वड पुजायचा की रुजवायचा?

24

व्रत’ म्हणजे प्रतिज्ञा, संकल्प, उपासना इत्यादीसाठी विशिष्ट नीतीनियमांनी करावयाचे आचरण. म्हणून व्रते आणि उत्सव ह्यांच्यातील सीमारेषा धुसर दिसते.आपण यानिमित्ताने ‘वटसावित्री’ चे व्रत चिकित्सकपणे,डोळसपणे आभ्यासण्याचा प्रयत्न करु.

कथा अशी आहे की अश्वपती राजास खूप तपानंतर ‘सावित्री’ देवीच्या आशिर्वादाने रुपवान,देखणी कन्या प्राप्त होते त्यामुळे तीचे नाव सावित्री ठेवण्यात येते.पुढे अश्वपती सावित्रीचे लग्न करावयाचे ठरवतो. परंतु त्या काळी ज्या मुलीला भाऊ नसे त्या मुलीशी कुणी लग्न करण्यास तयार होत नसे म्हणून अश्वपती सावित्रीला स्वतःचा वर स्वतः शोधण्याचे सुचवतो. वराच्या शोधात ती अनेक राज्यातुन फिरत असतांना एका जंगलात तिला ‘सत्यवान’ राजा मातीच्या हत्ती,घोङ्यांसोबत खेळतांना दिसतो.त्याचे राज्य गेल्यामुळे तो आपल्या अंध पित्यासोबत जंगलातच रहात असे.सावित्री सत्यवानासोबत लग्न करण्याचा विचार करते परंतु नारद तीला सत्यवानाचा वर्षभराच्या आत मृत्यू होईल असे सुचीत करतात. तरीदेखील सावित्री सत्यवाना सोबतच लग्न करते.

ठरल्याप्रमाणे वर्षभराच्या आत यम सत्यवानास यमलोकी नेण्यासाठी येतो पण ती यमाला तसे करु देत नाही.शेवटी यम सावित्रीला तीन वर मागण्यास सांगतो व ती तीच्या चाणाक्ष बुद्धीच्या जोरावर तीचा पती ,ऐश्वर्य सर्वकाही परत मिळवते. सत्यवान वडाच्या झाडाखाली जिवंत होतो म्हणून तेव्हापासून हे व्रत करण्याची व वडाची पूजा करण्याची प्रथा ‘वटसावित्रीपोर्णिमा’ म्हणून प्रचलित झाली.या दिवशी बायका उपवास करून वडाची पुजा करतात वडाला सुताचे वेष्टण घालतात व जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशा प्रार्थनेसोबत वडाला प्रदक्षिणा घालतात.

ही झाली पारंपारिक कथा.आपण आता आजच्या काळाचा विचार करु समजा एखाद्या सावित्रीचा सत्यवान आज आजारी पडत असेल व सावित्री अशिक्षित ,बुद्धीहीन ,साधी,भोळी,अडाणी असली तरी तीला तीचा सत्यवान दवाखान्यात नेण्याचा सल्ला देण्याची गरज भासत नाही कारण इतपत बौद्धिक पातळी आपण नक्कीच गाठली आहे म्हणून वडाला फे-या मारत स्वतःच्या सत्यवानाचे प्राण वाचवणारी सावित्री आता निश्चितच कालबाह्य झालेली आहेआणि हे विचारआजच्या वैज्ञानिक काळाशी पूर्णपणे विसंगत आहेत म्हणून व्रत,वैकल्य साजरे करुण आपण आपल्या वेळेचा,पैशाचा,विज्ञान निष्ठेचा,सकारात्मक दृष्टीकोनाचा अपमान करत असुन आपला बुद्धीशी असलेला तर्कसंगत संवाद नाकारत आपणच आपली दिशाभूल करीत आहोत हे स्पष्टपणे लक्षात येते.

माझ्या सारख्या अनेक सर्वसामान्य बायकांना ब-याचदा प्रश्न पडतो की आपण हे व्रत का आणि कशासाठी करतो? खूप खूप विचार करता असे लक्षात येते की मी,माझी आई,आजी आणि त्याआगोदरच्या अनेक पिढ्या हे व्रत मनोभावे पार पाडत असल्यामुळे कळत नकळत हा सांस्कृतिक पगडा आमच्या बालपणापासूनच मनावर जाणीवपूर्वक बिंबवल्या गेला,लादल्या गेला.दिवसेंदिवस तो अधिक दृढ होऊन घट्ट कोरला गेला व पुढे तो कळत नकळत मान्य झालाव रुढ होत गेला. आणि आता तो आम्हा बायकांना आमच्या जगण्यातला आवश्यक,अविभाज्य संस्कार वाटु लागतो. म्हणजे कुठल्याही विचारांच्या,तत्वांच्या, बुद्धीच्या पारड्यात या रुढी न पारखता आम्ही स्वतः वर ही भावनिक ,सांस्कृतिक सक्ती पिढ्यान पिढ्या लादून घेत आलो.

आणि तीचे वहन पुढच्या पिढीकडे करत आहोत ही सक्ती आता इतकी आपलीशी आणि सरावाची झाली आहे की परंपरावाद, संस्कारांच्या नावाखाली माझ्या वेळेची, भावनेची,उत्साहाची गुंतवणूक आम्ही कुठे,कशी करीत आहोत असे प्रश्नदेखील देखील आमच्या मनाला पडत नाही. पर्यायाने रुढीवादाच्या या गुंत्यातुन बाहेर पडण्यासाठी मन धजावत नाही म्हणून या प्रथांचे पालन आपण काटेकोरपणे करतो.

आधुनिक स्त्री कमालीची बदललेली आहे. शिक्षण घेऊन प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने नव्हे तर काकणभर पुढे सरसावली आहे. म्हणजेच त्या जोडीदाराच्या प्रत्येक जवाबदारीत समांतर पातळीवर सहभाग नोंदवून स्वतःच्या नात्याबद्दलचे प्रेम,आदर व भावना नात्याबद्दलची श्रद्धा त्यांच्या कर्तृत्वातुन व्यक्त करीत आहेत. म्हणजेच हे प्रेमाचे ,निष्ठेचे,नवनिर्मितीचे सकारात्मक दृष्टीकोनाडे वाटचाल करणारे सात्त्विक व्रतच नाही का?

पुर्वीच्या काळी वडाची पुजा करण्याची प्रथा असल्यामुळे मुबलक झाडेदेखील लावण्यात येत असत.आताशा गाव शहरात रुपांतरीत झाली आहेत जंगले तोडून त्यावर शहर विसावली आहेत म्हणून वडाची भरपूर झाडे उपलब्ध असण्याची परिस्थिती उरलेली नाही. अशात बायका वडाच्या फांद्या तोडुन पुजा करतात तर काही शहरी माँडर्न विचार वडाचा बोनसाय करुन कुंडीत पुजेसाठी प्रस्थापीत करतात. एकंदर निट विचार केल्यास कर्मकांडही निसर्गाची, दैवताची कृतज्ञता व्यक्त करणा-या सरळसाध्या संकल्पनेस मोठा आघात आपण पोहोचवत आहोत व वडाच्या बोनसायसोबतच आपल्या बुद्धीचा *बोनसाय* स्पष्टपणे अधोरेखीत करीत आहोत.म्हणजे हे व्रत फांद्या तोडून साजरे होत असेल तर ते पर्यावरणपुरक नक्कीच नाही हे दर्शवावेसे वाटते.

वटसावित्री साजरी करणाऱ्या ब-याच बायकांना मागच्या वर्षी मी एक प्रश्न विचारला. तुमच्या पती सोबत तुम्हाला जन्मोजन्मी संसार करायला आवडेल का? विश्वास बसणार नाही पण स्पष्टपणे नमुद करावेसे वाटते, प्रश्न विचारलेल्या बायकांच्या चेहयावरील हावभाव त्यांचा नकार स्पष्टपणे दर्शवत होते. त्यामुळे एकंदरच बायकांच्या वडफे-याच्या सोहळ्यामागे त्यांचा देवभोळेपणा, भाबळेपणा स्पष्टपणे पाठराखन करतांना दिसून येतो. व रुढीवादाच्या चक्रव्युहातुन माणुस पट्कण बाहेर पडु शकत नाही हेच अंतिम सत्य स्पष्टपणे लक्षात येते.

काळानुसार चुलीवरचा स्वयंपाक आपण गँसवर करणे जितक्या सहजपणे स्वीकारले आहे. त्याचप्रमाणे या व्रतांमधे काही परिस्थीतीजन्य बदल करता येतील का याचा विचार यानिमीत्ताने करणे खूप गरजेचे आहे. कालबाह्य कर्मकांडात सकारात्मक बदल होत नसतील तर तो समाज प्रगतीकडे वाटचाल करु शकत नाही.यामुळे व्रते नेहमीच नैतिक आशयाशी जोडलेली असावीत.ती पाळत असतांना मुळ गाभा न हरवता ती वेळेशी सुसंगत देखील असावी ही आपल्या सर्वांची नैतिक जवाबदारी आहे.वरील सर्व बाबींचा व्यापक व सारासार विचार केल्यास कुठल्याही व्रतात आत्मसंयमाची शिकवण असणे गरजेचे परंतु या व्रतातून कुठलीही शिकवण दूरदूरपर्यंत परावर्तीत होतांना दिसत नाही.

शिवाय यातून स्त्रीजिवनाच्या भाबळ्या,श्रद्धाळू स्वभावाचा गैरफायदा स्पष्टपणे चित्रीत होतो कारण असे कुठल्याही प्रकारचे व्रत ईतिहासात एखाद्या पुरुषाने आपल्या पत्नीसाठी केल्याचे ऐकण्यात नाही ,कथेत किंवा पुरावा देखील नाही. यामुळे या व्रतातून कुठला हेतू साध्य होण्याची शक्यता संभाव्य नाही. म्हणून एखादी गोष्ट जर कालबाह्य झाली तर आपणच आपले बौद्धिक ,भावनिक ,मानसिक शोषण करीत आहोत असे अपरिहार्यपणे म्हणावेसे वाटते.

चला तर मग या रुढींना,परंपरांना आपण ज्ञानाच्या कक्षेतुन तपासून काही समाजउपयोगी व्रते हाती घेता येतील का याचा प्रत्येकाने विचार करु.वटसावित्रीच्या निमित्ताने एखादी आधुनिक बुद्धिमान सावित्री आपल्या पतीच्या व भावी पिढीच्या आयुर्मानासाठी वडाच झाड लावत असेल तर ती ख-या अर्थाने स्वतः ला सावित्री सिद्ध करण्यात समर्थ ठरेल यात शंका नाही. म्हणून स्वागत करु या काही नवीन चैतन्यदायी उपक्रमांच आणि दाखवून देऊ की आम्ही जिजाऊ,सावित्री,अहिल्याबाई यांच्या समृद्ध व्रतांच्या भावी वारसदार असुन हा वारसा उत्साहाने पुढे चालवू व संस्कार,संस्कृती अशा भरजरी मुलामा चढवलेल्या,व स्वतःचे बौद्धिक शोषण करणाऱ्या प्रथांना व रुढींना बळी न पडता आपणच स्वतःवर लादलेल्या या व्रत ,वैकल्यांचा चिकीत्सकपणे वेध घेण्याचा प्रयत्न करु क्यो की

“सिर्फ हंगामा खङा करना मेरा मकसद नही…
सारी कौशिश है कि ये सुरत बदलनी चाहिए..

✒️लेेखक:-मंगल नागरे देशमुख 95117 81578
अमळनेर,जि.जळगाव