अत्याचारी रँडच्या वधाचा सुनियोजित कट !

29

[देशभक्त दामोदर चापेकर जयंती विशेष]

दामोदरपंतांना लहानपणापासूनच व्यायामाची आवड होती. समवयस्क मित्रमंडळींना संघटीत करून त्यांनी एक व्यायामशाळा सुरू केली होती. इंग्रजांच्या अत्याचाराची दामोदरपंतांना मनस्वी चीड होती. त्यांचे लहान भाऊ बाळकृष्ण हरिभाऊ चापेकर व वासुदेव हरिभाऊ चापेकर दोघेही त्यांच्या प्रत्येक कार्यात सहभाग घेत असत. दामोदर चापेकर यांचा जन्म हरिभाऊ चापेकर या एका कीर्तनकारांच्या घरी दि.२५ जून १८६९ रोजी झाला. दामोदरवर लहानपणापासूनच टिळकांच्या विचारांचा पगडा होता. अवघ्या वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी पुण्यातील गणेशखिंडीत त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी रँड आणि आयर्स्टचा वध केला. इंग्रजांनी दामोदरपंतांना पुण्यातील येरवडा तुरूंगात फाशी दिली.

चाफेकर बंधू : दामोदर, बाळकृष्ण व वासुदेव सख्खे भाऊ होत. त्यांना चापेकर बंधू म्हणून ओळखले जाते. ते भारतीय क्रांतिकारकांमध्ये गणले जातात. त्यांचा जन्म कोकणात एका चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांनी मराठी भाषेमधून शिक्षण घेतले. कालांतराने ते पुण्यातील चिंचवड येथे स्थायिक झाले. वडील ‍हरिपंत चापेकर हे पुणे व मुंबई येथे हरिकथा सांगत. बालवयात तिघेही भाऊ हरि कीर्तनात वडिलांना मदत करत असत. त्यांमुळे त्यांच्या शिक्षणात खंड पडला. वासुदेव त्यांनी राजकारणात आणि क्रांतिकारी कारवायांमध्ये भाग घेतला. त्यांनी भारतीय तरुणांना गोळा करून शस्त्रांचे प्रशिक्षण दिले. पुण्यातील राजकीय घडामोडींनी प्रेरित होऊन हे भाऊ क्रांतिकारक चळवळीकडे वळले. ब्रिटिशांनी आणलेल्या संमती वयाच्या विधेयकास त्यांचा तीव्र विरोध होता. भारतीय संस्कृतीत हस्तक्षेप करणार्‍या ब्रिटिशांविरुद्ध टिळकांनी केसरीमधून घणाघाती प्रहार करायला सुरुवात केली होती.

या आवाहनाने तीनही भाऊ प्रेरित झाले. त्यांनी लोकसंघटन केले. याचवेळी पुण्यात प्लेगच्या साथीने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केल्याने ब्रिटिशांनी वॉल्टर चार्ल्स रँडला भारतात पाचारण केले. रँडने रोगनिवारण करण्याच्या उपायांची सक्तीने अंमलबजावणी सुरू केली. हे करताना त्याने सामाजिक पायदंड पायदळी तुडवून लोकांचा असंतोष ओढवून घेतला. यामुळे चापेकर बंधूच्या मनात ब्रिटिशाविरुद्ध तिरस्कार निर्माण झाला. या सार्‍यांचा सूड घेण्याची योजना त्यांनी तयार केली. पुण्यातील लोकांना दिलेल्या वाईट वागणुकीबद्दल या भावांनी त्याच्या वधाचा कट रचला. त्यावेळी व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाचा हीरक महोत्सव साजरा करण्यात येत होता. सगळीकडे रोषणाई करण्यात आली होती. तसेच मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते.

रँडचा वध : पुण्यामध्ये इ.स.१८९७ मध्ये प्लेगची साथ आली. प्लेगपीडित रूग्णांना शोधून उपचार करण्याच्या नावावर इंग्रजांनी पुण्यातील घराघरात शोध मोहीम उघडली. परंतु अत्याचाराचा हैदोस घातला. इंग्रजांविरूद्धात असंतोष पसरू लागला. रँड हा अत्यंत क्रुर आणि खुनशी इंग्रज अधिकारी होता. तो पुण्याच्या नागरिकांवर अत्याचार करण्यात अग्रेसर होता. चापेकर या तरुणाने गाडी काढली व गणेशखिंड येथे वाट पाहत दि.२२ जून १८९७ रोजी मध्यरात्री निवासस्थानातून बाहेर पडलेल्या रँडवर जवळून गोळ्या झाडल्या. रँड हा दहा दिवस कोमात राहिला व अकराव्या दिवशी मरण पावला. याचवेळेस बाळकृष्णाने रँडसोबत बसलेल्या लेफ्टनंट आयर्स्टवर गोळ्या झाडल्या. त्यामुळे ब्रिटिश सरकार हादरून गेले.

अटक व फाशी : कित्येक दिवस ब्रिटिशांना मारेकऱ्यांचा शोध लागत नव्हता. शेवटी पंचमस्तंभी गणेश व रामचंद्र या द्रविड बंधूनी कटाची बातमी केवळ २०,०००रु.च्या आर्थिक लाभापोटी सरकारला दिली. त्यामुळे वासुदेव चापेकर व महादेव रानडे यांनी चिडून द्रविड बंधूंनाही ठार केले. महादेव रानडेसह तिघाही भावांना पकडण्यात आले व पुण्यातील येरवडा तुरूंगात डांबण्यात आले. दामोदराला मुंबईत अटक झाली व दि.१८ एप्रिल १८९८ रोजी त्यांना येरवडा तुरुंगातच फासावर चढवण्यात आले. त्यापाठोपाठच चापेकर बंधू व सर्व सहकारी क्रांतिवीरांना मे १८९९ मध्ये फासांवर लटकविण्यात आले. अशाप्रकारे देशासाठी ते तीनही चापेकर बंधू शहीद झाले.

आत्मवृत्त : पुणे येथील येरवडा तुरुंगात असताना त्यांनी आपला जीवन प्रवास आणि क्रांतीकार्याचे तपशील नमूद केले. ते १०० पानी आत्मवृत्त मोडीत लिपीतून लिहून काढले. वि.गो.खोबरेकर यांनी ते संपादित करून मराठीत आणले. इ.स.१९७४ साली ते राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई या संस्थेने प्रकाशित केले.

!! अशा या देशभक्त क्रांतिकारकास पुरोगामी संदेश परिवारातर्फे त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !!

✒️लेखक:-श्री कृष्णकुमार आनंदी गोविंदा निकोडे गुरुजी.मु. पिसेवडधा, पो. देलनवाडी.तह. आरमोरी, जि. गडचिरोली.व्हा. नं. ७४१४९८३३३९.