

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)
मुंबई(दि.२३जून):-ओबीसींच्या प्रश्नांवर चिंतन व मंथन करण्यासाठी शनिवार व रविवार दिनांक २६ आणि २७ जून रोजी ओबीसी चिंतन शिबीर लोणावळयात आयोजित करण्यात आले आहे.
नागरी पुरवठा मंत्री मा. ना. श्री. छगन भुजबळ यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होणार असून मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहे. दोन दिवसीय चालणाऱ्या या शिबिराला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री एकनाथ खडसे, माजी मंत्री बबनराव ढाकणे, माजी आमदार नारायण मुंडे, माजी मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री अण्णा डांगे, मंत्री दत्त्तात्रय भरणे, मंत्री सुनिल केदार, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री संजय राठोड, माजी मंत्री माणिकराव ठाकरे, खा. बाळू धानोरकर , माजी मंत्री परिणय फुके, आमदार विकास ठाकरे, आमदार महेंद्र दळवी, याव्यतिरिक्त विविध राजकीय पक्षातील व वविध ओबीसी चळवळीतील आजी माजी खासदार व संघटनांचे प्रतिनिधी यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
सर्वपक्षीय ओबीसी नेते आणि कार्यकर्ते या शिबिरात सहभागी होणार आहेत. ओबीसी आरक्षणातील अनेक समस्या, ओबीसी व्हीजेएनटीतील जिल्हावार नोकरीतील कमी झालेलं आरक्षण, ओबीसीची स्वतंत्र जनगणना यासह अनेक विषयावर शिबिरात मंथन करण्यात येणार असून शिबिरातील तज्ञ्, मार्गदर्शक, यांच्याकडून संकलित होणाऱ्या माहीतीवर चिंतन होऊन अभ्यासपूर्वक अजेंडा तयार करून ओबीसी आरक्षणाबाबत केंद्र व राज्य शासनास ओबीसींची भूमिका यावेळी सादर केली जाणार आहे. या बैठकीस राज्यातील तज्ञ्, ओबीसी अभ्यासक, संवैधानिक अभ्यासक मार्गदर्शन करणार असून दोन दिवसाच्या सहा सत्रात हे शिबीर संपन्न होणार आहे.
राज्यातील ६ जिल्ह्यातील रदद झालेले राजकीय आरक्षण व लागलेली निवडणूक स्थगित करण्यात यावी यासह १२ बलुतेदार १८ अलुतेदार यांच्या उत्थानासाठी शासनास प्रस्ताव सादर करून लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये विकासनिधी देण्यात यावा, पदोन्नतीमध्ये ओबीसीना आरक्षण देण्यात यावे, तसेच लोकसंख्येच्या प्रमाणात लोकसभा व विधानसभेत प्रतिनिधित्व देण्यात यावं या विषयावर लोणावळ्याच्या चिंतन आणि मंथन शिबिरात चर्चा होणार आहे. यावेळी उपस्थित प्रतिनिधींकडून ज्या सूचना येतील त्यांचा समावेश मागणीपात्रात केला जाईल आणि या शिबिरामध्ये झालेला ठराव हा ओबीसींचा अजेंडा असेल. अशी माहिती ओबीसी, व्हीजेएनटी जनमोर्चा अध्यक्ष बाळासाहेब सानप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी प्रदेशाध्यक्ष मा. ईश्वर बाळबुधे, राष्ट्रीय ओबीसी महासंघ महासचिव सचिन राजूरकर, ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चा राज्य समन्वयक तथा उपाध्यक्ष अरुण खरमाटे, श्री. राजू साळुंके महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बेलदार समाज यांनी दिली.