किमया, महापुरुषांच्या विचाराधारेची!

  39

  महापुरुषांच्या कष्ट, त्याग, समर्पण, कार्यकर्तृत्व तथा विचारधारेमुळे जगात क्रांती होऊन अनेकांचे जीवन सुखमय झाल्याची इतिहास साक्ष देतो. सर्व सत्ता एक हाती एकवटून एकाधिकारशाहीने वागणारे अल्पसंख्यांक लोक जेव्हा बहुसंख्यांकांना आपल्या कह्यात ठेवू पाहत होते तेव्हा त्यांना मुक्त करण्यासाठी महापुरुषच सरसावले. त्यांनी गुलामांना गुलामीची जाणीव करून दिली त्यामुळे गुलामांनी बंड केले, तर काही अल्पसंख्यांक सत्ताधाऱ्यांनीही समतेला प्राधान्य देत आपली भूमिका मवाळ केली. परंतु आप्तस्वकीयांपुढे त्यांना नमते घेणे भाग पडले.

  ज्या ज्या जाती-जमातींनी महापुरुषांच्या विचारधारेला प्रमाण मानले, त्यांनी काही प्रमाणात का होईना आपली प्रगती साधली. परंतु त्या प्रगतीचेही मूल्यमापन करताना कित्येकांनी गोता खाल्ला. काहींनी महापुरुषांच्या विचारधारेचा अभ्यास करून किंवा थोडेफार त्यांचे प्रमाणवाक्य मुखपाठ करून लोकांसमोर आवेशपूर्ण बरडणे सुरू केल्यामुळे त्यांच्या रोजगाराचा प्रश्न मिटला. पुढे तेच, जमिनीवरही अस्तित्व नसणारे हवेत तरंगू लागले. काही लोक महापुरुषांच्या निर्माणीत व्यवस्थेमुळे आमदार, खासदार, मंत्री होवून काहींना शासन प्रशासनामध्ये मोक्याच्या जागी आसनस्थ होण्याची संधी मिळाली. परंतु यशाचे श्रेय ज्याचे त्याला न देता कोणी देवाला, कोणी स्वतःला, कोणी प्रारब्धाला तर कोणी जन्मदात्यांना देऊ लागले. अशा लोकांना साधा प्रश्न विचारणे क्रमप्राप्त ठरते की, भूतकाळामध्ये म्हणजे संविधानाच्या आधी सुद्धा आपल्या पूर्वजांनी आपापली अपत्य प्रसवली. प्रारब्धाला महत्त्व देऊन देवांनाही मनोमन भजले. तेव्हा त्यांच्यावर कृपादृष्टी का झाली नाही? याचे उत्तर मात्र निरुत्तर हेच आहे.

  आज समाजामधील स्त्रियांसह अनेक लोकांमध्ये संविधानिक व्यवस्थेमुळे लायकी निर्माण होऊन आभाळ ठेंगणं वाटावं एवढे त्यांना मिळालं. त्याला मी स्वतःही अपवाद आहे असे नाही. त्याचा मला नेमकाच प्रत्यय येवून गेला. दि १७ जून २०२१ रोजी माझा वाढदिवस होता. मी महापुरुषांच्या विचारधारेचा प्रचार-प्रसार लेखणी तथा वाणीच्या माध्यमातून करत असल्यामुळे समाजातील जिवाभावाचे मित्र, चळवळीतील सहकारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, अधिकारी, तथा अनेक प्रतिष्ठितांनी मला दूरध्वनी, दूरसंवाद, भ्रमणध्वनी तथा भेटीअंती भरभरून शुभेच्छा दिल्या. ज्यामुळे माझ्या अंत:शक्तीसह अंतःप्रेरणा जागृत होऊन त्या प्रेरित झाल्या. मी अतिशय सद्गदित झालो. म्हणून मी थोड्यावेळासाठी स्वतःमध्येच हरवून गेलो. परंतु लगेच भानावर येऊन या सर्व गोष्टीचे विश्लेषण करता झालो. त्यावेळी माझ्या पुर्वेइतिहासातील काही आठवणींची मला आठवण झाली. आमच्या कुटुंबाच्या आयुष्याला अठराविश्वे दारिद्र्य पुजलेले होते. त्यामुळे दोन वेळच्या खाण्याचीही भ्रांत होती. संपूर्ण शिक्षण वस्तीगृहामध्ये झालं. त्यावेळी शाळेमधून कोणताही लाभ मिळत नसल्यामुळे सुट्ट्यांमध्ये आपापली मोलमजुरी करून गणवेश व शालेय साहित्याची जुळवाजुळव करावी लागत असायची. अशा परिस्थितीमध्ये वाढदिवस म्हणजे काय? केकची चव कशी असावी? तो आपल्याला चाखायला मिळेल किंवा नाही? वाढदिवस ही संस्कृती आपल्यासाठी नाहीच जणू! अशी भावना निसंकोच दृढ झाली होती.

  आज मात्र परिस्थिती पूर्णपणे अनुकूल असून सर्व काही आलबेल आहे. माहवारी वेतनासह लाखांची गाडी-माडी आहे. समाजामध्ये बऱ्यापैकी प्रतिष्ठा आहे. महिन्याच्या पहिल्या तारखेला कपड्यांचा जोड घालायला सुरुवात केली तरी शेवटच्या दिवशीही संपू नये एवढी मुबलकता आहे. हे कशामुळे शक्य झालं देवामुळे? प्रारब्धामुळे? स्वतःच्या कष्टामुळे? की जन्मदात्यामुळे? याचे उत्तर एकच आहे, ते म्हणजे महापुरुषांच्या त्याग समर्पण कष्ट आणि आंदोलनामुळे. काही लोकांना कदाचित असेही वाटू शकेल की, यामध्ये जन्मदात्यांना कुठेच स्थान नाही का? निश्चितच आहे. परंतु महापुरुषांपेक्षा मोठं नाही. म्हणून प्रथम महापुरुषांप्रती कृतज्ञता निर्माण होणे आवश्यक आहे. ती झाली तर जन्मदाते, कुटुंब, नातेवाईक, समाज व देशाप्रती निर्माण होईल. अन्यथा उच्चशिक्षितांच्याच जन्मदात्यांसाठी वृद्धाश्रमांची निर्मिती आहे की काय? अशी शंका घेण्यास वाव आहे. कारण तेथे त्यांचीच रेलचेल बऱ्यापैकी दिसून येते.

  सन १९५० पासून निर्माण झालेल्या संविधानिक व्यवस्थेमुळे अनेकांना शासन प्रशासनात प्रतिनिधित्व मिळाले. म्हणून त्यांच्या पदरी सुखाचे दिवस आल्याचे दिसत आहेत. त्यापैकी कित्येक लोक आपापल्या साडी माडी गाडी मधे गुंतून गेले. आपल्या पाठीमागील अर्धपोटी समाजाकडे त्यांनी पाठ फिरवून शहरं गाठली. मी तो नव्हेच! या अविर्भावात जीवन व्यतीत करू लागले. महापुरुषांचा व्यवस्था परिवर्तनाचा, म्हणजे समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुत्व या मानवी मूल्यांवर आधारित समाज व्यवस्था निर्माण करण्याचा संदेश ते सोयीस्कर विसरून गेले. आहे ती संविधानिक व्यवस्था टीकवण्यापुरताही चळवळीला हातभार लावताना ते दिसत नाहीत. त्यामुळे येणाऱ्या पिढ्यांचे भवितव्य त्यांच्या डोळ्यासमोर अंधाराकडे वाटचाल करत आहे. काहींनी तर स्वार्थापोटी शत्रूच्या गोटात प्रवेश केला आहे. याचा अर्थ असा म्हणावा की, आपल्या विषमतावादी शस्त्राने संविधानाच्या नरडीचा घोट घेऊ पाहणाऱ्या लोकांच्या खांद्यावर त्यांनी मान ठेवली की काय? अशा लोभी, स्वार्थपरायण, समाजघातकी लोकांपासून समाजाने सावध राहून प्रसंगानुरूप स्वहितासाठी महापुरुषांचा विचारधारेचा वापर करणाऱ्यांना भीक घालू नये. गडगंज मानधन घेणाऱ्यांकडून विचारधारा ऐकू नये. आवेशपूर्ण बोलणे व कडक अभिवादनाला भाळून जाऊ नये.

  माझ्यासारखा वेतनधारी मानधनावर वाणी आणि लेखणी झिजवत असेल तर छदामही फेकून मारू नये. अन्यथा आस्थेतही करोडोंचे घोटाळे होतांना दिसत आहेत. असे होऊ नये म्हणून प्रत्येकाने चिकित्सा. विश्लेषण, प्रश्न विचारणे, उत्तर मिळवणे, ही संविधानिक कर्तव्य पार पाडावी, एवढीच सार्थ अपेक्षा !!!!!

  ✒️लेेखक:-भीमराव परघरमोल(व्याख्याता तथा अभ्यासक,फुले शाहू आंबेडकरी विचारधारा,तेल्हारा जि. अकोला)मो.९६०४०५६१०४