जालना मधील घनसांगवीमध्ये 11 शासकीय निवासस्थानांच्या 275.42 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता

23

✒️अतुल उनवणे(विशेष प्रतिनिधी)

मुंबई(दि.2जुलै):- जालना जिल्ह्यातील मौजे घनसांगवी येथे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी 11 निवासस्थानांचे बांधकाम करण्यासाठी 275.42 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

घनसांगवी येथे शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी टाईप 1 ते 4 चे एकूण 11 निवासस्थांनाच्या बांधकामासाठी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मागणी केली होती. त्यांच्या मागणीनुसार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी या निवासस्थानांच्या बांधकामासाठी प्रशासकीय मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता या निवासस्थानांचे बांधकाम सुरू होण्यास चालना मिळणार आहे.

अंबड येथे 8 शासकीय निवासस्थाने व एका विश्रामगृहाच्या बांधकामास प्रशासकीय मंजुरी

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात चार सूटचे शासकीय विश्रामगृह बांधण्यास तसेच टाईप 1 व 2 प्रकारची 8 शासकीय निवासस्थानांच्या बांधकामास सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी प्रशासकीय मंजुरी दिली आहे. या दोन्ही प्रस्तावांच्या एकूण 376.66 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली आहे.

आरोग्य मंत्री तथा जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या विनंतीनुसार, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण यांनी हा प्रस्ताव मंजूर केला आहे. यामध्ये अंबड येथे चार सूटचे नवीन शासकीय विश्रामगृह इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. या बांधकामासाठी 192.33 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. तसेच शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी टाईप 1 व 2 प्रकारच्या आठ निवासस्थानांच्या बांधकामासाठी 184.33 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास ही यावेळी मंजुरी देण्यात आली आहे. अंबडमध्ये सुसज्ज व परिपूर्ण असे विश्रामगृह व शासकीय अधिकाऱ्यांसाठी निवासस्थानांचे बांधकाम तातडीने सुरू करण्याच्या सूचना श्री. चव्हाण यांनी यावेळी दिल्या.