तनाने नाही तर मनानेच पंढरी दर्शन करुया !

31

(आषाढी पंढरपूर यात्रा विशेष)

दरवर्षी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर या पावन तीर्थक्षेत्री आषाढ शुद्ध एकादशीला अवर्णनीय संत मांदियाळी जमत असते, तिलाच पंढरपूर यात्रा म्हटले जाते. दोन महिन्याआधी पासूनच विठ्ठल परब्रह्माच्या भेटीची आस वारकरी लावून असतात. त्यांचे अहर्निश त्या वाटेकडे उत्कट ध्यान असते. जसे-

“दिवाळीच्या मुळा लेकी आसावली।
पाहतसे वाटुली पंढरीची।।
तुका म्हणे मज लागलीसे आस।
पाहे रात्रंदिवस वाट तुझी।।”

आषाढी एकादशी महात्म्य: आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशीची तिथी होय. या महिन्यात किमान दोन एकादशी असतात. आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढ वद्य एकादशी त्या या होत. तिथीची वृद्धी झाली किंवा अधिक मास असेल तर आणखीही एकादशी असू शकतात. देवशयनी एकादशी, स्मार्ताची एकादशी, भागवत एकादशी, अशा तिथीवृद्धी या चांद्रमास गणनेतील फरकामुळे होतात. अधिक मास आल्यास त्याच्या आणखी दोन एकादशी होतात. अधिक महिन्यात येणार्‍या दोनही एकादशींना कमला एकादशी हेच एकमेव नाव असते. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात धार्मिक व आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी देव निद्रिस्त असतात, त्यांना भक्तीने जागवावे लागते. एकादशी व्रताबद्दल संतवचन-

“ऐका व्रताचें महिमान। नेमें आचरती जन।
गाती ऐकती हरिकीर्तन। ते समान विष्णुसीं॥”

अशी समजूत आहे. आषाढ वद्य एकादशी निमित्त विविध शुभेच्छा संदेश दिले जातात. स्थानिक विठ्ठलाची मंदिरे, धार्मिक स्थळे व शाळा यांमध्ये दिंडी आयोजित केली जाते. या सणामागची पौराणिक कथा अशी-

मृदुमान्य नावाच्या एका राक्षसाने भगवान शंकराची उपासना करुन ‘त्यास कोणाकडूनही मरण येणार नाही’ असा वर मागून घेतला. पुढे त्याने सर्व देवलोक जिंकण्याचा निश्चय केला. तेव्हा ब्रम्हा, विष्णू व महेश हे गुहेत लपून बसले. मृदुमान्य त्यांचा शोध घेतच होता. त्यामुळे तीन दिवस झाले तरी देवांना बाहेर पडता येईना. शेवटी त्या तिघांच्या एकवटलेल्या श्वासापासून एक देवता उत्पन्न झाली, तीच ही एकादशी होय. तिने मृदुमान्याला ठार मारले. या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो. धार्मिक लोक ईश्वर भक्तीसाठी दररोज काही धार्मिक पुस्तकांचे वाचन करत स्वत:चे आचरण शुध्द करण्यासाठी एखादे व्रत घेतात किंवा तत्सम नियम करतात. सलग चार महिने ते न चुकता पाळतात. या दिवशी उपवास करुन पुढील चार महिन्यात जे काही नियम पाळावयाचे असतील त्याविषयी संकल्प करतात. ते निर्विघ्नपणे पूर्ण करून घेण्यास श्रीमहाविष्णूची प्रार्थना करतात. या दिवशी लोक गंगेकाठी स्नान करतात. पूजेच्या वेळी एक हजार किंवा एकशेआठ तुळशीपत्रे विष्णूला वाहतात. पूर्ण वेळ भजन-पूजनांत घालवतात. कारण-

“तया दंडी यमदूत। झालासे तयाचे अंकित।
तुका म्हणे व्रत। एकादशी चुकलिया॥”

पंढरपूर वारी: महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक-भक्त विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत येतात. हिलाच पंढरपूर वारी किंवा आषाढी वारी म्हणतात. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. या दिवशी पंढरपुरास शेगाव येथून पूर्णब्रह्म अधिकारी श्रीसंत गजानन महाराज, आळंदीहून संत ज्ञानेश्वर, देहूहून संत तुकाराम, त्र्यंबकेश्वराहून संत निवृत्तीनाथ, पैठणहून संत एकनाथ व उत्तर भारतातून संत कबीर यांची पालखी येते. या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याचे विशेष महत्व आहे. कारण संतोक्ती प्रमाण-

“तुझे रूप चित्ती राहो। मुखी तुझे नाम।।
देह प्रपंचाचा दास। सुखे करो काम।।”

पंढरपूर यात्रा: टाळ, चिपळ्या व मृदंगाच्या गजरात व विठ्ठलाच्या नामघोषात वारकऱ्यांच्या दिंड्या एकादशीच्या आदल्या दिवशी पंढरपुरात दाखल होतात. झेंडे, तुताऱ्या, स्वारीचा सजविलेला घोडा, अब्दागीर, पालख्या, इतर घोडे, बैलगाड्या यांचे ताफे व डोक्यावर तुळशीवृंदावन किंवा सामानाची गाठोडी घेतलेल्या मराठमोळ्या स्त्रिया या सर्वांच्या गर्दीने पंढरपुरात उत्सवी वातावरण निर्माण होते. अवघी पंढरपूर नगरी विठुनामाच्या गजराने दुमदुमून जाते-

“पांडुरंग विठ्ठला, हरिॐ विठ्ठला!
विठ्ठल विठ्ठल विठ्ठलाऽऽऽ!!
भक्तिभावाने भक्त नाचती!
विठ्ठल विठ्ठल विठ्ठलाऽऽऽ!!
आनंदाने फुगड्या खेळती!
विठ्ठल विठ्ठल विठ्ठलाऽऽऽ!!”

चैत्री वारीच्या वेळी पंढरपुरात म्हशी-गाईंचा मोठा बाजार भरतो. यात्रेच्या वेळी अगरबत्ती, हळद, कुंकू, खेळणी, फुले, माळा, बांगड्या, देवाच्या मूर्ती, तांब्या-पितळेची भांडी वगैरे अनेक वस्तूंची दुकाने सर्व ठिकाणी थाटली जातात व मोठा व्यापार चालत असतो. संत भानुदास महाराजांनी विजयनगरहून श्रीविठ्ठलाची मूर्ती पंढरपुरात आणली तो दिवस कार्तिकी एकादशीचा होता. या दिवसाची आठवण म्हणून सर्वप्रथम रथ प्रदक्षिणा काढण्यात आली होती. त्या दिवसाचे स्मरण म्हणून कार्तिक एकादशीस रथ काढण्यात येतो. इ.स.१८१०मध्ये सांगलीच्या पटवर्धनांच्या प्रोत्साहनाने रथयात्रा व राजपूजा होऊ लागली. आषाढी एकादशी व कार्तिकी एकादशीला दुपारी खाजगीवाले वाड्याजवळ ग्रामप्रदक्षिणेला सुरवात होते. समोर हत्ती व घोडे असलेला हा रथ भाविक ओढतात. त्याच्या आंत विठ्ठल, राही व रुक्मिणी यांच्या मूर्ती असतात. या भक्तिसंप्रदायाच्या आद्यपीठात आणि भीमातटीय महा योगपीठात महाराष्ट्रच अवतरतो.

राज्याच्या सर्व भागांतून आणि कर्नाटकादी इतर राज्यांतूनही प्रतिवर्षी आषाढी-कार्तिकी शुद्ध एकादशीला हजारो वारकरी व यात्रेकरूंचा जनसागर लोटत असतो. चैत्रातील व माघातील यात्रा त्या मानाने लहान असतात. महाराष्ट्रातील सामान्य माणसाचे हे श्रद्धास्थान आहे. गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत हे सगळे दरवर्षी मनोभावे येथे भेट देत असतात. मात्र मागील वर्षी व यंदा शासकीय आदेशाप्रमाणे यात्रा सलग दोनदा रद्दबातल झाल्याने भाविकांचा खुपच हिरमोड होत आहे. भक्तजनहो, आपण एकच करुया. तनाने जाता येत नाही, म्हणून मनानेच श्रीविठ्ठल परब्रह्म चरणी जाऊया. “जाता पंढरीसी, सुख वाटे जीवा..!” हा अनुभव नक्कीच घेऊ शकतो. नेहमीप्रमाणेच विठ्ठलभक्ती घरी सुरक्षित राहूनही साध्य करता येते. पुंडलिक वरदा, हरि विठ्ठल!

!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे सर्वांना आषाढी एकादशी व यात्रेच्या भक्तिमय शुभेच्छा !!

✒️संत चरणरज -श्रीकृष्णदास (बापू) निरंकारी(संत-लोक साहित्य व थोरांचा इतिहास अभ्यासक.c/o श्रीगुरूदेव प्रार्थना मंदिराजवळ, मु. रामनगर वॉर्ड नं.२०, गडचिरोली.
जि. गडचिरोली, व्हा.नं. ९४२३७१४८८३.
इमेल- Krishnadas.nirankari@gmail.com