शाहू महाराज’! एक आदर्श राजे !

40

आज तमाम बहुजनांचे माणूस म्हणून जे अस्तित्व आहे ते केवळ आणि केवळ भारतीय संविधान मुळेच आहे. विविध धर्म,जाती, पंथ,भाषा, संस्कृती, रुढी,परंपरा यांचा समान सन्मान राखून संपूर्ण जगात आदर्शवत अशा संविधानची निर्मिती केली विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी !*जनतेला संविधानच्या माध्यमातून जगण्याची सनद दिलेले बाबासाहेब म्हणजे प्रजेच्या प्रती लक्ष आणि दक्ष असलेले राजे म्हटले तर वावगे ठरणार नाही.*बाबासाहेबांना संविधानचे राजे बनायची ताकद कुणी दिली असेल तर ते होते थोर समाजसुधारक राजर्षि छत्रपती शाहू महाराज.

शाहू महाराजांना रयतेचे राजे तर सगळेच म्हणतात.पुढे जाऊन त्यांना राजाचे राजे म्हणणे हे देखील अधिक संयुक्तिक ठरेल.*
*महाराजांच्या अंतःकरणात जनतेबद्दल विशेषतः वंचितांविषयी अत्यंत जिव्हाळा होता आपली रयत सुजान व्हावी, सुखी व्हावी, जातीपातीच्या कारणांनी निर्माण झालेली असमानता नाहीशी व्हावी.समाज गतिमान व्हावा. प्रगत व्हावा म्हणून त्यांनी जीवनभर प्रयत्न केले.महात्मा फुलेंचा शैक्षणिक वारसा त्यांनी निरंतर पुढे चालवला.छत्रपती शिवरायांचे ते एकमेव राजकीय, सामाजिक आणि फुलेंच्या नंतर आताच्या काळातील शैक्षणिक क्रांतीचे वारस आहेत.त्यांनी शाळा,उत्सव,रुग्णालय कचेऱ्या,राजवाडा,पाण्याचे तलाव राजाची पंगत ही सर्व हरिजन गिरिजनांसाठी खुली केली.सर्वांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण, मागासवर्गीय जातींना पन्नास टक्के आरक्षण या योजना राबवण्याचे धैर्य महाराजांनीच दाखवले.असे दुर्मिळ दृश्य त्याकाळात महाराष्ट्राशिवाय इतर कुठेही दिसले नाही.म्हणून तर महाराजांना ‘आरक्षणाचे जनक’ म्हटले जाते.

छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षणाला जितके महत्व दिले तेवढेच महत्व सांस्कृतिक क्षेत्रालाही देत करवीर संस्थानचे ‘कलानगरी’ मध्ये रूपांतर केले रंगभूमीवरचे अण्णासाहेब किर्लोस्कर, कल्याणकर, कोल्हटकर, जोशी, भोसले, शांताराम, बाबुराव पेंटर, बाबुराव पेंढारकर यांच्या सह अनेकांना त्यांनी राजाश्रय दिला. नाट्यकला वाढवली चित्रकार क्षेत्रांमध्ये आबालाल रहमान, माधवराव बागल, आनंदराव पेंटर यांनाही शास्त्रशुद्ध शिक्षणासाठी काही कमी पडू दिले नाही. गायनक्षेत्रातील साहेब जान सकवारबाई आनंद मेस्त्री, तबलजी दादा लाड, बळवंतराव रुकडीकर, गोविंदराव टेंबे, शाहीर हैदर यांच्या यशाचे श्रेय ही महाराजांनाच द्यावे लागेल.महाराज स्वतः एक उत्तम कुस्तीगीर होते.त्यामुळे मल्लांना अनेक तालमी काढून देऊन त्यांनी अनेक पैलवानांना नावारूपाला आणले.कुस्ती मैदानं बांधली. नाट्यगृह ‘पॅलेस थिएटर’ बांधलं. कागलकर पॉवर हाउस ही देखील शाहू महाराजांची देन आहे.

आज सार्‍या देशभर महाराष्ट्राचे पुरोगामीत्व सांगताना शाहू महाराजांशिवाय ते पूर्ण होणे शक्यच होणार नाही.कारण महात्मा फुलेंच्या नंतर छत्रपती शाहू महाराजांनीच तो सामाजिक क्रांतीचा ध्वज उंच उंच नेला. म्हणून तर फुले-शाहू- आंबेडकर ही शृंखला पुरोगामित्वाची एक संहिता बनलेली आहे.शिडी चढून यशाच्या शिखरावर गेल्यावर त्या शिडीला विसरणारे किंबहुना त्या शिडीलाच लाथाडणारे आज पदोपदी दिसतील. भेटतीलही. परंतु पृथ्वीतलावर मदतीची जाण ठेवणारा एकमेव मानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होत. म्हणून तर बाबासाहेब हे “महामानव”, “विश्वभूषण” ठरतात.बाबासाहेब आंबेडकर* *”Baristor” झाल्यावर त्यांना स्वतःला झाला नसेल तेवढा आनंद छत्रपती शाहू महाराजांना झाला होता.बाबासाहेबांचे अभिनंदन करायला स्वतः महाराज वेळात वेळ काढून मुंबईतील डबक चाळीत त्यांना भेटायला जातात तेव्हां बाहेर उभे असलेल्या बाबासाहेबांच्या सहकाऱ्याला निरोप देतात की, जा आणि बाबासाहेबांना सांग की मी भेटायला आलोय.

साक्षात राजे डबकी चाळीत आले आहेत ही गोष्टच सर्वांना चकित करणारी असते.* *बाबासाहेबांच्या त्या सहका-याचा आपल्या स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही.क्षणभर तो गोंधळून जातो.त्याला काय करावे हेच सुचत नाही.*
*तेवढ्यात बाबासाहेब आतल्या खोलीतून बाहेरच्या खोलीत येतात,आणि बघतात तर काय साक्षात शाहू महाराज त्यांना भेटायला त्यांच्या घरी आले आहेत.एक थोर राजा डबकी चाळीत त्यांना भेटायला स्वतः त्यांच्या घरी आले याचे बाबासाहेबांना नवल वाटते.बाबासाहेबांच्या तोंडातून नकळत शब्द बाहेर पडतात.’हे काय ? आपण राजे आहात. छत्रपती आहात.आपण हुकूम केला असता तर मीच आपल्या भेटीला कोल्हापूरला आलो असतो.आपण येण्याची तसदी का घेतली राजे ?*शाहू महाराजही आपल्या बुलंद आवाजात तेवढ्याच मोठ्या ताकदीने म्हणतात,

*’अहो आम्ही कसले राजे ? आम्ही तर परंपरेचे राजे. परंपरेचे राजे तर कुणालाही होता येतं. पण आपण ‘ज्ञानराजे’ आहात. ज्ञानाचे राजे कष्टाविना कुणालाही होता येत नाही. तुम्ही “Baristor” झाला आहात म्हणून तुमची हत्तीच्या रथातून मिरवणूक काढणार आहोत.तुम्ही कोल्हापूरला यावे या निमंत्रणासाठी आम्ही आलो आहोत.बाबासाहेब आणि तिथं उपस्थित असलेल्या सर्वांना अगदी भरभरून आलं.*
*बाबासाहेब कोल्हापुरला आल्यानंतर तिथे एक अभूतपूर्व असा इतिहास घडला. एक राजा एक अस्पृश्य “बॅरिस्टर” झाला म्हणून हत्ती च्या रथातून त्याची मिरवणूक काढतो.हे दुर्लभ दृश्य सर्वांनी पाहिले. त्यांचा अशा या सन्मानाची,एक राजा एका अस्पृश्य बुद्धीवंताचा सन्मान करतो म्हणून या घटनेची एक अलौकिक घटना अशी इतिहासात नोंद झाली आहे*कोल्हापूरात भव्यदिव्य सत्कार सोहळा संपन्न झाल्यानंतर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आपले कोल्हापूर येथील वास्तव्य संपवून मुंबईत परत जातेवेळी राजर्षी शाहू महाराजांनी खास आयोजित केलेल्या एका खास समारंभास बाबासाहेबांना आमंत्रित केले गेले. महाराजांच्या समवेत त्यांचे शाही भोजन झाल्यानंतर. रीतिरिवाजानुसार राजर्षी शाहू महाराज डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचा जरीपटक्याचा आहेर करून त्यांना भावी वाटचालीसाठी सुयश चिंतितात.

राजर्षींच्या या प्रेमळ सत्कारामुळे बाबासाहेबांचे अंत:करण गहिवरून येते.ते महाराजांचे आभार मानतात. भरजरी बादली फेटा बांधलेल्या डाॅ.बाबासाहेबांना बरोबर घेऊन शाहू महाराजांची स्वारी घोड्याच्या रथातून शहरातून फेरफटका मारण्यास जेव्हा बाहेर पडली, तेंव्हा जनतेने टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले. ठिकठिकाणी राजर्षी शाहू महाराजांच्या नावाचा जयघोष होत होता महाराज आणि बाबासाहेबांवर पुष्पवृष्टी केली जात होती. ही घटना महाराष्ट्राच्या तत्कालीन सामाजिक जीवनातील एका अत्यंत रोमांचकारी व ऐतिहासिक घटना म्हणून नमूद करावी लागेल.*
*राजा म्हणून त्यांनी शंभर वर्षापूर्वी दाखवलेले धैर्य, धडाडी, तडफ असामान्यच म्हणावे लागेल.*
*डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना कोल्हापूर हे आपल्यासाठी स्फूर्तिस्थान वाटायचे ते यामुळेच.तसे त्यांनी अनेक प्रसंगी बोलूनही दाखविले आहे. कोल्हापूरच्या या ऐतिहासिक भेटीत महाराजांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांबरोबर सामाजिक विषयांवर प्रदीर्घ चर्चा करून दोघांनी काही तर्कशुद्ध आराखडे आखले आणि त्यांची अंमलबजावणी पुढील काळात महाराजांनी केली आणि त्यायोगे बाबासाहेबांनी संविधानात ही त्यांचा समावेश केला.

परंतु सत्ता ही जनहितार्थ राबवायची असते” हा छत्रपती शाहूंच्या जीवन संदेशाचा विसर आजच्या सर्वच पक्षाच्या राज्यकर्त्यांना पडल्यामुळे आज सर्व सामान्य जनतेला आभाळ फाटल्यागत झाले आहे.*
*कोल्हापुरातील हा ऐतिहासिक सोहळा संपन्न झाल्यानंतर सर्वांचा निरोप घेतेवेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ‘छत्रपतींनी मोठ्या मनाने आणि विश्वासाने त्यांच्या मस्तकावर चढविलेल्या मानाच्या जरीपटकाचा सदैव मान राखण्याबरोबरच महाराजांचा त्यांच्यावरील विश्वास ढळेल असे कधीही वागणार नाही’ याची ग्वाही दिली.*
*त्यानंतर एकदा सर्व कार्यकर्ते मिळून डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा वाढदिवस साजरा करण्याचे योजून त्यांना भेटायला गेले असता बाबासाहेब त्यांना म्हणाले होते, तुम्हा बहुजनांना वाढदिवसच साजरा करायचा असेल तर माझा नव्हे तर,आपले भाग्यविधाते, आपले राजे छत्रपती राजर्षि शाहू महाराजांचा वाढदिवस ‘सण उत्सवा’सारखा साजरा करा.*
*आणि माणगाव परिषदेनंतर छ.शाहू महाराजांनी ही तमाम बहुजनांना आवाहन केले.नव्हे, उपदेशच केला की तुम्हाला आंबेडकरांच्या रूपात तुमचा उद्दारकर्ता, तुमचा मुक्तीदाता मिळाला आहे.त्यांच्या मार्गदर्शनानुसार चाला, वागा त्यातच तुमचे कल्याण आहे.*
*जगात एकमेकांविषयी एवढ्या प्रांजळपणाने मत व्यक्त करण्याचे हे एकमेव उदाहरण आहे.*
*असे थोर समाजसुधारक,*

*गरिबांचे,वंचितांचे,कष्टकरी,शोषितांचे ,जनतेचे लोकराजे*
*आमचे आदर्श राजर्षि छत्रपती शाहू महाराजांची आज जयंती.*
*अशा ह्या सामाजिक क्रांतीच्या अग्रदूताला त्यांच्या जयंतीनिमित्त समस्त बहुजनांच्या वतीने मानाचा
मुजरा*

 

✒️लेखक:-विठ्ठलराव वठारे(अध्यक्ष भारतीय जन लेखक संघ,महाराष्ट्र)