आरक्षणाचे जनक राजर्षी शाहूमहाराज आणि मराठा समाज ?

33

एक मराठा लाख मराठा या घोषणे मुळे राज्यातील नव्हे देशातील सर्वच क्षेत्रातील व्यवस्था परिवर्तन सत्तापरिवर्तन झाले पाहिजे होते.मराठा समाज शैक्षणिक दुष्ट्या जागृत झाला असता तर राजकीयदृष्ट्या कुशल नेतृत्व करणारा समाज म्हणुन देशभर छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहूमहाराज यांचा आदर्श सांगू शकला असता.महाराष्ट्र राज्यात विशेष मराठा समाजात आज ही राजर्षी शाहूमहाराज यांचे महत्व पाहिजे त्या प्रमाणात नाही.मराठा सेवा संघ आणि त्याच्या ३२ कक्ष गेल्या ३० वर्षात शिवाजी शाहूमहाराज समजावून सांगत आहेत.आज २६ जून राजर्षी शाहू महाराज यांची जयंती.फुले-शाहू-आंबेडकर हे आधुनिक महाराष्ट्राचे, पुरोगामी महाराष्ट्राचे प्रेरणास्त्रोत आहेत.असे किती मराठा समाजाचे भाजप शिवसेना मनसेतील नेते व सैनिक मानतात.

आता छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराजांच्या वारसदारांनी मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी भाजपाच्या सांगण्यावरून जन आंदोलनात उडी घेतली असे लिहले तर चुकीचे होणार नाही,कारण ११ जून २०१६ ला भाजपाने संभाजीराजे यांना राज्यसभा सदस्य म्हणून घेण्याची शिपारस राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना केली. छत्रपती उदयनराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट तेरावे वंशज आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून मराठा समाज त्यांना डोक्यावर घेऊन नाचत होता, राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर सातारा लोकसभा मतदारसंघातुन ते २०१९ ला खासदार म्हणून निवडून आले होते.जाणत्या राजापेक्षा ते स्वतःला ग्रेट समजायला लागले होते त्याला खतपाणी भाजपाने खूप घातले त्यामुळेच ते राष्ट्रवादी सोडून भाजपाचे उमेदवार झाले.आणि पोटनिवडणुक लढविली त्यांचा आत्मविश्वास होता. जनता माझ्या मागे शंभर टक्के राहील. मतदारांनी त्यांना त्यांची ओळख करून दिली आणि श्रीनिवास पाटील यांना मतदारांनी निवडून दिले.हे दोन राजे लोकसभा,राज्यसभेत असतांना मराठा आरक्षणाच्या कायद्यासाठी त्यांनी सभागृहात कधी तोंड उगडल्याची अधिकृतपणे नोंद नाही.

कारण तिथे पक्षाच्या आदेशानुसार प्रश्न व समस्या, चर्चा कराव्या लागतात.ते त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून काम केले नाही, आता मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलने करतात.म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांनी ज्या जाती पाती च्या भीती पाडून मावळा आणि ब्राह्मणेतर संघटित केला होता, तो आर एस एस प्रणित भाजपाच्या चौकटीत बसत नाही, त्यांना जाती पातीत विभागलेला हिंदू पाहिजे त्यांनी आपसात आरक्षणासाठी भांडले पाहिजे.दंगली जाळपोळ केली पाहिजे अशी इच्छा आहे.त्या समर्थना साठी राजे रस्त्यावर उतरून आंदोलन करतात.छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज हे देणाऱ्या समाजाचे राजे होते. म्हणूनच त्यांनी सामाजिक,शैक्षणिक आर्थिक दुर्बल जातीच्या लोकांना आरक्षण दिले. विषमता नष्ट करून समानता समता, स्वातंत्र्य बंधुत्व निर्माण करणारे राजे हे क्रांतिकारी विचारांच्या राज्याचे राजे होते.

आणि आजचे राजे हे विषमतावादी विचारांच्या मनुवादी विचारांच्या समर्थकांचे समर्थक झाले आहेत. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज जातीच्या चौकटीत बंदीस्त केल्या गेले.हे सगळे पुन्हा जाती-पातीच्या समाजकारणाशीच संबंधित होत आहे. महात्मा फुले यांना माळी समाजाने मना पासुन कधीच दैवत मानले नाही, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सर्व दलितांनी आपले दैवत बनविले पण किती मानले हा प्रश्न आहेच?. राजर्षी शाहू महाराज यांना स्वीकारणे मराठा समाजासाठी तेवढे सोपे नव्हते. आजही नाही. आजही मराठय़ांना शाहू महाराज अडचणीचेच वाटतात. देशात आरक्षण ही संकल्पनाच राजर्षी शाहू महाराजांनी सुरू केली,कारण मराठा समाज हा देणारा होता. आपल्या संस्थानात मागासवर्गीय आणि आर्थिक दुर्बलांसाठी ५० टक्के आरक्षण लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय १९०२ मध्ये त्यांनी घेतला होता. वेगवेगळ्या नावांनी काम करणाऱ्या मराठा संघटना आज शिवाजी महाराज,जिजाऊ यांची नावे घेतात, परंतु शाहू महाराज अनेकांना अडचणीचे वाटतात. कारण शाहू महाराजांना स्वीकारले, तर आरक्षणाचे समर्थन करावे लागते.

आणि आरक्षणाचे समर्थन करून मराठय़ांचे संघटन करता येत नाही.म्हणून मराठा सेवा संघ आणि त्याचे 32 कक्ष मराठा समाजाला राजर्षी शाहु महाराज जास्त सांगताना दिसत नाही.आम्हाला आरक्षण द्या नाही तर इतरांचे बंद करा.या मागण्यासाठीच एक मराठ लाख मराठ ही घोषणा पुढे आली.आता त्यांचे काय झाले आणि होत आहे हे सर्वांनाच माहित आहे.राज्यातील मराठा बांधवांनी एक मराठा, लाख मराठा अशाप्रकारे घोषणा देत राज्यात ५८ मोर्चे काढले. त्या मोर्चांना राज्यभरात उदंड प्रतिसाद मिळाला. या मोर्चाने मराठा आरक्षण मार्गी लागेल अशाप्रकारे आशा निर्माण झाली. त्यासाठी मराठ्यांना शिक्षणात १२ टक्के व नोकर्‍यात १३ टक्के आरक्षण त्यावेळच्या फडणवीस सरकारने घोषित केले. गायकवाड आयोगाच्या शिफारशी मुंबई उच्च न्यायालयाने लागू केल्या. मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब करत मराठ्यांना आरक्षण मिळाल्याचा आनंद झाला.

परंतु या आरक्षणाविरोधात गुणरत्न सदावर्ते सर्वोच्च न्यायालयात गेलेच त्याचबरोर अनेक ब्राम्हणांनीही सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. परंतु केवळ गुणरत्न सदावर्ते या व्यक्तीलाच मीडियाने फोकसमध्ये ठेवले. कारण भांडणे लागली तर मराठा आणि एस सी मध्येच लागतील ही ब्राम्हणांची कपटी चाल होती. परंतु मराठा आरक्षणा विरोधात नावे पाहिली तर अनेक ब्राम्हण आहेत. त्यात संजीत शुक्ला, मधुश्री नंदकिशोर जेठलिया, देवेंद्र रूपचंद जैन,कमलाकर सुखदेव दरोडे,ईशा देशमुख,आदित्य बिमल शास्त्री,अमिता गुगाले, सागर सारडा, उदय ढोपले, विष्णूजी मिश्रा, रूचिता कुलकर्णी, श्रीहरी अणे यासारखी मंडळी आहेत. त्यात सेव्ह मेरीट सेव्ह नेशन या संस्थेचे लोक आरएसएसशी संबंधित आहेत. ते लोकदेखील सर्वोच्च न्यायालयात गेले. म्हणजे मराठ्यांच्या आरक्षणाला ब्राम्हण विरोध करत आहे. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. मराठा नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. त्यातच राज्यातील भाजपा नेत्यांनी डबल ढोलकी वाजवली. मराठा आरक्षणाला आम्हांला पाठिंबा आहे. परंतु यांचेच लोक मराठा आरक्षणा विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेले होते.

परंतु सदावर्तेचे नाव मीडियात जास्त चालवण्यात आले.आणि मराठा विरोधी मागासवर्गीय तो ही फक्त आंबेडकरी विचाराचा असे संकेत खेड्या पाड्यात जात आहेत.मराठा समाजाला खुश करण्यासाठी सर्व सरकारी खात्यात पदोन्नती दिली जात आहे.उघड उघड दोन समाजात दंगली लावण्याचा डाव महाआघाडी सरकार खेळत आहे.छत्रपती शिवाजी महाराज,राजर्षी शाहूमहाराज यांच्या क्रांतिकारी सामाजिक न्यायला हरताळ फासल्या जात आहे.२६ जून राजर्षी शाहूमहाराज जयंती निमित्याने मराठा समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांनी तरुणांनी त्यांचा इतिहास वाचणे आवश्यक आहे.चुकीच्या दिशेने जाऊन आयुष्मान खराब करू नका.
सामाजिक बंधुभाव,समता,मागासवर्गीय बांधवांचा उद्धार,शिक्षण,शेती,उद्योगधंदे,कला व क्रिडा,आरोग्य आदी क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी ज्यांनी शर्थीचे प्रयत्न केले, ते आधुनिक भारताचे भाग्यविधाते, आरक्षणाचे जनक यशवंत जयसिंगराव घाटगे म्हणजेच छत्रपती शाहू महाराज,पारतंत्र्य, दुष्ट रूढी परंपरा, निरक्षरता, अज्ञान इत्यादी समस्यांनी ग्रासलेल्या काळात २६ जून १८७४ रोजी कोल्हापूर येथे त्यांचा जन्म झाला. शाहू महाराज नावाप्रमाणेच यशवंत राहिले.

भारतमातेच्या पोटी अनेक थोरांनी,संता,महंता,राजे, महाराजे,समाज सुधारकांनी जन्म घेऊन भारतातील गोरगरीब दीन दुबळ्यांची मनोभावे सेवा केलेली आहे.पण राजर्षी शाहु महाराजा त्यांच्या पेक्षा काकन भर सरस आहेत.बहुजन हिताय बहुजन सुखाय हे सूत्र ध्यानात घूऊन शाहू महाराज राज्यकारभार पाहू लागले. स्वातंत्र्य,समता,बंधुता आणि न्याय याची फळे सर्व समाजाला चाखता यावीत म्हणून त्यांनी आपले सिंहासनच पणाला लावले. अज्ञान अंधश्रद्धा, निरक्षरता सामाजिक दुजाभाव, दारिद्रृय यात गुरफटलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी महाराजांनी आपला खजिना सताड उघडा ठेवला.छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक बंधूभाव, समता, स्वातंत्र, मागासवर्गीय बांधवांचा उद्धार,शिक्षण,शेती,उद्योगधंदे,कला,क्रीडा,आरोग्य इ. क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी त्यांनी खूप परीश्रम घेतले. समाजातील गोरगरीब, दीनदुबळे, मागासवर्गीय, उपेक्षित व आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांच्या सर्वागीण विकासाला प्राधान्य देणारे ते एकमेव राजे होते.

सुरूवातीस कोल्हापूर संस्थानात आरक्षणाचा कायदा लागू केला. समता प्रस्थापित करण्याच्या ध्येयाने अस्पृश्यता निवारणाकरिता जातीभेद निर्मूलन, बलुतेदारी पद्धतीवर बंदी आणली. स्त्री शिक्षण, देवदासी प्रथेचे उच्चाटन, महिला संरक्षण कायदा, विधवा पूनविर्वाह कायदा, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन यासारख्या परीवर्तनवादी मुद्दे प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याचे धाडस त्यांनी केले व त्यांची अंमलबजावणी होते की नाही ते स्वत: खात्री करून घेत असत. स्त्री हक्क स्वातंत्र्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन पत्नीला त्रास देणाऱ्या पतीसाठी शिक्षेच्या कायद्याची तरतूद केली. अनिष्ठ रुढी परंपरा उच्चाटनासाठी प्रयत्न केले. १९१७ मध्ये विधवा पूनर्विवाह कायदा व विवाहनोंदणी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली.शंभर वर्षापूवी शाहूराजांनी ज्या दूरदृष्टिने निर्णय घेतले, त्याच्या जवळपासही आजचे राज्यकर्ते जाऊ शकत नाहीत. मानवी जीवनाच्या विकासाचे असे एकही क्षेत्र नाही, ज्यासाठी महाराजांनी काम केले नाही.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृशांचे नेते असल्याचे त्यांनीच माणगावच्या परिषदेत जाहीर केले. सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला. राधानगरी धरण बांधून सिंचनाची सोय केली. कुस्तीला प्रोत्साहन दिले. कोल्हापुरात प्रत्येक जातीसाठी स्वतंत्र वसतिगृहे सुरू करून उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात क्रांतिकारक कार्य केले. फासेपारध्यांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी राबवलेली बांधकाम योजना राज्यकर्त्यांना नेहमीच मार्गदर्शक ठरणारी आहे. हे सगळे करीत असताना समाजातील विशिष्ट वर्गाशी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. संघर्ष करतानाही त्यांनी विकासाची वाट आणि तळागाळातील घटकांप्रती असलेली बांधिलकी याचा कधी विसर पडू दिला नाही. प्रस्थापितांनी त्यांच्या बदनामीच्या कहाण्या रचल्या. परंतु नव्या पिढीतल्या इतिहास संशोधकांनी त्या कहाण्या म्हणजे हितसंबंध दुखावलेल्या मंडळींनी रचलेली कुभांडे असल्याचे सिद्ध केले आहे. बहुजन व मागासवर्गीय समाजातील मुला-मुलींना परिपूर्ण शिक्षण मिळाल्याशिवाय त्यांचा बौद्धिक,सामाजिक व आर्थिक विकास शक्य नाही हे महाराजांनी हेरले व ५०० ते १००० लोकवस्तीच्या गावाला शाळांची निर्मिती केली व शिक्षण सक्तीचे केले.

एवढे करून न थांबता त्यावरील शुल्क माफ केले. जे पालक आपल्या पाल्यांना रोज शाळेत पाठविणार नाही अशा पालकांना प्रतिमहिना एक रुपया दंड आकारण्याची कायदेशीर तरतुदही केली. तसेच त्यांनी वसतीगृहे उभे केलीत, गरिब विद्यार्थ्यांसाठी तर त्यांनी आपला राजवाडाच खुला केला. यामुळे बहुजन व मागासवर्गीय समाजातील विद्यार्थी-विद्यार्थीनींना शिक्षणाचे दरवाजे खुले झालेत.८ सप्टेंबर १९१७ रोजी सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा जाहिरनामा काढला. २१ मे १९१९ रोजी आर्थिक दृष्टय़ा दुर्बल विद्यार्थ्यांना फी माफीचा निर्णय घेतला. १ जानेवारी १९१९ रोजी आज्ञा देवून प्राथमिक शाळा व महाविद्यालयातील अस्पृश्य मुलांना स्पृश्य मुलांसारखीच समानतेची वागणूक द्यावी म्हणून शिक्षण खात्याला आदेश दिला. ३० सप्टेंबर १९१९ रोजी अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा बंद केल्यात. ६ जुलै १९०२ मागास जातींना नोकरीत ५० टक्के जागा राखीव ठेवण्याची घोषणा केली.

२३ पेब्रुवारी १९१८ ला कुलकर्णी वतने बंद, तलाठी सुरू. आंतरजातीय विवाह कायदा १५ एप्रिल १९२० नाशिक येथे उदोजी मराठा विद्यार्थी वसतीगृहाचा कोनशिला समारंभ केला. १९ नोव्हेंबर १९२१ मध्ये रायगड येथे शिवस्मारकाचा पायाभरणी समारंभ प्रिन्स ऑफ वेल्सच्या हस्ते झाला. तसेच सिंधूदुर्ग जिल्ह्य़ातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा जिर्णोद्धार ही केला. १६ फेब्रुवारी १९२२ दिल्लीत भरलेल्या अखिल भारतीय अस्पृश्य परिषदेचे ते अध्यक्ष होते.आजच्या बहुसंख्य मराठा समाजाला हा इतिहास माहित नाही.आमच्या सारख्या आंबेडकरी चळवळीतील लोकांनी सांगितला तर तो त्यांना पचत नाही.ज्या शाहूमहाराजनी मागासवर्गीय समाजाला शैक्षणिक सवलत देऊन स्वाभिमानी बनविले ते आजच्या मराठा समाजाला सहन होत नाही. सातवी ते दहावी नापास असूनही खेड्या पाड्यात ताठ मानेने जगणारा मागासवर्गीय समाज मराठ्यांना डोळ्यात खुपते असे म्हटल्यास चूक ठरणार नाही.अन्यता जिजाऊ च्या जन्म भूमीत आणि मराठा सेवा संघाच्या जन्मभूमी कर्मभूमीत बुलढाण्या जिल्ह्यात रुहीखेड मायबा येथे चर्मकार समाजाच्या महिलेवर नग्न धिंड काढण्याचे धाडस मराठा समाजातील लोकांनी केले नसते. गावगुंडानी म्हटले तर संपूर्ण गांव गुंड होऊ शकत नाही.म्हणून लिहावे लागते कि मराठा समाजाचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज,शाहूमहाराज का होऊ शकला नाही.

आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर यांनी मराठा सेवा संघाच्या मराठा मार्ग मध्ये लिहले होते की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मराठा समाजाचे राजर्षी शाहु महाराज यांनी शिक्षणा साठी खुप मोठी मदत केली. म्हणून बाबासाहेब भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होऊ शकले..हे आंबेडकरी चळवळीच्या लोकांनी विसरु नये.त्याकरिता आंबेडकरी चळवळीतील जाणकार बुद्धिजीवी लोकांनी अज्ञानी अंधश्रद्धा मध्ये गुंतलेल्या मराठा समाजाच्या घरी जाऊन समाज प्रबोधन करावे.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे आम्हाला शाहु महाराज सयाजी महाराज कबीर महात्मा ज्योतिराव फुले आणि तथागत बुद्ध कळाले. मी राजर्षी शाहूमहाराज यांच्या जयंती व स्मृतिदिना निमित्याने दरवर्षी विविध वृत्तपत्रात आजच्या परिस्थितीचे आकलन करून लिहित असतो.म्हणुन आमच्या सारखे लोक नेहमी मराठा समाजा बरोबर मंगल मैत्री करण्याचा प्रयत्न करतात.पण त्याचा अर्थ खेड्या पाड्यातील मराठा समाजातील लोक महार माजले त्यांना जास्त माझ आला असा काढतात. राजर्षी शाहु महाराज यांच्या जयंती निमित्य सर्व मराठा समाजाला नम्र आवहान आहे की प्रथम शाहु महाराज समजून घ्या त्यानंतर आपले खरे शत्रु कोण व खरे मित्र कोण हे समजून येईल.हीच राजर्षी शाहु महाराज जयंती निमित्य सर्व बहुजन समाजाला विशेष मराठा समाजाला विनंती.जयंती निमित्य सर्वाना हार्दिक शुभेच्छा!!!

✒️लेखक:-सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,भांडुप मुंबई,अध्यक्ष सत्यशोधक कामगार संघटना,

Previous articleभूकीचे अर्थशास्त्र
Next articleजेतवन
Purogami Sandesh
पुरोगामी संदेश वेब पोर्टल पर प्रकाशित समग्री पर किसी प्रकार की आपत्ती/शिकायत होने पर purogamisandesh@gmail.com पर पंजीकृत की जायेगी ! संपादक/प्रकाशक के Whats App नंबर अथवा पोर्टल के कॅमेंट बाँक्स मे की गयी सूचना/शिकायत/आपत्ती का निपटारा किया जाए यह आवश्यक नही है ! - प्रकाशक/आपत्ती निवारण अधिकारी