नागरवाडी नजिक साकारणार भव्य संत गाडगेबाबा उद्यान – जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

  41

  ✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

  बुलढाणा(दि.21जून):-संपूर्ण आयुष्य लोकप्रबोधनासाठी वेचणाऱ्या कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या नावाने नागरवाडी ते विश्रोळी रस्त्यावरील वनजमिनीवर भव्य उद्यान साकार होणार असून, त्याद्वारे वनसंवर्धन होण्याबरोबरच पर्यटनालाही चालना मिळणार आहे, असे प्रतिपादन जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी केले.

  राज्यमंत्री श्री. कडू यांच्या प्रयत्नातून हे उद्यान साकारत आहे. नियोजित उद्यानाची पाहणी राज्यमंत्री श्री. कडू यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते. वनाधिकारी श्री. भट, सुधीर निमकर, श्री. भेंडे, श्री. आवारे, मंगेश देशमुख आदी उपस्थित होते.

  नियोजित उद्यानाचे स्वरूप भव्य असणार आहे. वनविभागाच्या जागेवर त्याची निर्मिती होत आहे. त्यामुळे वनाचे संवर्धन होण्यासह पर्यटनालाही चालना मिळणार आहे. जगाच्या कल्याणासाठी आयुष्य वेचणाऱ्या कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या भूमीत त्यांच्या नावाने हे भव्य उद्यान उभे राहणार आहे, असे श्री. कडू यांनी यावेळी सांगितले.

  उद्यानात जैवविविधता जोपासण्यासाठी विविध प्रजातींची वृक्षलागवड, हिरवळ, विविध सुविधा, संत गाडगेबाबा यांच्या जीवनकार्य व दशसूत्रीबाबत माहिती देणारे फलक, तसेच सौंदर्यीकरणाच्या दृष्टीने परिपूर्ण नियोजन करावे व गतीने काम पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश राज्यमंत्री श्री. कडू यांनी यावेळी दिले.यावेळी त्यांनी उद्यानाची नियोजित जागेची पाहणी करून आवश्यक बाबींची माहिती घेतली.