पुरबाधित 5 हजार 703 कुटुंबातील 26 हजार 128 व्यक्तींना जिल्हा प्रशासनाकडून अन्नधान्य व केरोसीनचे वाटप सुरु

✒️दिनेश लोंढे(विशेष प्रतिनिधी)

सातारा(दि.28जुलै):- पुरबाधित, अतिवृष्टीमुळे भूस्खलनबाधित 5 हजार 703 कुटुंबातील 26 हजार 128 व्यक्तींना जिल्हा प्रशासनामार्फत अन्नधान्य व कोरोसनीचे वाटप सुरु करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा देवकाते यांनी दिली आहे.पुरबाधितांमध्ये वाई तालुक्यातील 290 कुटुंबांची संख्या असून 1 हजार 503 व्यक्तींची संख्या आहे. कराड तालुक्यातील 1 हजार 411 कुटुंबातील 6 हजार 155, पाटण तालुक्यातील 2 हजार 425 कुटुंबातील 10 हजार 307, महाबळेश्वर तालुक्यातील 73 कुटुंबातील 260, जावली तालुक्यातील 1 हजार 750 कुटुंबातील 7 हजार 691  व सातारा तालुक्यातील 44 कुटुंबातील 212 व्यक्ती अशा एकूण 5 हजार 703 कुटुंबातील 26 हजार 128 व्यक्तींना जिल्हा प्रशासनाकडून अन्नधान्य व केरोसीनचे वाटप सुरु करण्यात आले आहे.

*स्वस्तधान्य दुकानदारांना सक्त सूचना*
पुरबाधित, अतिवृष्टीमुळे भूस्खलनबाधित कुटुंबांना शासन आदेशाप्रमाणे मंजूर केलेले धान्य वाटप करतांना कोणत्याही पात्र लाभार्थ्याला डावलले जाऊ नये यासाठी अत्यंत जबाबदारपणे वाटप करावे.तसेच या कामी तहसीलदार यांनी लक्ष ठेवावे अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिल्या आहेत.

*पालकमंत्री, गृह राज्यमंत्री व आमदारांच्या हस्ते अन्नधान्याचे वाटप*
कराड तालुक्यात पालकमंत्री बाळासाहेब पाटील, पाटण तालुक्यात गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, जावली तालुक्यात आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले व महाबळेश्वर तालुक्यात आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED