ऑलिम्पिकमध्ये अधिक पदकांची अपेक्षा

33

२३ जुलैपासून जपानची राजधानी टोकियो येथे ऑलिम्पिक ही जगातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा खेळवली जाणार आहे. वास्तविक ही स्पर्धा गेल्याच वर्षी खेळवली जाणार होती पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा एक वर्ष पुढे ढकलली गेली. यावर्षी योग्य ती खबरदारी घेऊन ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. भारत सरकारनेही आपल्या सर्व खेळाडूंना लशींच्या दोन्ही मात्रा देऊनच टोकियोला पाठवले आहे. यावेळी टोकियोला रवाना झालेले भारतीय पथक हे आजवरचे सर्वात मोठे पथक आहे. या स्पर्धेतील १८ प्रकारांमध्ये भारताचे १२६ खेळाडू सहभागी होणार आहेत. कोरोनाचा फटका जसा इतर क्षेत्रांना बसला तसा तो भारतीय क्रीडा क्षेत्रालाही बसला आहे.

कोरोनामुळे मागील वर्षभरातील बराचसा काळ लॉक डाऊनमध्ये गेल्याने खेळाडूंना पुरेसा सराव मिळाला नाही तरीही भारतीय खेळाडूंनी हार न मानता मिळेल तसा सराव करून आपला फॉर्म टिकवला. भारत सरकारनेही खेळाडूंसाठी सराव शिबिराचे आयोजन करून त्यांना योग्य सराव मिळेल याची काळजी घेतली. भारत सरकारने खेळाडूंना सर्वोत्तम सुविधा व प्रशिक्षण देण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न केला. खेळाडूंनीही मेहनत घेऊन आपला फॉर्म टिकवला आणि ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले. देशासाठी पदक मिळवावे हेच या खेळाडूंचे स्वप्न आहे त्यासाठी त्यांनी कठोर मेहनत घेतली आहे. या खेळाडूंच्या पाठीशी देशातील १३५ कोटी देशवासियांच्या शुभेच्छा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत. १३५ कोटी देशवासीयांना या खेळाडूंकडून पदकांची अपेक्षा आहे आणि ते त्यात यशस्वी होऊन जास्तीतजास्त पदकांची लयलूट करून देशवासीयांच्या अपेक्षा पूर्ण करतील यात शंका नाही. कोरोनामुळे खेळाडूंना पुरेसा सराव मिळाला नसतानाही भारतीय खेळाडूंनी मागील वर्षभरात सातत्याने चांगली कामगिरी केली आहे.

त्यामुळेच या ऑलिम्पिकमध्ये भारताला अधिक पदके मिळण्याची आशा आहे. ऑलिम्पिकमध्ये भारताला आजवर म्हणावे तसे यश मिळाले नाही. जगातील इतर राष्ट्रे पदकांची लयलूट करत असताना भारताला मात्र बोटावर मोजण्याइतकेच पदके मिळाली आहेत. भारताला सर्वाधिक पदके हॉकी या खेळाने मिळवून दिली आहेत पण अलीकडे भारतीय हॉकी संघाची कामगिरीही निराशाजनक झाली आहे. मागील काही ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाला पदक मिळण्याऐवजी शेवटच्या क्रमांकावर समाधान मानावे लागत होते. वैयक्तिक क्रीडा प्रकारात तर भारताला हाताच्या बोटावर मोजता येईल इतकेच पदके मिळाली आहेत. १९५२ साली जपानमध्येच झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत खाशाबा जाधव या मराठी मातीतील मल्लाने कांस्यपदक मिळवले होते त्यांनतर तर पदकांचा दुष्काळच पडला. हा दुष्काळ थेट १९९८ साली संपला. यावर्षी झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत लियांडर पेसने टेनिसमध्ये कांस्यपदक मिळवले. त्यानंतरच्या प्रत्येक स्पर्धेत भारतीय संघाला कधी एक तर कधी दोन पदके मिळत गेली. भारताला वैयक्तिक क्रीडाप्रकारात आजवर फक्त एक सुवर्णपदक मिळाले आहे.

२००८ साली झालेल्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये अभिनव बिंद्रा या नेमबाजाने देशासाठी एकमेव सुवर्णपदक जिंकले आहे. १३५ कोटी लोकसंख्या असलेल्या देशात एकच सुवर्णपदक असणे ही भूषणावह बाब नाही. भारताचा हा सुवर्णपदकाचा दुष्काळ यावेळी तरी मिटेल अशी आशा देशवासियांना आहे. इतकेच नाही तर या ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करून जास्तीतजास्त पदके मिळवतील अशी आशा आहे कारण यावेळी भारतीय खेळाडू चांगलेच फॉर्ममध्ये आहेत. हा फॉर्म असाच टिकवून भारतीय खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी केली तर टोकियो ऑलिम्पिक भारतासाठी ऐतिहासिक ठरेल. क्रीडा क्षेत्रातील जाणकारांनी देखील या ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघ ५ सुवर्ण, ५ रौप्य आणि ११ कांस्य अशी एकूण २१ पदकांची कमाई करेल असा अंदाज वर्तवला आहे. कुस्ती, नेमबाजी, तिरंदाजी, वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग, बॅडमिंटन, टेबल टेनिस या क्रीडाप्रकारात भारताला सर्वाधिक पदके मिळतील अशी अपेक्षा आहे. भारतीय खेळाडू या अपेक्षा पूर्ण करून टोकियो क्रीडा नगरीत भारताचा तिरंगा डौलाने फडकवतील यात शंका नाही. भारतीय खेळाडूंना मनापासून शुभेच्छा!

✒️लेखक:-श्याम बसप्पा ठाणेदार(दौंड,जिल्हा पुणे)मो:-९२२५४६२९५