संघर्ष धान्य बँकेकडून लोकसहभागातून मिळालेले तीन क्विंटल धान्याची पसायदान संस्थेतील निराधार मुलांना मदत

67

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)

गेवराई(दि.21जून):-कोरोना परिस्थिती पाहता ढेकणमोह येथील पसायदान संस्थेतील निराधार मुलांची उपजिवेका भागावी या उदात्त हेतूने संघर्ष धान्य बॅंकेकडून लोकसहभागातून मिळालेले तीन क्विंटल धान्याची मदत दिल्याने येथील निवासी ४१ विद्यार्थीना आधार मिळाला असून पसायदान संस्थेचे संचालक गोवर्धन दराडे यांनी संघर्ष बॅंकेचे आभार व्यक्त केले आहे.
ढेकणमोह जि. बीड येथे गोवर्धन दराडे यांची पसायदान नावाची निराधार मुलांची संस्था असून या संस्थेत या समाजातील अनाथ मुले, वंचित मुले,भटक्या विमुक्त समाजातील मुले, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले, ऊसतोड कामगारांची मुले, शहरात कचरा गोळा करणाऱ्यांची मुले, भंगार गोळा करणाऱ्याची मुले, निराधार मुले यांच्यासाठी पसायदान हा सेवा प्रकल्प 2009 साली सुरू करण्यात आला.

बघता बघता समाज सहभागातून पसायदानचे वटवृक्षात रुपांतर झालेले आहे. आज रोजी या प्रकल्पात 41 मुले निवास करत असून त्यांच्या जेवणाची व शिक्षणाची सोय समाज सहभागातून पसायदान करत असल्याची माहिती संघर्ष धान्य बँकेचे संचालक सुभाष काळे यांनी जाणून घेतली व आज संघर्ष धान्य बँकेच्यावतीने पसायदान या संस्थेसाठी लोकसहभागातून मिळालेले तीन क्विंटल धान्य देण्यात आले. याप्रसंगी पासायदान संस्थेचे संस्थापक गोवर्धन दराडे, बापूराव घुले, संजय पांढरे, धर्मराज करपे, शिवाजी झेंडेकर हे उपस्थित होते.