भारतीय चलनांवर प्रतिकचिन्हाचा वापर !

24

भारतीय रुपयासाठी प्रतिकचिन्ह ₹ असा तयार करण्यात आला आहे. डी.उदयकुमार या आयआय.टी.च्या विद्यार्थ्याने केलेल्या रेखांकनाची यासाठी निवड करण्यात आली. या प्रतिकचिन्हाच्या वापराने भारतीय रुपयाला जागतीक अर्थव्यवस्थेत नवा आयाम मिळाला आहे. दि.८ जुलै २०१० रोजी झालेल्या भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत यास मंजुरी देण्यात आली व प्रतिकचिन्हासह चलन चलनात आणले गेले. काही ठिकाणी हीच तारीख १५ जुलै अशीही वाचायला मिळते. ₹ हे प्रतिकचिन्ह आंतरराष्ट्रीय अर्थव्यवहारासाठी उपयोगात आणले. रुपया अशा रीतीने चिन्हांकित केल्यानंतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये यास स्थान दिले गेले.रुपया हे भारतीय गणराज्याचे अधिकृत चलन आहे. एक रुपया हा शंभर पैशांमध्ये विभागला जातो. भारतीय चलनामध्ये नोटा व नाणी वापरली जातात. त्या सर्व चलनी नोटा या भारतीय रिझर्व बँकेतर्फे बनविल्या जातात. या चलनासाठी युनिकोड नियमावली ठरवण्यात आली आहे.

रुपया हा शब्द संस्कृतमधील रूप्य किंवा रौप्य या शब्दापासून आला आहे. रौप्य हा चांदी-रजत या धातूपासून बनलेला एक मिश्र धातू आहे. रुप्यापासून बनविलेला तो रुपया-पूर्वीचे राजे चलनासाठी चांदीचे नाणे बनवीत असत. आज घटकेला व्यवहारात रुपयाशिवाय पानी हलत नाही. हातात रुपये नाही तर सर्व व्यवहार खोळंबतात. पूर्वापार चालत आलेली म्हण आजही लागू पडत आहे- “हातात नाही दमडी, हाटाला गेली शेंबडी!”
इतिहास : पूर्वी वस्तुविनिमय पद्धत होती, पैसा म्हणून नव्हताच! एका वस्तूबद्दल दुसरी वस्तू दिली जात होती. प्राथमिक स्वरूपात हत्तीचे दात, प्राण्यांचे केस, झाडांच्या साली, बिया, शंख, शिंपले इत्यादी आदी गोष्टी पैसा म्हणून वापरले जात होते. बक्सरच्या लढाईनंतर सन १७६४-६५मध्ये ब्रिटिश ईस्टइंडिया कंपनीने भारतात मोगल बादशाह शाहआलमची नाणी पाडून देण्यास सुरुवात केली. त्यावेळची नाणी हाताने तयार करण्यात येत असत. त्यामुळे ती गोल, साचेबद्ध, एकसारखी नसत. पुढे सन १७९०मध्ये भारत देशात यासाठी मशीन मागविण्यात आली.

त्याद्वारे तयार करण्यात आलेली नाणी बरीच सुबक झाली. भारतात गोल, सुबक, सारख्या वजनाची, प्रमाणित नाणी तयार करण्याचा मान जेम्स प्रिन्सेप यांना जातो. त्यांना भारतीय नाणी शास्त्राचे जनक मानले जाते. त्यांनी भारतीय नाण्यांचा सखोल अभ्यास करून भारतीय नाणी साचेबद्ध आणि सारख्या वजनाची असावीत, म्हणून एक अहवाल तयार करून लॉर्ड विल्यम बेंटिक यांच्याकडे पाठविला. तो अहवाल मंजूर झाला व त्यांनी पाठविलेल्या सहा नमुन्यांपैकी एक मंजूर करण्यात आला. त्या पहिल्या नाण्यावर तत्कालीन ब्रिटिश राजे चौथे विल्यम यांची भावमुद्रा होती. तेव्हापासून भारतीय नाणी यंत्रांद्वारे तयार करण्यात येऊ लागली. प्रिन्सेप यांनीच भारतात वजन आणि मापे प्रमाणित असावीत, म्हणून सरकार दरबारी पाठपुरावा केला. तोही अहवाल मंजूर होऊन भारतात वजन आणि मापे प्रमाणित झाली. या सोबतच कोणते नाणे कुठे तयार करण्यात आले? नकली किं असली? उसणवार परत घेणे व चोख व्यवहार आदी समजण्यासाठी सर्व प्रकारच्या नाण्यांवर एक छोटी खूण करण्यात येऊ लागली.

ती पाहून नाणी जमा करणे हा या छंदातला एक महत्त्वाचा भाग समजला जातो. आजच्या चित्रपट गीतांमध्येही रुपयांचा उल्लेख असा केला जातो- “दे दे मेरा दे दे बिस रुपया! ट्वेंण्टी रुपीज माय ट्वेण्टी रुपीज!!”सन १८३३-३४पासून विल्यम राजाच्या छापाची नाणी तयार व्हावयास सुरुवात झाली. त्यानंतर अनुक्रमे व्हिक्टोरिया राणी, आठवे एडवर्ड, पंचम जॉर्ज आणि सहावे जॉर्ज सहावे या राजांची मुद्रा असलेली नाणी सन १९४७ पर्यंत भारतात तयार करण्यात आली. या कामासाठी तत्कालीन भारताच्या तिन्ही म्हणजे बंगाल, मुंबई आणि मद्रास या प्रांतात अनेक नवीन टांकसाळी तयार करण्यात आल्या. तांबे, चांदी व सोने वापरून नवीन नाणी तयार करण्यात आली. त्यासाठी नवा कायदाही अस्तित्वात आला. सगळ्यात लहान नाणे म्हणजे १पै, ३पैमिळून १पैसा, ६पैशांचा १आणा, १६आण्यांचा १रुपया, १५रुपये म्हणजे १मोहर- सोन्याचे नाणे असे प्रमाण ठरविले गेले.

त्यावर एका बाजूला राजा वा राणीच्या भावमुद्रा तर दुसऱ्या बाजूस ईस्टइंडिया कंपनी किंवा नाण्याची किंमत वगैरे माहिती लिहिली जात असे. भारताला स्वातंत्र्य मिळण्याचे निश्चित झाल्यावर नाण्यांमध्ये थोडा बदल करण्यात आला. एकीकडे सहावे जॉर्ज यांची भावमुद्रा तशीच ठेवण्यात आली तर दुसऱ्या बाजूस भारताचे प्रतीक म्हणून सिंहाचे चित्र आले. इ.स.१९५० साली मात्र पूर्णपणे भारतीय नाणी तयार करण्यात आली. ही नवी नाणी चांदीची नव्हती पण त्यांचे रुपया हे नाव मात्र स्वीकारण्यात आले. ब्रिटिश राजे-राण्यांचे चित्र काढून टाकण्यात आले. आता त्याऐवजी चारही दिशांकडे पाहणारे चार सिंहाचे मानचित्र आले. सन १९५७ नंतर आणखी बदल करून एक रुपयाचे १००पैसे असे प्रमाण ठरविण्यात आले. तेव्हापासून आजवर नाण्यांच्या धातू, वजन वगैरेमध्ये वेळोवेळी बदल होत गेले. मुख्य म्हणजे दर्शनी भागावर काहीही फरक झालेले नाहीत.
रुपयाची उत्क्रांती : फुटी कौडी पासून कवडी आली.

कवडीपासून दमडी आली. दमडीपासून धेला आला. धेलापासून पै आली. पैपासून पैसा आला. पैसापासून आणा आला व आणापासून रुपया आला. जुनी भारतीय चलन प्रणाली कशी मोजली जात होती? ते खालील विभागणी वरून लक्षात येईल : २५६दमडी – १९२पै – १२८धेला – ६४पै – १६आणे – १रुपया. ही पद्धती पन्नासच्या दशकानंतर बाद करून पैसे पद्धत सुधारण्यात आली व १०० पैशांचा १रुपया अशी मोजदाद होऊ लागली. त्याकाळच्या एका घटनेवरून ही म्हण प्रचलित झाली- “सफेद कपडे खिसे खाली! दोन पैशासाठी खून झाली!!”
नोटा व नाणी : सन २००५पासून बनविल्या जाणाऱ्या नोटा- सध्या ५रुपये ते २०००रुपयेपर्यंतच्या नोटा चलनात आहेत. पूर्वी चलनात असलेल्या एक व दोन रुपयांच्या नोटा अजूनही ग्राह्य आहेत. परंतु या किंमतींच्या नवीन नोटा छापल्या जात नाहीत. भारतीय चलनातील शंभर रुपयांच्या नोटेच्या पृष्ठभागावरील हिमशिखर म्हणजे ‘माउंट कांचनगंगा’ होय. नोव्हेंबर २०१६मध्ये मा.मोदी सरकारने चलनातील पाचशे व हजार रुपयांच्या नोटा रातोरात रद्द झाल्याचे जाहीर केले. त्याऐवजी ₹५०० व ₹२००० च्या नव्या नोटा चलनात आणल्या. ₹७५चे नाणे- दि.३० डिसेंबर २०१८ला विमोचित झाले, मात्र नेहमीच्या वापरासाठी ते नाही.

पुढील नाणी ₹१०, ₹५, ₹२ व ₹१ हे चालू आहेत. मात्र ५०पैसे- ३० जून २०११पासून भारतीय चलनातील सर्वात कमी किमतीचे चलन आहे आणि २५पैसे- ३० जून २०११पासून ५०पैशांखालील किंमतीची सर्व नाणी चलनातून अधिकृतरीत्या बाद झाली आहेत. अल्पशी माहिती लेख प्रपंचरूपाने सेवेशी सविनय सादर!


✒️संकलक व शब्दयोजक:-श्री निकोडे कृष्णकुमार गुरुजी.
[मराठी सारस्वत.]मु. पो. ता. जि. गडचिरोली.व्हा. नं.९४२३७१४८८३.