आला वटसावित्री सण : करा वड वृक्षारोपण !

  45

  (वटसावित्री सण विशेष)

  हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस ‘वटपौर्णिमा’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. निसर्गतःच दीर्घायुषी असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड, पिंपळ आदी वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली आहे. एखाद्या जातीचा वृक्ष एकदा पवित्र मानला की त्याची सहसा तोड होत नाही. मात्र शहरात विपरित दृश्ये बघायला मिळतात. वडाची झाडे कमी आहेत किंवा पूजेसाठी दूर जावे लागते. म्हणून वड वृक्षारोपण-संवर्धन न करता त्यांच्या फांद्या सर्रास तोडून आणल्या जातात. त्यामुळे वटवृक्षाचे अस्तित्व धोक्यात आले आहे, हे येथे उल्लेखनीयच! स्त्रिया आनंदाने गाणे गात पूजेस निघतात –

  “आज पौर्णिमा सुवासिनीची, चला सयांनो चला!
  वटसावित्री सण आला, वटसावित्री सण आला!!”

  योगी अरविंद यांनी आध्यात्मिक परिभाषेतून सावित्रीचे महत्त्व सांगणारे ‘सावित्री’ नावाचे महाकाव्य लिहिले आहे.
  पारंपरिक कथा : अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली. सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राज्याचा धृमत्सेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता. नारद मुनीला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला. पण सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी विवाह केला व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्याची सेवा करू लागली.

  सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्या बरोबर गेली. लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर कोसळला. यमराज तिथे आला व सत्यवानाचे प्राण हरण करू लागला. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले. पण तिने साफ नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला. अखेर कंटाळून यमाने तिला पतीच्या प्राणाची मागणी सोडून इतर तीन वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासू सासऱ्याचे डोळे व राज्य परत मागितले. आपल्याला पुत्र व्हावा, असाही वर मागितला. यमराजाने गफलतीने तथास्तु म्हटले. तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले. म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात.

  व वटसावित्री व्रत आचरतात. सावित्रीने आंतरिक गुणांची पारख करून निवडलेल्या वरास आई-बाप आणि देवगुरू यांच्या विरोधाला डावलून माळ घातली व पतीचे प्राण वाचवण्याचे अवघड काम चिकाटीने, दुर्दम्य इच्छाशक्तीने आणि चातुर्याने करून दाखविले. म्हणून महिलावर्ग उखाणे म्हणतात –
  १) पहाटे अंगणी माझ्या सुगंधी प्राजक्ताचा सडा, वटपौर्णिमेला… रावांच्या नावे भरला मी हिरवा चुडा!
  २) सत्यवानाच्या सेवेत सावित्री झाली मग्न, … रावांसोबत झाले आताच माझे लग्न!
  ३) भरजरी साडी जरतारी खण, …रावांचे नाव घेते आहे वटसावित्रीचा सण!
  ४) नाजूक अनारसे साजूक तुपात तळावे, …रावांसारखे पती जन्मोजन्मी मिळावे!
  व्रताचा विधी : नदीकाठची वाळू आणून पात्रात भरली जाते. तिच्यावर सत्यवान आणि सावित्री यांच्या मूर्ती ठेवतात. मग त्यांची षडशोपचारे पूजा करतात. त्यानंतर पाच अर्घ्ये द्यावी लागतात. मग सवित्राची प्रार्थना म्हटली जाते.

  पूजा झाल्यावर संध्याकाळी सुवासिनीसह सावित्रीची कथा ऐकवीतात. या व्रतात सावित्रीच्या मूर्तीची पूजा सांगितलेली असली तरी रूढी मात्र वेगळी आहे. सर्व पवित्र वृक्षांत वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही खुप मोठा होतो. अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया,
  “सावित्रि ब्रह्मसावित्रि सर्वदा प्रियभाषिणी|| तेन सत्येन मां पाहि दुःख-संसार-सागरात्||
  अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते|| अवियोगो तथास्माकं भूयात् जन्मनि जन्मनि||
  वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन:|| वटाग्रे तु शिवो देव: सावित्री वटसंश्रिता||”
  अशी प्रार्थना करतात. अर्थात – मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले-नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे! त्याचा असाच काहीसा भावार्थ असतो. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून पौर्णिमेपर्यंत हे त्रिरात्र व्रत करावे, असे शास्त्रात सांगितले आहे. तीन दिवस उपवास करणे अशक्य होत असेल, त्यांनी फक्त पौर्णिमेलाच उपवास करावा. ब्रह्मदेव ही या व्रताची मुख्य देवता असून सत्यवान-सावित्री, नारद व यमधर्म या उपांग देवता आहेत. वटपौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात.

  पर्यावरण शास्त्राच्या दृष्टीने वडाचे महत्त्व विशेष असल्याने त्याच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणे, हाही एक पूजेचा हेतू आहे. आजकाल या दिवशी पतीसुद्धा वडाची पूजा करू लागले आहेत. यामुळे विपरीत असे काहीच नाही. ही कृती वैज्ञानिक दृष्टिकोणातून आरोग्यास पोषकच ठरते. कारण वटवृक्ष हे सभोवार भरपूर प्रमाणात प्राणवायूची उधळण करतात. त्याचा लाभ अवश्यच होतो.

  !! पुरोगामी संदेश परिवारातर्फे वटपौर्णिमेच्या सर्व बंधुभगिनींना हार्दिक शुभेच्छा !!

  ✒️संकलक:-श्री एन. कृष्णकुमार जी.(भारतीय सण उत्सव अभ्यासक व साहित्यकार.)मु. एकता चौक, रामनगर, गडचिरोली.पो. ता. जि. गडचिरोली (४४२६०५)भ्रमणध्वनी – ९४२३७१४८८३.