🔹कोणतेही आव्हान स्वीकारण्याची आणि ते पेलण्या ची क्षमता स्त्रियां मधे जन्मजात असते. – सुमित्रा महाजन, माजी लोकसभा अध्यक्ष

✒️पुणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पुणे(दि.23जून):- रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ आयोजित अटकेपार २०२०-२१ वार्षिक परिषद नुकतीच पार पडली. संपूर्ण वर्षभर रोटरी अंतर्गत केल्या गेलेल्या कार्याचा आढावा या वेळी घेण्यात आला. २०२०-२१ या कालावधीत अशक्यप्राय कार्य यशस्वी रित्या पार पाडण्यात आल्यामुळे या वार्षिक परिषदेस ‘अटकेपार’ हे नाव देण्यात आल्याचे मावळत्या प्रांतपाल रश्मी कुलकर्णी यांनी आपल्या प्रास्ताविकात नमूद केलं.

रोटरी तर्फे पार पाडण्यात आलेल्या महत्वाच्या कार्यांचा आढावा.
आंबेगाव तालुक्यात राबवला गेलेला पाणलोट व्यवस्थापन व एकात्मिक विकास प्रकल्प, १०.००० हून अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया, कोरोना महामारी मध्ये नायडू आणि ससून हॉस्पिटल्स ला विशेष मदत, खारपूर आणि खुपेवाडी या ग्रामीण भागाचा सामाजिक व आर्थिक विकास, साक्षरता मोहिमे साठी एम के डी टब्लेट्स प्रकल्प इत्यादी.

यंदाच्या वार्षिक परिषदेचे यजमानपद रोटरी क्लब ऑफ पुणे पर्वती ने भूषविले. अध्यक्षा माया फाटक यांनी सर्व मान्यवरांचा परिचय करून दिला. सांस्कृतिक कार्यक्रमानी परिषदेची सुरवात करण्यात आली. यंदा कोरोना महामारी मुळे ऑनलाईन पार पडलेल्या या परिषदे मधे माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, पाकिस्तान आणि चीन चे माजी राजदूत गौतम बंबवाले, दिव्यांग शर्यत पटू विक्रम अग्निहोत्री, आधुनिक काळाची पौराणिक काळाशी सांगड घालणारे प्रख्यात लेखक देवदत्त पटनाईक यांनी सहभाग घेतला.

महिला सशक्तीकरण आणि राजकारण या विषयावर बोलताना महाजन म्हणाल्या, कोणतेही आव्हान स्वीकारण्याची आणि ते पेलण्या ची क्षमता स्त्रियां मधे जन्मजातच असते. एक सामान्य गृहिणी ते लोकसभा अध्यक्ष हा प्रवास सांगताना त्या म्हणाल्या, विवाहा नंतर दहा वर्ष मी एका सामान्य गृहिणी प्रमाणेच आयुष्य जगले होते. सासूबाईं बरोबर महिला मंडळात जात असे त्यांच्या बरोबर सामाजिक कार्यात सहभाग घेत असे त्या निमित्त्याने इंदौर महानगर पालिकेत काम करत असताना त्या वेळी भाजपा च्या लोकांनी माझे कार्य बघून कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना देखील मी राजकारणात यावे या साठी आग्रह केला घरच्यांचा पाठिंबा होताच आणि मी ते आव्हान स्वीकारले. पहिलीच निवडणूक आणि अत्यंत चुरशीच्या अशा लढती मधे मी हरले पण आपण या क्षेत्रात काम करू शकतो या बाबतचा माझा आत्मविश्वास वाढला. आव्हान स्वीकारत स्वतःला सिध्द करण्याच्या माझ्या स्वभावा मुळे मी राजकारणात यशस्वी कामगिरी करू शकले.

गौतम बंबवाले आपल्या भाषणात म्हणाले की चीन व भारताच्या ९३ ९६ व २००५ सालच्या करारामध्ये म्हटले आहे की दोन्ही देशांमध्ये शांतता असली पाहिजे परंतु चीनने या कराराचे लडाखच्या सीमेवर उल्लंघन केले आहे. चिनी आशियातील सर्वात शक्तिशाली राष्ट्र आहे त्यामुळे हा देश इतर देशांकडे आपली सेना सरकवत आहे. भारताने आता स्वतःची आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे.

दिव्यांग कार रॅली विजेता विक्रम अग्निहोत्री यांनी अपंगत्वावर मात करून आपल्या आवडत्या साहस आणि रोमांचकारी क्षेत्रात अव्वल स्थान मिळविले आहे. व्यंगावर मात कशी करावी या विषयावर बोलताना ते म्हणाले जीवनात संघर्ष आणि आव्हाने येतात पण इच्छाशक्ती, दृढनिश्चय आणि जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन याच्या जोरावर आपण अपंगत्वावर मात करू शकतो. या सगळ्या संघर्षामध्ये कुटुंबाचा पाठिंबा तेवढाच महत्वाचा ठरतो.

रामायण व महाभारताचा आजच्या काळाशी संबंध या विषयावर बोलताना लेखक डॉ. देवदत्त पटनाईक आपल्या भाषणात म्हणाले की वेद हे गोष्टींच्या स्वरूपात सांगितले जातात म्हणूनच रामायण व महाभारताला पंचमवेद म्हणतात त्या काळी जे घडलं ते रंजक स्वरूपात सांगितलं गेलय आणि त्यामुळे भारतात कानाकोपऱ्यातील लोक हे रामायण व महाभारताशी जोडले गेलेले आहेत. शब्दशः अर्थ घेऊन कोण चांगलं कोण वाईट याची शहानिशा करण्या पेक्षा त्यातला भावार्थ हा महत्त्वाचा आहे. रामायण आणि महाभारतात ‘अरण्य’ आणि त्यातील वास्तव्याचा संधर्भ देताना ते म्हणाले, जंगलामध्ये वर्णव्यवस्था नाही. स्वतःचे रक्षण आणि जीवन स्वःताच्या हातात असते. अरण्य हा निसर्गाचा ‘डिफॉल्ट प्रोग्राम’ आहे. त्यांनी लिहिलेल्या रामायण फॉर चिल्ड्रन आणि महाभारत फॉर चिल्ड्रन या दोन पुस्तकांचे प्रकाशन या वेळी करण्यात आले.

या परिषदेस रोटरी इंटरनॅशनल चे माजी अध्यक्ष कल्याण बॅनर्जी तसेच रोटरी इंटरनॅशनलचे माजी अध्यक्ष आणि ट्रस्टी प्रमुख केआर रवींद्रन, आर आय डायरेक्टर डॉ. भरत पंड्या, नवनिर्वाचित आर आय डायरेक्टर डॉ. महेश कोटबागी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच पी डी जी विनय कुलकर्णी, रोटरी क्लब ऑफ पुणे पर्वती चे सर्व पदाधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते.आभार प्रदर्शन परिषद संचालक मुकेश सुपणेकर यांनी व सूत्रसंचालन राहुल क्षीरसागर यांनी केले.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED