जगात आजवर अनेक क्रूरकर्मा हुकूमशहा होऊन गेले त्यात हिटलर, इदी अमीन हे आजवरचे सर्वात क्रूर हुकूमशहा म्हणून ओळ्खले जातात. जर्मनीच्या हिटलरने लाखो ज्यू धर्मीय नागरिकांना गॅस चेंबरमध्ये कोंडून मारले. युगंडाचा इदी अमीन हा तर फक्त नावालाच मानव होता कारण त्याचे वर्तन राक्षसाला लाजवेल असे होते. इदी अमीन हा नरभक्षक होता. तो नागरिकांची हत्या करुन त्यांचे मांस भक्षण करीत असे. युगंडामध्ये राहणाऱ्या परदेशी नागरिकांचे त्याने अनेक हत्याकांड केली. युगंडामध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी त्याच्या भीतीने जमीन, संपत्ती सोडून युगंडामधून पलायन केले होते. या क्रूरकर्मा हुकूमशहांच्या यादीत आता उत्तर कोरियाचा क्रूरकर्मा हुकूमशहा किम जोंग याचेही नाव घ्यावे लागेल. उत्तर कोरियाच्या या सनकी आणि क्रूर हुकूमशहाने जनतेला भयभीत करण्यासाठी त्यांच्यावर अनेक अत्याचार केले. त्याच्या अत्याचाराच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. किंग जोंग याने नुकतेच 10 नागरिकांना भर चौकात गोळ्या मारून ठार केले.

त्यांचा गुन्हा इतकाच की त्यांनी मोबाईलद्वारे इतर देशातील लोकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. उत्तर कोरियातील नागरिकांना परदेशातील नागरिकांशी संपर्क ठेवण्यास बंदी आहे. उत्तर कोरियातील गुप्तचर यंत्रणा प्रत्येक नागरिकांवर लक्ष ठेवून असतात. प्रत्येकाचे कॉल डिटेल्स तपासली जातात. ज्यांचे वर्तन संशयास्पद असेल त्यांना थेट यमसदनी पाठवले जाते. याआधीही त्याने असेच अनेक लोकांना गोळ्या घालून ठार केले होते. काही महिन्यापूर्वी त्याने कोरोना बाधित लोकांनाही गोळ्या झाडून ठार केले होते. उत्तर कोरियाला कोरोनामुक्त करण्यासाठी कोरोना बाधितांना थेट गोळ्या घालण्याचे आदेश त्याने दिले होते. उत्तर कोरियाला कोरोनामुक्त ठेवण्यासाठी किम जोंगने मागील दीड वर्षांपासून आपल्या आंतरराष्ट्रीय सीमा बंद ठेवल्या आहेत. खाद्यपदार्थ, इंधन आदी जीवनावश्यक वस्तूंसाठी उत्तर कोरिया चीनवर अवलंबून आहे. पण आंतरराष्ट्रीय सीमा बंद असल्याने चीनमधून होणारा जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा ठप्प झाला आहे परिणामी उत्तर कोरियात जीवनावश्यक वस्तूंचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे.

यामुळे या वस्तूंच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीप्रमाणे चहापत्तीचे पाकीट ५ हजार १९० रुपयांना, कॉफीचे पाकीट ७ हजार ४१४ रुपयांना विकले जात आहे. उत्तर कोरियात सध्या मागणीच्या प्रमाणात ८ लाख ६० हजार टन अन्नाची टंचाई भासत आहे. अन्न टंचाईमुळे या देशातील महागाई गगनाला भिडली आहे. प्रचंड महागाईने जनता त्रस्त असताना क्रूरकर्मा हुकूमशहा किम जोंग महागाई कमी करून जनतेला दिलासा देण्याऐवजी लोकांना गोळ्या घालण्यात मग्न आहे. देशातील नागरिक उपासमारीने मरत असताना किम जोंग मिसाईल आणि अण्वस्त्र तयार करण्यावर मोठा खर्च करत आहे. या देशातील बहुतांश साधनसामग्री यावरच खर्च होते. केवळ मिसाईल आणि अण्वस्त्रांचा वापर करून आपण जगावर सत्ता गाजवू शकत नाही तर, जनतेच्या हिताची कामे करुनच आपण जनमानसावर सत्ता गाजवू शकतो हे या हुकूमशहाला केंव्हा समजणार ?

✒️लेखक:-श्याम बसप्पा ठाणेदार(दौंड जिल्हा पुणे)मो:-९२२५४६२९५

पुणे, महाराष्ट्र, लेख, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED