आयुष्यावर बोलु काही….

22

साडे तीन अक्षरांनी जोडल्या गेलेला शब्द म्हणजे “आयुष्य” किती सुंदर शब्द आहे ना ? हो आहेच. परंतू हे ही निश्चितच की आयुष्य म्हणजे एक प्रकारच निसर्गाने रचलेला एक रंगमंच आहे. या रंग मंचावर विविध प्रकारे आपल्याला भुमिका कराव्या लागतात , कधी नट व्हावे लागते तर कधी विदूषक. या आयुष्याच्या रंगमंचार कित्येक प्रकारच्या भुमिका आपल्याला जगत असतांना कराव्या लागतात. तर कित्येक संकटे पेलावी लागतात. काही लोक या संकटांना ढासळून जातात आणि काही जिद्दीने ,चिकाटीने पार करतात. आयुष्यात एक गोष्ट तुम्हाला माहीत आहे का ? नक्कीच माहीत असेल ती गोष्ट म्हणजे प्रत्येकाला जेवढे आयुष्य म्हणजे जीवन लाभलेलं आहे त्या आयुष्यात सुख आणि दु:ख हे असतेच. आता सुख आणि दु:ख नसेलच तर ते आयुष्य तरी कसे असणार? ब्लॉक & व्हाईट टीव्ही सारखे हो ना… ? त्या आयुष्यात रंगचं नसतील तर ते बेरंगी आयुष्य असते.

प्रत्येकाचे आयुष्य हे वेगवेगळे जरी असले तरी समस्या प्रत्येकाच्या आयुष्यात आहेतच. प्रत्येक समस्येच्या मागे “दु:ख” दडलेलं आहेच परंतू आपण काय करतो? आपण त्या दु:खाला कसे दुर करता येईल या प्रश्नाच्या मागे धावतो म्हणजेच “सुखाच्या मागे धावतो” आणि त्याचं धावपळीत आपण आयुष्याचा आनंद घ्यायला विसरून जातो. “दु:ख” तर आयुष्यात आपली परीक्षा घेण्यासाठी येत असते. आणि आलेल्या “दु:खाचे रुप” आपल्याला ओळखता यायला हवे. जर आपण “दु:खाला” आपला मित्र म्हणून स्विकार करु तेव्हा सुखाची कसली आशा देखील आपल्याला राहणार नाही. सुख हे फक्त डोळ्यावर ठेवलेल्या पट्टी प्रमाणे आहे , उदा: “एखादी (वेश्या) आहे जी आज आपल्याकडे तर उद्या दुसऱ्याकडे असेल!” पण “दु:ख” बायको सारखं आपली साथ कधीच सोडत नाही , नेहमी आपल्यासोबत प्रवास करत असते. त्या दु:खाची अनेक रुपे आहेत. कधी बायकोचे रूप , कधी मुलांचे रुप , आई – बापांचे रूप , नातलगांचे रूप , सासु सासऱ्यांचे , आजाराचे रूप , अर्थ रुप… असे अनेक रुपातुन “दु:ख” आपल्या नेहमी सोबत असते फक्त आपण त्याला ओळखत नाही. नेहमी त्याला दुर करण्याचा प्रयत्न करत असतो. कधी तरी एकांतात आपण विचार केला का ? जर आपण “दु:खाला” जवळ केले तर आपल्याला सुखाची गरजचं भासणार नाही.

पण् आपण कधी विचारच करत नाही. त्यामुळे आपण आयुष्य जगायलाच विसरून जातो. आपण जे आहे त्यात आपण आनंदी का राहू शकत नाही? का आपल्याला जे मिळाले त्या पेक्षा दुप्पट हवे असते ? स्वार्थ कशासाठी ? कुठे घेऊन जाणार आहोत आपण ? हे सर्व गोष्टी सोडल्या तर आपले आयुष्य अतिशय सुंदर आहे. पण केव्हा, जेव्हा आपण आयुष्यातील आलेल्या “दु:खाला” जवळ करु तेव्हाचं सर्व काही शक्य आहे. म्हणतात प्रत्येक गोष्ट घडण्याची ही एक ठरावीक वेळ असते. पण त्या वेळेची आज काल कोणी वाट पाहत नाही , आलेल्या संकटावर मात करायचे सोडून आपण फक्त आणि फक्त आपल्या सुखाच्या शोधात फिरत असतो. आणि मिळालेलं आयुष्य दिवसेंदिवस दवडत असतो. झोपेत पडलेली स्वप्न कधीच खरी होत नाहीत तर ती फक्त स्वप्न पाहायची असतात , त्याचं प्रमाणे आपल्याला सुख आणि दु:ख दिसत नसतात तर ती फक्त अनुभवायची असतात.

आयुष्याचा एक नियम आहे , तुम्ही दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद जेव्हा निर्माण करता तेव्हा तुम्हाला आयुष्यातला खरा आनंद काय असतो हे कळते. प्रत्येकाला मिळालेलं आयुष्य खुप अनमोल आहे , फक्त जे आयुष्य आपल्याला मिळाले त्या आयुष्यात स्वच्छंदी जगता आले पाहिजे. भले मग ते आयुष्य एका ठिकाणी बसून का असेना!
“विचार बदला , आयुष्य बदलेल!”

✒️लेेखक:-विशाल पाटील(वेरुळकर)मो:-९३०७८२९५४२