राजर्षी शाहू महाराजांचे विचार व कार्य तळागाळातील लोकांपर्यंत पोहोविने आवश्यक- डाॅ. श्रीकृष्ण महाजन

56

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापूर(दि.23जून): आजवर अनेक लेखकांनी शाहू महाराजांवर विपुल प्रमाणात लेखन केले आहे. पण तरिही त्यांचे विचार आणि कार्य तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचले नाहीत. शाहू महाराज प्रत्येक हाताहातावर पोहचायचे असतील तर त्यांचे बहुपैलुत्व आज समजुन घेणे गरजेचे आहे. असे विचार प्रसिद्ध कवी, लेखक डाॅ. श्रीकृष्ण महाजन यांनी व्यक्त केले. ते प्रसिद्ध लेखक डाॅ. गिरीश मोरे लिखित राजर्षी शाहू:विचार व कार्य या ग्रंथाच्या तिसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन समारंभा वेळी बोलत होते.

निर्मिती प्रकाशनाच्या वतीने प्रसिद्ध साहित्यिक डाॅ. गिरीश मोरे यांच्या राजर्षी शाहू: विचार व कार्य या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दि. 23 जून 2021रोजी आदित्य सभागृह येथे पार पडला. कोल्हापूर मधील प्रसिद्ध कवी, लेखक डाॅ. श्रीकृष्ण महाजन यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी बोलताना महाजन म्हणाले, शाहू महाराजांचे विचार आणि कार्य डाॅ. मोरे यांनी अत्यंत वाचनीय पद्धतीने शब्दबद्ध केले आहे. शाहूंना वाचायचे असेल तर वाचकांनी पहिल्यांदा हे पुस्तक वाचायला हवे. शाहू महाराजांचे नाव फक्त व्यासपीठापुरतं न घेता खऱ्या अर्थाने त्यांची वैचारिक भुमिका समाजात रुजवायला हवी.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डाॅ. अविनाश वर्धन म्हणाले, शाहू महाराजांच्या विचारांनी आणि कार्याने तत्कालीन समाज बदलास आश्वासक दिशा मिळाली होती. शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक अशा सर्वच पातळीवर शाहू महाराजांनी केलेला अमुलाग्र बदल हा आजच्या समाजालाही सकारात्मकपणे दिशादर्शक ठरतो आहे. यावेळी बोलताना डाॅ. स्वप्नील बुचडे म्हणाले, बहुजन समाजाच्या विकासासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण बदलासाठी शाहू महाराज नेहमीच प्रयत्नशील राहिले. त्यांच्या प्रत्येक कृतीतून, निर्णायातून जाणवते की ते खऱ्या अर्थाने लोकराजे होते.

यावेळी बोलताना डाॅ. गिरीश मोरे यांनी पुस्तकाबद्दलची एकूण पार्श्वभूमी स्पष्ट केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निर्मिती प्रकाशनचे प्रकाशक अनिल म्हमाने होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार संवाद प्रकाशनाच्या प्रकाशिका प्रा. शोभा चाळके यांनी मानले. यावेळी मंदार पाटील, विजय कोरे, डॉ.राज ताडेराव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.