लोकशाहीर आण्णा भाऊ साठे जयंती आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरी होणार -प्रा.शरद गायकवाड

41

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.29जुलै):-स्वप्न स्टडीज सातारा यांचे वतीने साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती महोत्सवाचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील आॅनलाइन व्याख्यान आयोजन करण्यात आलेले असून या आॅनलाईन व्याख्याना मध्ये माॅरशिस, दुबई,जर्मन, सिंगापुर, पाकिस्तान, दक्षिण अफ्रीकेतील अभ्यासक या व्याख्यानात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची माहिती सांगणार आहेत हा आॅनलाईन प्रयोग केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर देशपातळीवरील हा अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग एवढया मोठया प्रमाणावर साजरा करण्यात आलेला आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत प्रा. डॉ. शरद गायकवाड यांनी दिली.

रविवार दिनांक १ ऑगस्ट २०२१ रोजी सायं. ठिक ६.०० ते रात्री ८.०० या वेळेत आभासी(ऑनलाईन) पध्दतीने अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.अण्णा भाऊंच्या साहित्याचे अभ्यासक, संशोधक व ज्येष्ठ लेखक प्रा. डॉ. शरद गायकवाड (मराठी विभाग, महावीर महाविदयालय, कोल्हापूर) यांचे “आंतरराष्ट्रीय मानवतावादीसाहित्यीक अण्णा भाऊ साठे” या विषयावर प्रमुख व्याख्यान होणार आहे.डॉ. गायकवाड यांच्या व्याख्यानानंतर मॉरिशिस मधील डॉ. होमराजन गोवरीया, संशोधक पुर्वशा सखु (मॉरिशस), किशोर मुंडे (दुबई), महेश बारवकर (जर्मनी), शैलेश दामले (सिंगापूर),राजीव तेरवडकर (डरबन-दक्षिण आफ्रिका) आणि विशाल रजपूत (कराची-पाकीस्तान) या विविध देशातील मान्यवरांची अण्णा भाऊ साठे यांच्यासंबंधीची मनोगते संपन्न होणार आहेत.

दरम्यान (पनवेल) मुंबई येथील सिमा दाबाडकर यांचे लोकमान्य टिळक यांच्या स्मृतीदिनानिमित्त मनोगत व्यक्त होणार आहे. अण्णा भाऊ साठे यांच्या आंतरराष्ट्रीय जयंती महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी मॉरिशस येथील माजी मराठी विभाग प्रमुख, महात्मा गांधी इन्स्टिटयूट मराठी भाषक संघाचे माजी अध्यक्ष मा.डॉ.बिदन आबा (सर) हे असणार आहेत.

स्वप्न स्टडीज सातारा चे दिलीप पुराणिक, स्वप्निल पुराणिक, यांच्या पुढाकाराने यापूर्वी अशाच प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या जयंतीचे यशस्वी नियोजन केलेले होते या विविध उपक्रमामध्ये खा. छत्रपती उदयनराजे भोसले, खा छत्रपती संभाजीराजे भोसले, सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, डॉ शरद गायकवाड, शिवाजी विद्यापिठाचे कुलगुरू डॉ डी टी शिर्के, व मॉरिशिस येथिल डॉ होमराजन गोवरीया यांची व्याख्याने संपन्न झाली आहेत