वाघाने वासराला जीवे मारण्याच्या घटनेमुळे परिसरात दहशत

24

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.६जुलै):-नजीकच्या सातेफळ येथे
वाघाने एका शेतकऱ्याचे वासराला जीवे मारण्याच्या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली असून या परिसरात वाघाचे अस्तित्व असल्याच्या वार्तेने शेतकरी तसेच शेतमजूर शिवारातील शेतात जाण्यासाठी घाबरत असल्याचे दिसुन येत आहे.सदर प्रकरणी वनविभागाची चमु सातेफळ शिवारात पोचली असून डीएफओ खेडकर यांनी घटनास्थळी भेट दिली.
सातेफळ येथील शेतकरी वंसतराव घवघवे याच्या शेतात आज एक वासरू मृतावस्थेत आढळले,शेतकरी घवघवे यांचे गावाजवळच असलेल्या शेतातच निर्माणाधीन निवासस्थान आहे.सदर घटना तेथेच घडली असून सकाळी गावकरी घवघवे यांचे शेतात गेले असता त्यांचा अडीच वर्षे वयाच्या वासराला वाघाने गंभीर जखमी करुन जीवे मारले असल्याचे निदर्शनास आले.

सदर घटना त्यांनी वनविभागास कळविल्यानंतर आज दि.६ रोजी वन विभागाच्या चमुने तसेच महसुल विभागाचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.यावेळी संबंधित शेतकऱ्याने नुकसान भरपाईची मागणी केली.सातेफळ परिसरात घटनेची वार्ता पसरल्यामुळे शेतकऱ्यांनी वाघाचा शोध घेऊन तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.वनविभागाच्या कर्मचारी श्रीमती श्रीरामे यांनी सकाळीच घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला,घटनास्थळी वाघाच्या पाऊलखुनासुद्धा आढळून आल्या.
वनविभागाच्यावतीने गावकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या.