(संत कबीर महाराज जयंती विशेष)

संतशिरोमणी कबीर महाराज हे उत्तर भारतातील एक सुप्रसिद्ध संत म्हणून ओळखले जातात. संतश्रेष्ठ कबीर महाराजांचा जन्म इ.स.११४९ साली झाला, असे काहीजण मानतात. तर कुणी ते १३९९ मध्ये जन्माला आले, असे म्हणतात. एवढा फरक मतमतांतरात जाणवतो. हिंदू पंचांगांनुसार ज्येष्ठ पौर्णिमेला संत कबीर जयंती असते- 

“कबीरा जब मैं आया जग में, जग हँसें हम रोयें
हम ऐसी करनी कर चले, हम हँसे जग रोयें!!”।

त्यानिमित्त हा लेखन प्रपंच! हे महान संत म्हणजे काळाच्या पुढे असलेले संतकवी व समाज सुधारक होते. ते भारतीय भूमीमध्ये जन्म घेतलेल्या श्रेष्ठ संतांपैकी एक गुरु होत. धार्मिक थोतांडावर ते कडक आसूड ओढणारे आणि हजारो ग्रंथांचे पांडित्य खुजे करणारे होते. प्रेमाच्या अडीच अक्षराचा मंत्र सांगणारे पुरोगामी संत म्हणजे कबीरजी!

“पोथी पढ़ पढ़ जग मुआ, पण्डित भया न कोय|
ढाई आख़र प्रेम का, पढ़े सो पण्डित होय||”

त्यांनी तत्कालीन प्रचलित असणाऱ्या धर्मातील अंधश्रद्धा व अनिष्ट प्रथा यावर दोह्यांच्या माध्यमातून टीका केली. त्यांच्या लिखाणामुळे तत्कालीन अनिष्ट प्रथा आणि अंधश्रद्धा पसरवणारे भोंदू बाबा, बुवा व सनातनींचे धाबे दणाणले होते. त्यांनी लिहिलेले बहुतांश दोहे यावर विज्ञानवादी बुद्धधम्माचा पगडा दिसून येतो. ते सत्य, विज्ञान व कर्मसिद्धान्त यांवर लिहीत. क्रांतीकारी लिखाणामुळे ते संपूर्ण जगात प्रसिद्ध झाले. विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना गुरू मानले होते. इतक्या शतकानंतर आजही त्यांनी लिहिलेले दोहे समर्पक वाटतात –

“नहाये धोये क्या हुआ, जो मन मैल न जाए|
मीन सदा जल में रहे, धोये बास न जाए||”

असे हे ‘कबीर के दोहे’ युगानुयुगे विज्ञानवादी शिकवण देऊन सतत जगाला प्रेरणा देत राहतील, असे वाटते.
खेमराज श्रीकृष्णदास यांनी प्रकाशित केलेल्या हस्तलिखित ‘कबीर सागर’ या ग्रंथातील मजकूर- ज्येष्ठ पौर्णिमेस काशीमधील लहरतारा नावाच्या सरोवरात एक प्रखर तेजस्वी प्रकाशामध्ये कबीर साहेब एका कमळाच्या फुलावर प्रकट झाले. हा सर्व प्रसंग तेथे असलेल्या अष्टानंद ऋषींनी पाहिला होता. कर्मधर्म संयोगाने काशीतले एक मुस्लिम जोडपे – निरू व नीमा हे तेथून जात होते. नीमा पाणी पिण्यासाठी त्या सरोवराकडे गेली. तेव्हा तिची नजर त्या तेजस्वी बालकावर पडली आणि ते जोडपे त्या बालकाला आपल्या सोबत घेऊन गेले. त्या मुलाचे नाम ठेवण्यासाठी निरूने मौलवीना बोलवले, तेव्हा ज्या ज्या वेळेस पवित्र कुराण शरीफ उघडून पहिले त्या त्या वेळेस ग्रंथात सर्वत्र फक्त कबीर कबीर नावच वाचण्यास मिळाले. कबीरचा अर्थ होतो ‘सर्वज्ञ – सबसे बडा!’ हे नाव ठेवण्याची मौलवीची मुळीच इच्छा नव्हती. पण इच्छा नसतांनाही त्यांचे नाव कबीरच ठेवण्यात आले. पुढे ते बालक महान कवी व संतश्रेष्ठ कबीरजी या नावाने प्रसिद्ध झाले-

“कबीरा ते नर अँध है, गुरु को कहते और।
हरि रूठे गुरु ठौर है, गुरु रूठे नहीं ठौर॥”

संतकवी कबीरजी जरी मुस्लिम कुटुंबात रहात होते, तरी ते आदिरामाचे उपासक होते. त्यांनी विवाह केलेला नव्हता. कमाल नावाचा मुलगा व कमली नावाची मुलगी ही त्यांची मानलेली मुले होती. ते काशीत विणकर म्हणून काम करत. आयुष्यभर ते काशीमध्येच राहिले. मात्र ते मगहर येथून सशरीर हे मृत्युलोक सोडून निज धामाला गेले –

“कबीर सुता क्या करे, जागी न जपे मुरारी|
एक दिन तू भी सोवेगा, लम्बे पाँव पसारी||”

त्यांचा देहत्याग इ.स.१५९८ साली झाला, असे मानले जाते. भारत सरकारने सन १९५२ साली संतश्रेष्ठ कबीर महाराजांवर पोस्टाचे तिकीट काढले होते.

!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे संत कबीर जयंतीनिमित्त त्यांच्या चरणकमली कोटी कोटी दंडवत प्रणाम !!

✒️संत चरणरज:-‘बापू’- श्रीकृष्णदास निरंकारी.
[मराठी-हिंदी साहित्यिक तथा संत-लोक साहित्याचे गाढे अभ्यासक.]मु. श्रीगुरूदेव प्रार्थना मंदिराजवळ,
रामनगर वॉ. नं.२०, गडचिरोली.ता. जि. गडचिरोली (मोबा. ७७७५०४१०८६).

गडचिरोली, महाराष्ट्र, लेख, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED