विधवा….!

23

क्षणात होत्याचे नव्हते होणे…
काय असते….?
विचारा तिला…
जिचा नवरा हयातीत गेला…

हसण्याचे भाग्य नशिबी असावे लागते
विधवेकडे पाहून विचार करावा लागते..
आयुष्य अथांग ज्यापुढे समुद्रही लहान वाटू लागते
का हे जीनं आलं नशिबी..?
काळ्याकुट्ट रेषा अंधार चोहीकडे
परतून कोणीच पाहत नाही तिच्याकडे..

संसारात डोकं होतं तिचं
चूल आणि मूल पुरतंच..
कसा लावेल हिशोब ती आता
किरणामाल भरण्याचा, 
कपड्याला ठिगळं किती आणण्याचा…

मुलांची शाळा अन् त्यांची फिस 
रावांनीच पाहिली व भरली
हयातीत…
नीटनेटके कपडे मुलांचे
धुवून सुंदर होतील कसे?
जुने नवीन करायला लागतील की पैसे…

तिचा साज शृंगार दाखवील कोणाला
नवरा तिचा जीव होता
जीव आता लावील कोणाला..

विधवा असणे हे पाप नाही
की जन्मठेपेची शिक्षा नाही..
साज नको म्हणून तिला थांबवू नका
आंबट-तिखटापासून रोकू नका
शेवटी आहे माणूसच ती
मन अन् ह्रदय असणारी..

सैरावैरा फिरू वाटेल तिलाही
चविष्टही खाऊ वाटेलच की..
भटकली जरी कधी आडमार्गी
जो मार्ग आड आहे असा घोषित केला
याच समाजाने आपल्याच सोयीसाठी..
हिणवू नका तिला दोष देण्यासाठी..

ती आताही आई आहे
तिच्या चिमुकल्यांची
सून आहे तुमच्या घरची
सोबत तिचे लेकपण जपा
सुनबाई म्हणून सन्मानाने वागा…
मन कोमेजून जाऊ द्यायला
फुल नाही ते उद्या नवीन उमलायला..

तरुण विधवेची स्थिती तर
दयनीय अति…
मनाचे उंबरठे पार होतील की
त्याला काही हद्दच नाही
बांधून त्याला ठेवत बसायला
ती काही सरहद्द नाही..

जगू द्या, फिरू द्या
वाटेल ते खाऊ द्या..
प्रेम तुमचे लागेल दोनच शब्दांचे
माणूस म्हणून तिला 
माणुसकीचा हक्क द्या…!
माणूस म्हणून तिला 
माणुसकीचा हक्क द्या…!

✒️अमोल चंद्रशेखर भारती,नांदेड(मो-8806721206)