चिमूर येथे संविधान परिसरात संविधानाचा जागर

27

🔸विविध सामाजिक संघटनांची संविधान जनजागृती मोहिम

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.25जून):-लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, समता, वैज्ञानिक दृष्टिकोन, विश्वबंधूता,भारतीय संवैधानिक मूल्यांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी विविध सामाजिक संघटनांतर्फे संविधान जागृती कार्यक्रम घेण्यात आला. संविधान जनजागृती करण्यासाठी तसेच संवैधानिक मूल्ये लोकांपर्यंत पोहचावी या दृष्टिकोनातून समविचारी संघटनांनी संविधान जागर कार्यक्रम हाती घेतला आहे.

हा कार्यक्रम देशभरात संविधान पार्क, संविधान कट्टा, संविधान चौक, संविधान घर, संविधान मैदान, संविधान पार, संविधान घाट, संविधान हाट या नावाने समविचारी संघटना आयोजित करित आहेत.ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, एक गाव एक पाणवठा चळवळीचे अध्वर्यू बाबा आढाव यांचे संकल्पनेतून साकार झालेल्या तसेच आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषातज्ञ पद्मश्री डॉ. गणेश देवी यांचे पुढाकाराने होत असलेल्या या उपक्रमाचे आयोजन चिमूर येथील डॉ.आंबेडकर स्मारक समिती सभामंडपात करण्यात आले.

येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकात झालेल्या संविधान जागर कार्यक्रमात प्रामुख्याने विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. केंद्रप्रमुख नरेश पिल्लेवान यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले. सामाजिक कार्यकर्ते रामदास कामडी यांनी संविधान निर्मितीमागील प्रक्रियेवर विवेचन केले. कवी प्रकाश कोडापे यांनी गीत सादर केले. उपक्रमशिल शिक्षक बंडू नन्नावरे यांनी साने गुरुजींची बलसागर भारत होवो ही प्रार्थना गायली.

भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रेरणास्थानी ठेवून साने गुरुजींनी सामाजिक, शैक्षणिक कार्य केले. विद्यार्थ्यांसाठी निकोप भावनेने शेवटपर्यंत काम करित राहिले. तोच कार्याचा वसा आपण घेतला पाहिजे.संविधान जागर कार्यक्रमातून वंचित घटक, अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करु असे प्रतिपादन सुरेश डांगे यांनी केले.

कार्यक्रमाला राष्ट्र सेवा दल राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सुरेश डांगे, ओबीसी महासंघाचे रामदास कामडी, झाडीबोली साहित्य मंडळ चिमूरचे सचिव प्रकाश कोडापे, शिक्षक भारतीचे रविंद्र उरकुडे, प्रभारी केंद्रप्रमुख नरेश पिल्लेवान, माजी सरपंच व कवी प्रकाश मेश्राम, चंद्रशेखर नन्नावरे, डाकेश्वर कामडी, सामाजिक कार्यकर्ते मनोज राऊत, भाग्यवान नंदेश्वर, आकाश रामटेके, अशोक विभूते आदी उपस्थित होते.
दर शुक्रवारला हा कार्यक्रम घेण्यात येणार असून वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी यात सहभागी होणार आहेत.