मदतीला धावून जाणारा नेता – मा.ना.श्री.अजित दादा पवार

28

राज्याच्या राजकारणात एक प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची सातत्याने चर्चा होते ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते मा.ना.श्री.अजित दादा पवार यांचा आज (22 जुलै) वाढदिवस असून,त्यांच्या वाढदिवसानिमित्त लिहिलेला लेख….

मा.ना.श्री.अजित अनंतराव पवार (जन्म,देवळाली प्रवरा – अहमदनगर जिल्हा,२२ जुलै १९५९) मा.ना.श्री.अजित दादा पवार हे सध्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत.ते माननिय श्री.शरदचंद्रजी पवार यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे राजकीय नेते आहेत.
महाराष्‍ट्रात या ना त्‍या कारणाने नेहमीच चर्चेत असलेल्‍या काही मोजक्‍याच नेत्‍यांपैकी एक म्‍हणजे ना.अजित दादा पवार.त्‍यांच्‍यावर प्रसिद्धी माध्‍यमांतून व विरोधकांकडून नेहमीच कडाडून टीका होते.कारण ते स्पष्टोवक्ते आहेत.
मा.ना.श्री.अजित दादा पवार यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील काटेवाडी आहे.मात्र त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा या त्यांच्या आजोळच्या गावी झाला.त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण तेथेच झाले.महाविद्यालयीन शिक्षणासाठी ना.अजित दादा पवार मुंबईत आले.

शिक्षण पूर्ण करून बारामतीला आले आणि तेथील सहकारी संस्थांमधून त्यांनी सामाजिक व राजकीय कार्याला सुरुवात केली.ना.अजित दादा पवार यांनी १९८२ साली राजकारणात प्रवेश केला.त्याचवर्षी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर त्यांची निवड झाली.पुणे जिल्हा सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदी १९९१ साली त्यांची निवड झाली.१६ वर्ष ते त्या पदावर होते.१९९१ साली पहिल्यांदा ना.अजित दादा पवार बारामतीमधून लोकसभेवर निवडून गेले.नंतर काका माननिय श्री.शरदचंद्रजी पवार यांच्यासाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला.त्यानंतर मा.श्री.शरदचंद्रजी पवार पी.व्ही.नरसिंहराव सरकारमध्ये संरक्षणमंत्री झाले.ना.अजित दादा पवार त्यानंतर १९९५,१९९९,२००४, २००९,२०१४ आणि २०१९ असे सलग सहा वेळा ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले.१९९५ साली महाराष्ट्रात (भाजप – शिवसेना) या युतीचे सरकार आले.

त्यानंतर १९९९ साली पुन्हा कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार आले.महाराष्ट्राच्या विलासराव देशमुख सरकारमध्ये त्यांना बढती देऊन कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले.ऑक्टोंबर १९९९ ते डिसेंबर २००३ पर्यंत जलसिंचन खाते त्यांच्याकडे होते.डिसेंबर २००३ ते ऑक्टोंबर २००४ या काळात त्यांच्याकडे ग्रामीण विकास खात्याचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला.२००४ साली आघाडी सरकार (कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेस – इतर) पुन्हा सत्तेवर आले तेव्हा जलसिंचन खाते अजित पवारांकडेच होते.२००४ साली त्यांना पुण्याचे पालकमंत्री बनवण्यात आले.२०१४ पर्यंत राज्यात कॉंग्रेस – राष्ट्रवादीचे सरकार होते.तोपर्यंत ते पुण्याचे पालकमंत्री होते.तसेच सध्या (शिवसेना – राष्ट्रवादी – काँग्रेस) या सरकारमध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम पहात आहेत.

कार्यकर्ता असो वा कुटुंबीय कोणालाही कधीही तातडीची गरज पडली तर त्याच्या मदतीला धावून जाणारे मा.ना.श्री.अजित दादा पवार आहेत.कोणाचा अपघात झाला असो व कोणावर ऑपरेशनची पाळी आलेली असो,ना.अजित दादांना मदतीसाठी फोन केल्यानंतर त्यांनी मदत केली नाही असे कधी घडतच नाही.तातडीच्या वेळेस कोणी तरी पुढे होऊन निर्णय घेण्याची गरज असते,ना.अजित दादा पवार निर्णय घेण्याच्या बाबतीत अत्यंत तत्पर आहेत.पटकन निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करण्याचा स्वभाव असल्यामुळे अनेकदा अशा निर्णयामुळे त्यांच्याकडून अनेकांना मदत होते.प्रत्येक वेळेस प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणं हा ना.अजित दादांचा स्वभाव आहे.त्यामुळेच त्यांनी मनाने अनेक लोक व कार्यकर्ते जोडलेली आहेत.त्यांचा स्वभाव हा सतत दुसऱ्याला मदत करण्याचा असतो,त्यांच्या कुटुंबातील कोणाला काही झालं किंवा त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना काही झालं,तर सर्वात पहिली धावून जाणारी व्यक्ती म्हणजे ना.अजित दादा पवार असतात.

पवार परिवारातील सर्व भावंडांमध्ये आईला सर्वाधिक जीव लावणारे आणि आईला जरा काही झालं तर सर्वाधिक काळजी करणारे ना.अजित दादा पवार आहेत.कोणतीही नवीन गोष्ट केली की ती पहिली हौसेने आईला सांगायची किंवा आईला दाखवायची ही त्यांची सवयच आहे.दररोज नियमितपणे आईची चौकशी करायची व तिला कोणताही त्रास होणार नाही.याची काळजी घेणे हे अजित दादा नित्याने करतात.आईसोबतच घरातील सर्व बहिणी व कुटुंबीयांच्या सतत अजित दादा संपर्कात असतात आणि कुटूंबातील कोणलाही त्रास होऊ नये याची दादा स्वतः पुढे होऊन काळजी घेत असतात.आजही इतक्या मोठ्या पदावर जाऊन देखील ना.अजित दादांनी आपले लहानपण व आठवणी लक्षात ठेवल्या आहेत.कुटुंबीय व सर्व भावंड जेंव्हा एकत्र जमतात तेव्हा दादा गप्पा मारण्या सोबतच सर्वांच्या गंमतीजमंती करणं,चेष्टा-मस्करी करणं आणि सर्वांना मनमुराद हसवतात.त्यांचा विनोदी स्वभाव आहे त्यामुळे सहजतेने ते वातावरणातला तणाव दूर करतात.

सर्वाधिक रमण्याची त्यांची जागा म्हणजे त्यांचे कुटुंब आहे.ना.अजित दादा हौशी आहेत.त्यांना प्रत्येक गोष्टीची आवड आहे.कोणतीही गोष्ट करतांना निवडून आणि आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेचे दर्शन घडवून ते करतात.इमारती बांधणे असो वा लॅन्डस्केपिंग असो,एखाद्या आर्किटेक्चर ला लाजवेल किंवा त्याला समजणार नाही अशा पद्धतीने दादा अनेक गोष्टी करत असतात.आर्किटेक्चर ला समजणार नाहीत अशा गोष्टी ते सहजतेने सुचवून जातात.त्यामुळे इमारती उभारतांना त्यांनी दिलेल्या सूचना या भविष्यात मोलाच्या ठरतात.ना.अजित दादांच्या कुटुंबातील कोणताही कार्यक्रम,दिवाळीचा सण असो किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमात स्वतः पुढे होऊन सर्व तयारी व्यवस्थित झाली आहे की नाही,टेबल खुर्च्या नीट लागले आहेत की नाही इथपासून ते आलेली प्रत्येक व्यक्ती व्यवस्थित जेवली आहे की नाही हे पाहणे त्यांना आवडतं.

आलेल्या प्रत्येकाच आदरातिथ्य करणे हे आपले कर्तव्य समजतात,स्वतःउभे राहून प्रत्येकाची काळजी घेणे हा त्यांचा स्वभाव आहे.कार्यकर्ता असो व कुटुंबातील कुठलाही व्यक्ती असो प्रत्येकाची काळजी ते तितक्याच तत्परतेने घेतात हे जास्त महत्त्वाचे आहे.रस्त्यात कुठे अपघात झाला तर गाडी थांबवून पहिली अपघातग्रस्तांना मदत करणे हे त्यांचे नेहमीचे काम आहे.अपघातग्रस्त कुणीही असला तरी त्याचा जीव वाचणं,त्याच्यावर तातडीने उपचार होण त्यांना महत्त्वाचं वाटतं.त्यामुळे कितीही व्यस्त कार्यक्रम असला किंवा घाई असली तरी अपघात बघून दादा पुढे निघून गेलेत असं कधी घडतच नाही.हा त्यांचा वेगळा स्वभाव आहे.वरून कितीही कठोर वाटत असले तरी आतून ते मनाने खूप हळवे आहेत.त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना परमेश्वराने असेच समाज कार्य करण्यासाठी उदंड आयुष्य देवो ही परमेश्वर चरणी प्रार्थना.

✒️लेखक:-राजेंद्र लाड(आष्टी,जि.बीड)मो.९४२३१७०८८५