“शिक्षकाने उत्तम मार्गदर्शन केले तरचं उद्याचं भविष्य उज्वल होईल”

24

गेल्या वर्षापासुन आपण पाहत आहोत , या कोरोणाच्या काळात ऑनलाईन डिजीटल पद्धतीने शिक्षण सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. मोबाईल आणि संगणक द्वारे आज शिक्षण होत आहे खरे , परंतू किती पट हे शिक्षण योग्य आहे असे तुम्हाला वाटते ? हल्ली मुलांच्या हातामध्ये मोबाईल आहे पण खरचं ते शिक्षणाकडे लक्ष देतांना दिसतात का ? आज पहिल्या वर्गापासून ते ग्रॅज्युएट विध्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्यात येत आहे. परंतू खरोखर त्या विद्यार्थ्यांचा अभ्यास तपासला जातो का ? कारण एवढा वेळ शिक्षकांना देखील मिळत नाही. एक एक तास एका विषयाला लागतो. त्यात विद्यार्थी ऑनलाईन बसलेले असतात खरे परंतू काही जणांचे कॅमेरा ऑफ असतात , तर काही विद्यार्थी क्लास सुरू असतांना बाहेर पडतात. शाळा सुरू असत्या तर शाळा किंवा कॉलेजच्या क्लॉस मधून विद्यार्थी बाहेर पडले असते का ? असे प्रश्न आज समाजातील थोरामोठ्यांना पडताना दिसत आहेत. एकीकडे शासनाने आखलेले नियम योग्य आहेत परंतू या मध्ये विद्यार्थी शिक्षणाच्या बाबतीत मार खाताना दिसत आहेत.

आजच्या काळात परीक्षा जवळ आल्या तरी विद्यार्थ्यांना परीक्षेची कसलीच काळजी दिसत नाही. कारण विद्यार्थी अतिशय हूशार झालेला दिसतो. परीक्षा ऑनलाईन आहे म्हटल्यावर नोट बुक किंवा गाईड चा वापर करून विद्यार्थी आरामात कॉपी करु शकतात आणि पास होऊ शकतात. असेच जर सुरू राहिले तर येणारी युवा पिढी खरचं मानसिक स्थिती मुळे मागे राहिलेली दिसेल. इतर अभ्यासवंताची उदाहरणे फक्त पुस्तकातच छापलेली दिसतील , आजच्या युवा पिढी मध्ये सावित्रीबाई फुले , डॉ.बाबासाहेब आंबेडकर , छत्रपती राजर्शी शाहू , महात्मा गांधी , नेहरू , टिळक , ए पी जे अब्दुल कलाम यांच्या सारखे अभ्यासवंत घडतील का किंवा त्यांच्या प्रेरणा घेऊन विद्यार्थी खरचं शिकतील का ? विद्यार्थी खरं तर उद्याचे उज्वल भविष्य आहे , उद्या त्यांच्याच हातात आपल्याला देश सोपवायचा आहे. म्हणून विद्यार्थ्यांना जागृत करणे गरजेचे आहे.
युवा पिढीला घडवण्याची जबाबदारी प्रत्येक व्यक्तीची आहे , मग ते शिक्षक असो माता पिता आणि शासनच नाही तर सामान्य माणूस. जेव्हा आपण ही कामगिरी हातात घेतो तेव्हाच देशातील युवा पिढी घडेल असे मला वाटते. वळूया शिक्षणाकडे…..

आज बरेच खेड्यागावातील वस्तीमध्ये मुलांना शिकवण्याची परीस्थिती नाही महागाईच्या जमाण्यात सामान्य माणसाच्या घरात एक वेळ जेवणाची देखील सोय नसते तेव्हा त्याला मुलांना शिक्षण कसे देईल याची चिंता असते. त्यात लॉकडाऊनचा काळ पंधरा दिवस लॉकडाऊन तर पंधरा दिवस खुले झालेले दिसते. त्यात मोल मजूरी फार कमी , कमावणारा व्यक्ती एकच खाणारे चार अशा वेळी काम करायचे तरी किती आणि कुठे ? पैसे तर फार कमी मिळतात त्यात मुलांना शिकवायचे तरी कसे? मोबाईल किंवा संगणक विकत घेण्यास पैसे सुद्धा हवे , पैसे या सर्व गोष्टीत गुंतवले तर जेवयाचे काय ? जगणार कसे ? असे अनेक प्रश्न आज सामान्य माणसांना पडतात. त्यामुळे सामान्य व्यक्ती हाचं विचार करतो की शिकून शिकून काय होईल. शेती करेल किंवा कुणाची हमाली करेल. याच कारणने बेरोजगार व्यक्तीची संख्या वाढलेली आहे आणि आज घरी बसलेले दिसत आहेत त्याचे कारण काय ? याला जबाबदार शासन असेल का ?

शासन आपल्या पद्धतीने सर्व गरजा पूर्ण करतांना दिसत आहे तरी पण कुठे तरी कमी पडतांना दिसते. असे का वाटते ? याला जबाबदार शिक्षक तर नाहीत ना ? छे , छे शिक्षक तर मुळीच नाहीत कारण युवा पिढी घडवण्याची जबाबदारी त्यांच्याच स्वतःच्या खांद्यावर आहे.याला कारण म्हणजे समाज आहे. आपण आपल्याचं मुलांना नव्हे तर इतर मुलांना ही योग्य मार्गदर्शन करायला हवे. काय वाईट आहे आणि काय चांगले आहे या गोष्टींची उदाहरणे मांडून त्यांना त्यांच्या भविष्याची जाणीव करुन द्यायला हवी. मनात जिद्द कशी निर्माण करायची काही याची उदारहणे देखील द्यावी , “वाचाल तर वाचाल” त्यामुळे वाचन किती महत्वाचे आहे हे त्यांना सांगायला हवे. समाजातील प्रत्येक व्यक्ती जेव्हा एक आदर्श शिक्षक तयार होईल तेव्हाच आजची युवा पिढी निर्माण होईल.भले तो शिक्षक अडाणी का असेना पण त्या शिक्षकाने उत्तम मार्गदर्शन केले तरच उद्याचं भविष्य उज्वल होईल!
“एक पाऊल , समाज घडवण्याकडे”

✒️लेेखक:-विशाल पाटील,वेरुळकर(अ.भा.म.सा.प.अमरावती विभागीय अध्यक्ष)