वेध घेऊन नवे मूल्यमंथन तो करत आहे.उत्तम कांबळे जागतिकीकरण या विषयी लिहितात की,”जागतिकीकरणाने माणसाची सर्वात मोठी कोणती गोष्ट हिसकावून घेतली असेल तर ती सामाजिक न्यायाची.पण काही परिस्थितीत माणूस नवी लढाई सुरू करू शकेल या विषयी शंका नाही.शेवटी त्याला आपल्या खांद्यावर लादल्या गेलेल्या लढायांचा , दुःखाचा,वेदनाचा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या ओझ्यांचा विचार करावाच लागतो.ओझं वाढलं की त्याच्या चालण्याची गती मंदावते आणि पुढं प्रवास थांबतो.माणूस असं कधी सातत्यांनं थांबत नाही आणि थांबत नसतो”..ही भव्यजाणीव प्रगट केली आहे.माणूस हा सातत्याने महायुध्द् लढतो तो स्वतः बरोबरही व इतराबरोबरही.
कवी यशवंत मनोहर यांनी जागतिकीकरणाचा विषय आपल्या काव्यात फार खुबीने हाताळला आहे.ते “संदर्भासहीत आजची मरणझड”या कवितेत लिहितात की,

सुरू झाला आहे मोसम
अग्निपरीक्षेचा
वादळाचा लगाम येत नाही
हातात माणसाच्या अजून
………….
धर्मनिरपेक्ष जागतिक विद्यापीठांमधूनच
उगवते सौहार्दाची सौंदर्यपौर्णिमा
उगवते माणुसकी असीम
परस्परोपकारक..!

ही कविता वास्तविकेचा नवा आयाम व्यक्त करतो. उत्तम कांबळे आपल्या जागतिकीकरणात माझी कविता कवितासंग्रहातील कवितेत लिहितात की,

पण माणसं माणसापासून
दूर धावताहेत
रोबोटच्या गळ्यात
गळा घालताहेत
माणसांऐवजी कुत्र्यांवर
कुत्र्यांऐवजी यंत्रावर
विश्वास टाकताहेत.

ही कविता जागतिकीकरणातील माणसाचे होणारे यांत्रिकीकरण विशद करत आहे.तर
अरूण काळे हे “हे विश्वची माझा कटोरा”या कवितेत जागतिकीकरणाचे संगणकीय परामर्श व्यक्त करताना लिहितात की,

संगणक नष्ट करत चाललाय कामगारांना
समतेला बधुंभावाला आणि माणूसपणाला
निर्मितीला मारून वाढवतोय तो विकृती
तो एवढा प्रबळ झालाय की येथुनच तो
दुरूस्त करतेय अवकाशयानं
माणसांना रोबो बनवयाचं स्वप्न
होतय त्याच्यात जागृत
पिंजऱ्यात कोडणार तो माणसाला
त्या आधी होईल एक मोठं युध्द
संगणक विरूध्द माणूस
आणि माणसाच्या हरण्याच्या शक्यता आहेत.

जागतिकीकरणाने जग एक खेडे झाले आहे.मोबाईलच्या नव्या तंत्रज्ञानाने माणसे वेगवान झाली असली तरी नाती विस्कळीत झाली आहेत.मेंदूची विचार करण्याची क्षमता उच्च पातळीवर पोहचली असली तरी आर्थिक नावाच्या अर्थकारणाने इतर देशाला गुलाम करण्याची प्रवृत्ती दिसून येत आहे.आंबेडकरवादी कविता संख्यात्मकतेत वाढत असली तरी तीची गुणात्मकता कमी होणार नाही यांची काळजी आंबेडकरवादी कवीने घ्यायला हवी.लॉकडाऊनच्या काळात आंबेडकरवादी कवितेने माणसाला नवी चेतना दिली आहे.अनेक कार्यकर्त्याने लोकांना मदत केली आहे.बदलत्या कोविड-१९ च्या महामारीत भावचित्र कवीने योग्यपणे रेखांखित केले आहे.कवी मच्छिद्र चोरमारे हे आपल्या “शीर्षक शोधणारी कविता”यामध्ये लिहितात की,

खाजगीकरण झालं गरीबाचं गजकर्ण
जागतिकीकरणाने उघडलं
सामूहिक आत्महत्येचं महाद्वार
मोबाईलने दळणवळण केलं मुठीत बंद
किती ओरडावं बुध्दानं..!
माणसाला कसा जडला
माणसं मारण्याचा क्रुर छंद.

नव्या चातुर्वर्ण्यव्यवस्थेतील विषमतामय जीवनाच विदारक वास्तव कवीने रेखाटलं आहे.तर कवी लोकनाथ यशवंत हे “कोंडमारा “या कवितेत लिहितात की,

प्रगतीच्या भाकरीमागे
खेड्यातून शहरात आलोत
अस्पृश्यता नाहीसी होण्याच्या मोबदल्यात
आम्ही झोपडपट्टया पदरात घेतल्या
………………
ही जागतिकीकरणाची कुठली गलिच्छ पध्दत..!
माणसं उंदरासारखी एकमेंकावरून धावताहेत..!

माणसाच्या जावघेणी स्पर्धेचं चित्रण मोठ्या हिकमतीने केलं आहे.संदीप गायकवाड आपल्या “ग्लोबल संस्कृती”या कवितेत लिहितात की,

आंतरराष्ट्रीय ग्लोबल महासंस्कृतीत
माणसाचं माणूसपण बदलून गेल आहे
देशाचा नागरिकच देशात परका झाला आहे…

अत्यंत वर्तमानाचा सत्यवृत्तपाठ विशद करणारी ही कविता मानवाच्या होणाऱ्या ऱ्हासाचे अचूक स्पंदन टिपते.

कोरोना विषाणूच्या महामारीत आंबेडकरवादी कविताने नवी उंची गाठली आहे.पण यातही काही कवी फक्त श्रृगांरिक व रंजकमय काव्यात मशगुल असतांना आंबेडकरवादी कवी वास्तव आेळखून कविता करत होते.यशवंत मनोहर,उत्तम कांबळे, दीपककुमार खोब्रागडे,संदीप गायकवाड,महेंद्र मेश्राम,मनोहर नाईक ,संजय गोडघाटे,भूषण रामटेके,प्रसेनजीत गायकवाड,सुर्यकांत मुनघाटे,संजय घरडे,हृदय चक्रधर,संजय ओरके,अशोक इंगळे,सिध्दार्थ भगत,सुधीर बाराहाते,संजय सायरे,अरूण काळे ,विद्याधर बन्सोड,इत्यादी कवीनी आपली लेखनी मानवीय वेदनेला समोर ठेवून वापरली आहे.जागतिकिकरणात आंबेडकरवादी कविता नवे निखारे घेऊन काळोख पेरण्याऱ्या श्वापदांना जाळत सुटला आहे ही अत्यंत क्रांतीदर्शी गोष्ट आहे.
मराठी साहित्यातील कविता हा प्रांतात अतिशय महत्वाचा आहे.मराठी कवीने मानवीय मनाच्या संवेदनाच्या व भावनेचा योग्य मेळ घातला आहे.पण प्रस्थापित मराठी कविता ही एका साचेबंद कप्यात लिहल्याने ती सर्वंकष समाजाचा आवाज होऊ शकली नाही.साऱ्या समाजाचे प्रतिनिधित्व ती करू शकली नाही.हे वास्तव मराठी वाचकाने समजून घेतले पाहिजे.जगातील परिघ बदलत असतांना त्यांनी आपले जुनाट संदर्भाला मुठमाती दिली नाही तर पुन्हा नव्या स्वरूपात प्राचीन सभ्यतेचे ढोल पिटत राहिले हे वास्तव आपण ओळखले पाहिजे.त्यांची कविता चंद्र,तारे ,वारा ,पाणी, चांदणे ,राजाराणी,ब्रम्हाण्य,देव ,आधात्म,या कचाट्यातच भिरभिरत राहली.तीने बहुजन समाजाला आपला विषय बनवलाच नाही.जर काही कवीच्या मराठी कविता क्रांतीकारी वाटत असल्या तरी त्या कवीचे अंतरंग विषमतामय विचारानेच भरले होते हे म्हणणे अतिशोयक्ती ठरणार नाही.
भारतीय लोकांचे समुळ परिवर्तन करण्यासाठी महात्मा जोतीराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांनी आपली लेखनी झिजवली . समाजव्यवस्थेतील अन्यायकारी व्यवस्थेवर आसूड ओढला.भटशाहीचा पर्दापाश केला.नव्या शब्दसृजनाने नवे ऊर्जाबल दिले.बहुजनाला बोलते केले.शाहू महाराज ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा यांनी हिंदू धर्मातील जातत्यवृत्तीवर प्रहार केला . तथागत गौतम बुध्द् यांच्या धम्म चेतनेतून नवा आत्मविश्वास जागृत झाला.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्वालाग्राही विचारातून नवे आंबेडकरवादी कवी लिहायला लागले .तसे मराठी पारंपारिक कवितेला जबरदस्त हादरे बसू लागले.
आजच्या सामाजिक ,आर्थिक, राजकीय व सांस्कृतिक बदलाचा प्रभाव माणसावर पडू लागला.शहरीकरणाचा व ग्रामीणशोषणाचे प्रतिबिंबि आंबेडकरी कवितेत उमटू लागले.पण आज हीच आंबेडकरवादी कविता स्वः कोशात चाचपडत आहे.कवितेचा आशय नव्या स्वरूपात मांडण्याचे काम नव्या आंबेडकरवादी कवीने करावे.आंबेडकरवादी कवितेची योग्य समीक्षा न झाल्याने अनेक चांगल्या कलाकृती वाचकापर्यंत पोहचू शकल्या नाही.तरी आंबेडकरवादी कविता जगाला नवा आयाम देत आहे.द्वेषमूलक विचारांना नाकारित ही कविता आंबेडकरांच्या विवेकशीलतेची मशाल प्रज्वलीत करत आहे.समतामूतक देशासाठी व राजकारणातील बनावटतेचे मुखटे चराटर फाडण्यासाठी ती तयार आहे.तो आज फक्त स्वतःच्या दुःखाला कवटाळून बसला नसून जागतिकीकरणात माणसावर होणाऱ्या अन्यायविरूद्ध पेटून उठला आहे.नव्या तंत्रज्ञानातून माणसाचे होणारे यांत्रिकीकरण यावर हल्ला चढवून शोषणमुक्त समाजव्यवस्था व राज्यव्यवस्था निर्माण करण्यासाठी आंबेडकरवादी कविता सज्ज झाली आहे.तीचे भविष्य उज्ज्वलमय आहे यात शंका नाही .

✒️लेखक:-संदीप गायकवाड(नागपूर)मो:-९६३७३५७४००