धनगर समाजाला अनुसूचित जमातीसमुहात आरक्षण देण्याची मागणी

25

🔹आ.समिर कुणावार यांनी मुंबई अधिवेशनात मुद्दा उपस्थित करण्यासाठी दिले निवेदन

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.३जुलै):-दि.५ जुलैपासून मुंबई येथे सुरु होणाऱ्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनामध्ये धनगर समाजाचा आरक्षणसंबंधी प्रश्न सभागृहात उपस्थित करावा या मागणीसाठी धनगर ऐक्य परिषदेच्यावतीने हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे आमदार समिर कुणावार यांना निवेदन देण्यात आले.धनगर समाज गेली ७० वर्षे आपली मागणी सरकार दरबारी मांडत आहे. परंतु सरकार त्यांच्या मागणीकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत आहे. मात्र हिंगणघाट-समुद्रपुर मतदार संघातील धनगर समाज बांधवानी सरकारने जरी धनगर समाजांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केले असले तरीही आ.कुणावार यांनी लोकप्रतिनिधी म्हणून धनगर समाजाच्या मागण्या अधिवेशनात उपस्थित कराव्यात अशी विनंती धनगर समाज ऐक्य परिषदेच्यावतीने आमदार कुणावार यांना केली आहे.

सदर निवेदनावरती समन्वयक म्हणून गणेश उगे यांची स्वाक्षरी असून धनगर समाजाला एस.टी. आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचा प्रश्न सभागृहात उपस्थित करावा.आदिवासी समाजाप्रमाणे धनगर समाजाला सर्व सोईसवलती, योजना व मागील १ हजार कोटी व चालु आर्थिक वर्षाचे १ हजार कोटी असे एकूण २ हजार कोटी धनगर समाजासाठी त्वरीत उपलब्ध करुन घ्यावेत.तसेच आमदार कुणावार यांचे निधीतुन किंव सहकार्यातुन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर किंवा राजे यशवंतराव होळकर यांचे भव्य स्मारक तालुक्यामध्ये उभे करण्यात यावे,अशा मागण्याचे निवेदन देण्यात आले.

सदर मागण्याची आमदार कुणावार यांनी दखल घेतली असून धनगर समाजाला अनुसूचित जमाती या गटात आरक्षण देण्यासंबंधी मुद्दा अधिवेशनात उपस्थित करण्याचे मान्य करीत इतर मागण्यासाठीसुद्धा प्रयत्न करण्याचे मान्य केले आहे.
सदर निवेदनावरती यादवराव तुराळे,वासुदेव पडवे,रमेश घोडे,कवडू शेळके,प्रविण घुरडे,अरविंद मुंगले इत्यादीच्या सह्या आहेत.