आष्टी तालुक्यातील शैक्षणिक,अध्यात्म तसेच नाट्यक्षेत्राचा पाया निखळला

  44

  ?वक्ता बनविणारे हक्काचे व्यासपीठ हरवले

  ✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

  आष्टी(दि.22जून):-तालुक्याची ओळख,शिक्षक नेते ह.भ.प.हिरामण रामराव थोरवे गुरूजींचे दि.२१ जून २०२१ सोमवार रोजी अहमदनगर येथे उपचारादरम्यान निधन झाले.मृत्यू समयी त्यांचे वय एक्याऐंशी वर्षाचे होते.वक्तृत्व,नेतृत्व,कर्तुत्व यांचा त्रिवेणी संगम असणारे थोरवे गुरूजी पंचक्रोशीत नाना या टोपन नावाने सुपरिचित होते. नानांच्या अंत्यविधीला माजी जि.प.अध्यक्षा सविता गोल्हार, दूधसंघाचे चेअरमन संजय गाढवे, नातेवाईक, तालूक्यातील शिक्षक व परिसरातील नागरीकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.त्यांच्या पश्चात पत्नी सुमनबाई,मुलगी लताताई थोरवे (मिरगणे),मुले रमेश थोरवे,राजू थोरवे, भावंडे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.थोरवे परिवाराच्या दुःखात दै.रयतेचा वाली सहभागी आहे.

  समाजात काही व्यक्ती आपल्या अंगभूत गुणांनी,वैशिष्ट्यांनी सर्वदूर परिचीत होतात,ते म्हणजे आदरणीय हिरामण थोरवे गुरूजी होते.गुरूजी तसे मुळचे तालूक्यातील पुंडी गावचे.बालपणी आपल्या मामांकडे धामणगांवी शिक्षणासाठी आले आणि धामणगांवचेच होऊन गेले.इतकेच काय पण धामणगांव हा गावचा नामोल्लेख झाला की,लगेच थोरवे गुरूजींच धामणगांव…!!इतकं घट्ट नातं झालं होत.
  आज गांवातील वय वर्षे तिस ते वय वर्षे साठ या वयोगटातील जवळपास प्रत्येकालाच गुरूजींनी शिकवलेलं.त्यांच्या सहवासात आलेला प्रत्येक विद्यार्थी हा त्यांचे ऋण व्यक्त केल्याशिवाय राहत नाही.गुरूजींच व्यक्तीमत्व तसं प्रभावी होत

  .स्वच्छ-सुंदर पांढरा पोशाख,स्पष्ट व खडा आवाज,बोलण्यात कुठलाच आडपडदा नाही,जे आत तेच बाहेर.सरांच्या बोलण्यात अनेक आपलेसे वाटणारे उदाहरणे,विनोद,कोटी सारं काही अरोह-अवरोहासह असायचं.ऐकणाऱ्यांची तृप्ती झाल्याशिवाय राहत नसायची.एकूणच काय तर पारदर्शी,अष्टपैलू आणि अष्टावधानी होते नाना.अध्यापनाचे म्हणाल तर मराठी आणि गणितात त्यांचा हातखंडा.त्यांनी बोलतच राहावं असं वाटायच.बोलण इतक गोड लाघायच की ऐकणारा हमखास त्यांच्या प्रेमात पडायचा.प्रचंड वाचन,गाढाअभ्यास आणि जनसंपर्क त्यांचा होता.गुरूजींच्या अंगी कर्तृत्व,नेतृत्व,वकृत्व,अभिनय या गुणांमुळे शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून जिल्हापातळीवर उल्लेखनीय काम त्यांनी केलेले होते.अधिकारी,पदाधिकारी या सर्वांसोबत त्यांचे प्रेमाचे संबंध होते.त्यांनी आजवर अनेक अधिकारी घडवले,तितकंच अनेक नेतृत्वाला बळही दिलं.सेवानिवृत्त होऊन तेवीस वर्षाचा कालखंड लोटला तरीही त्यांच्या कार्यकालाचा उल्लेख आदराने केला जातो.प्रत्येकाला आपली समस्या सांगण्यासाठी हक्काचे व्यासपीठ म्हणून गुरूजी आठवतात.प्रशालेतील गुरूजी बरोबरच ते गावांचे,तालूक्याचे गुरूजी तथा नाना कधी झाले समजलेंच नाही.

  पुर्वी काही आत्ताच्या सारखे करमणूकीचे साधणं नव्हती.नाटके,मेळावे यातून करमणुकीसोबत समाजप्रबोधन केलं जायचं.त्या मेळाव्यातील,नाटकातील भूमीका गुरूजींनी आपल्या कसदार अभिनयाने अजरामर केल्या.या माध्यमातून त्यांनी नाट्यरसिकांवर जसे राज्य केले अगदी तसेच वास्तवातंही प्रत्येकाच्या कुटुंबात,मनात त्यांनी मानाचे स्थान निर्माण केले होते.गुरूजींच्या वर्कृत्वाचा प्रभाव त्यांच्या शिष्यावर इतका जबरदस्त होता की,आजही तालूक्यात प्रत्येक क्षेत्रात त्यांचे विद्यार्थी आपल्या भाषणकौशल्याने धामणगांवची ओळख कायम ठेऊन आहेत.विहीत वयोमानानुसार व्यक्ती शासकीय सेवेतून निवृत्त होतो हे खरे आहे,पण नंतर मात्र विविध क्षेत्र त्याला खुणावत असतात तसेच गुरूजींनी प्रवचनाच्या माध्यमातून त्यांच गुरूपन जपलं होत.वयाच्या एक्यांऐंशी कडे वाटचाल असतानाही तरूणाईला लाजवेल असा त्यांचा उत्साह असायचा.अनेक ठिकाणी त्यांना प्रवचनासाठी बोलावणं येतं असायच.

  कसलेही आढेवेढे न घेता ही प्रवचनरूपी सेवा देण्यासाठी ते तत्पर असायचे.निरपेक्ष स्वभावामुळे त्यांच्या वैयक्तिक
  तसेच कौटुंबिक जीवनात गुरूजी खूप समाधानी होते.भावडांना,मुलांना संस्कारीत करून उच्चशिक्षित केले.आज सर्व भावंड मोठ्यापदावरून सेवानिवृत्त झाले.मुलं-मुलगी अत्यंत सुखी समाधानी जीवन जगत आहेत.गुरूजी आपले अनुभव,आपण केलेले संस्कार आपली शिकवण आमच्यासाठी अमुल्य देणगी आहे.हा ठेवा अंतापर्यंत जतन करून आपला वसा आणि वारसा आम्ही नक्कीच पुढे चालवू.आपल्या आत्म्यास शांती लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना व आपणांस भावपूर्ण श्रध्दांजली.