नाथभक्तांच्या सोयीसाठी ४५ कोटी रुपये खर्चून होणार रोप-वे

25

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.17जुलै):-देशातील नाथभक्तांच्या सोयीसाठी मायंबा व मढी देवस्थान समितीकडून एक संयुक्त उपक्रम हाती घेण्यात येत असून सुमारे ४५ कोटी रुपये खर्चून दोन्ही देवस्थानांना जोडणारा रोप-वे केला जाणार आहे.हा राज्यातील एकमेव असा उपक्रम ठरणार आहे.आ.सुरेश धस यांच्या पुढाकाराने दोन्ही देवस्थान समित्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली,यात हा निर्णय झाला.याबाबत राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्याकडे सुलभ दर्शन व पर्यटकांसाठी रोप-वेसाठी आर्थिक तरतुदीची मागणी केली आहे.गर्भगिरी डोंगर रांगांमध्ये श्री.क्षेत्र वृध्देश्वर येथे नाथ संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवली गेली.

येथून जवळच नाथ संप्रदायाचे आद्य मच्छिंद्रनाथांची संजीवन समाधी मायंबा (सावरगाव) येथे आहे.तेथून जवळच चैतन्य कानिफनाथांची मढी येथे संजीवन समाधी आहे.संपूर्ण परिसरात औषधी वनस्पतींमुळे अत्यंत शुद्ध हवामान असते.पावसाळ्यामध्ये तर या परिसरात राज्याच्या विविध भागातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात.दोन्ही देवस्थान समित्यांतर्फे भाविकांना मोफत महाप्रसाद दिला जातो.मढी – मायंबा – वृद्धेश्वर अशी भ्रमंती एका दिवसात पूर्ण होते.

मायंबा देवस्थानची उंची जास्त असून अत्यंत अवघड असा रस्ता आहे.अलीकडील काही वर्षात सर्व देवस्थाने डांबरी रस्त्याने जोडली गेली तरी,सोयीस्कर दळणवळण व्यवस्था नसल्याने अनेक भाविक मढीवरून दहा किलोमीटरचा घाट रस्ता पायी चालत मायंबाला जातात.धार्मिक पर्यटनाबरोबरच निसर्ग पर्यटनाला असलेला प्रचंड वाव व यातून संपूर्ण परिसराचा होणारा सर्वांगीण विकास डोळ्यापुढे ठेवून दोन्ही देवस्थान समित्यांनी संयुक्त विकास कामांचा निर्णय घेतला आहे,अशी माहिती मच्छिंद्रनाथ संस्थानचे अध्यक्ष दादासाहेब चितळे यांनी दिली