जयघोष” कवितासंग्रह म्हणजे जीवन जाणिवा समृद्ध करणारा मार्ग- प्रसिद्ध कवयित्री रंजना सानप

  42

  ✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

  कोल्हापूर(दि.20जून):-प्रसिद्ध कवी, नाटककार चंद्रकांत बंडू सावंत यांच्या ‘जयघोष’ या कविता संग्रहातील कविता मानवी जीवन जाणिवा समृद्ध करणाऱ्या आहेत. मानवी भावभावनांचे विविध पैलू त्यांनी शब्दबद्ध केले आहेत. असे मत प्रसिद्ध लेखिका, कवयित्री रंजना सानप यांनी व्यक्त केले.

  चैत्र प्रकाशनकडुन प्रसिद्ध कवी चंद्रकांत सावंत यांच्या ‘जयघोष’ या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा दि. 20 जून 2021 रोजी आदित्य सभागृह येथे पार पडला. मायणी येथील प्रसिद्ध कवयित्री रंजना सानप यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी बोलताना सानप म्हणाल्या, समाज माध्यमांमुळे आज लिहणाऱ्यांची संख्या वाढली आहे. परिणामी गंभीर लिखाण होण्यापेक्षा त्यातुन उथळपणा जास्त वाढत आहे. अशा काळात सावंत यांची कविता जगण्याकडे पाहण्याची नवी दृष्टी देते.

  यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना न्यू काॅलेजचे उपप्राचार्य प्रा. टी. के. सरगर म्हणाले, सावंत यांच्या कविता निराश आयुष्याला सकारात्मकतेकडे घेऊन जातात. हताश न होता येणाऱ्या संकटावर कशी मात करावी याचे मर्म या कवितांमध्ये लपले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल म्हमाने बोलताना म्हणाले, लिहणाऱ्या माणसांनी जग बदलण्यास महत्वाची भूमिका निभावली आहे. जयघोष मधुन रोजच्या जगण्या मरण्याच्या कविता, नातेसंबंधाच्या कविता आयुष्यावर भाष्य करतात.

  यावेळी कवी चंद्रकांत सावंत यांनी कवितेची एकूण पार्श्वभूमी स्पष्ट केली. पाहुण्यांचे स्वागत संवाद प्रकाशनाच्या प्रकाशिका प्रा. शोभा चाळके यांनी केले तर प्रकाशन समारंभाचे प्रास्ताविक आणि आभार चैत्र प्रकाशनचे प्रकाशक मंदार पाटील यांनी केले.
  यावेळी विजय कोरे, आदर्श सानप, प्रताप पाटील, अरुण सुनगार, चंद्रनिल सावंत यांच्यासह अन्य काव्य रसिक उपस्थित होते.